‘मी पुन्हा येईन'च्या नादात महाराष्ट्रातील जनतेचा जीव धोक्यात घालत आहे भाजप ! - bjp is endangering the lives of the people of maharashtra with the slogan | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

‘मी पुन्हा येईन'च्या नादात महाराष्ट्रातील जनतेचा जीव धोक्यात घालत आहे भाजप !

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 12 एप्रिल 2021

कोरोनाच्या या गंभीर संकटात राजकारण विसरून सर्वांनी एकत्र येऊन याचा सामना केला पाहिजे. राज्य सरकार त्यांच्या परीने योग्य काम करत आहे. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर यांनीही महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारकडून मोठी मदत आणली पाहिजे.

नगपूर : कोरोनाने महाराष्ट्रात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज हजारो रुग्ण वाढत असताना भारतीय जनता पक्षाकडून राजकारण केले जात आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेने भयानक स्थिती उद्भवली आहे. याचा मुकाबला करायचा असेल तर लॉकडाऊन व लसीकरण हाच पर्याय आहे. मात्र लसी उपलब्ध नाहीत आणि 'उत्सव'ची इव्हेंटबाजी भाजप करत आहे. हा प्रकार मढ्यावरचे लोणी खाण्याचा असून केवळ ‘मी पुन्हा येईन’च्या नादात महाराष्ट्राच्या जनतेचा जीव धोक्यात घालण्याचे पातक महाराष्ट्रद्रोही भाजपा करत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना लोंढे म्हणाले की, नागपूरमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. महानगरपालिकेचा बेजबाबदारपणा व भाजपच्या नेत्यांचा खोटारडेपणा सुरू आहे. महानगरपालिकेतील लसींचा साठा आज संपत आहे. उद्यापासून लस मिळाली नाही तर मृत्यूंचं तांडव उभं राहण्याची भिती असताना केवळ क्रेडिट घेण्यासाठी इव्हेंटबाजी करत जनतेच्या जिवाशी खेळ चालवला आहे. लसच नाही तर उत्सव कसला करता. हा उत्सव नसून युद्ध आहे आणि युद्धात तत्पर राहायला हवे, ती तत्परता दिसत नाहीये. 

महापौर दयाशंकर तिवारी हे 500 बेड्सचे रुग्णालयात उभे करण्याचे सांगत आहेत. परंतु सध्या २५० बेड्स उपलब्ध आहेत त्यासाठीच मनुष्यबळ नाही, तर नवीन रुग्णालयाचे खोटे आश्वासन का देता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ५००० रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध आहेत, असे जाहीर केले आणि त्यासाठी एक नंबरही देण्यात आला होता पण त्यावर चौकशी केली असता तेही खोटे निघाले. अशा पद्धतीने खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजपाकडून केले जात आहे.

हेही वाचा : कोरोना उपचाराच्या नावाखाली रुग्णांचे शोषण थांबवा : खासदार बाळू धानोरकर   

कोरोनाच्या या गंभीर संकटात राजकारण विसरून सर्वांनी एकत्र येऊन याचा सामना केला पाहिजे. राज्य सरकार त्यांच्या परीने योग्य काम करत आहे. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर यांनीही महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारकडून मोठी मदत आणली पाहिजे. मात्र भाजपला या महामारीच्या संकटातही आपली राजकीय पोळी भाजायची आहे. भाजपला केवळ विरोधासाठी विरोध आणि फक्त राजकारण करायचे आहे अशी टीका लोंढे यांनी केली आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख