भाजपचा विदर्भातील १६२९ ग्रामपंचायतींवर दावा - bjp claims 1629 grampanchayats in vidarbha | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचा विदर्भातील १६२९ ग्रामपंचायतींवर दावा

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 19 जानेवारी 2021

शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांचा निधी सरकारने थांबविला. त्यांची सत्ता नसलेल्या राज्यातील ग्रामपंचायती, नगर परिषद, नगर पंचायती आणि महानगरपालिकांना आमच्या सरकारने विविध विकास कामांसाठी दिलेला निधी या सरकारने परत घेतला.

नागपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर सर्व पक्षांचे दावे प्रतिदाव्यांसोबत भारतीय जनता पक्षानेही आपला दावा केला आहे. विदर्भातील ३९५६ पैकी १६२९ ग्रामपंचायतींवर आमचा झेंडा फडकणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या योजनांना महाविकास आघाडी सरकारने कात्री लावल्यामुळे जनता भाजपवर विश्‍वास दाखवत असल्याचे राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

बावनकुळे म्हणाले महाविकास आघाडीचे सरकार शेतकरीविरोधी आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांचा निधी सरकारने थांबविला. त्यांची सत्ता नसलेल्या राज्यातील ग्रामपंचायती, नगर परिषद, नगर पंचायती आणि महानगरपालिकांना आमच्या सरकारने विविध विकास कामांसाठी दिलेला निधी या सरकारने परत घेतला. निधी अभावी जुनीच कामे थांबली असल्याने नवीन विकास कामे होण्याचा प्रश्‍नच उरला नाही. पूरग्रस्तांना मदत दिली नाही, अनेक योजनांचे अनुदान सामान्य जनतेला मिळाले नाही. त्याचे परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीत बघायला मिळाले. आम्हाला विशेष काही करण्याची गरजच उरली नाही. कारण या सरकारची कामगिरीच त्यांना घरी बसवणार आहे. 

यापुढेही ज्या निवडणुका होतील, त्यामध्ये आमची कामगिरी अधिक दमदार होणार आहे. आज विदर्भातील ज्या ग्रामपंचायतींवर दावा केला, तेथे आमचाच गुलाल उधळला जाणार, हे निश्‍चित आहे. निवडून आलेल्या दुसऱ्यांच्या सदस्यांना आपले म्हणून आकड्यांचा खेळ आम्ही करत नाही. त्यांना जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच कुणाचे दावे फसवे आहेत, हे जगाला कळणार आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

भाजपने दावा केलेल्या विदर्भातील ग्रामपंचायती -
वर्धा - ५० पैकी २८
चंद्रपूर- ६२९ पैकी- ३४४
गोंदिया- १८९ पैकी- १०६
भंडारा- १४८ पैकी- ९१
नागपूर- १३० पैकी- ७३
वाशीम - १६३पैकी- ८३
अकोला- २२५ पैकी १२३
बुलडाणा- ५२७ पैकी २४९
अमरावती- ५५३ पैकी ११३
यवतमाळ- ९८० पैकी ४१९
(गडचिरोली ची मतमोजणी २२ जाने ला होणार )
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख