भाजपवाल्यांना बिंग फुटण्याची भीती, म्हणूनच मुंढेंचा विरोध : डॉ. नितीन राऊत 

महाविकास आघाडी सरकारने मुंढेंना येथे पाठवले आहे. त्यामुळे कॉंग्रेसने, राष्ट्रवादीने किंवा शिवसेनेने येथे त्यांना पाठवले का, अशा ज्या चर्चा घडवून आणल्या जात आहेत. त्याला काही अर्थ नाही. मुंढेंच नाही तर कोणताही अधिकारी कोणत्याही शहरात जेव्हा जातो. तो त्या शहरात त्याचं काम प्रशासकीय काम करण्यासाठी, शहराचं भलं करण्यासाठी जात असतो.
Nitin Raut
Nitin Raut

नागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोनाच्या युद्धात नेटाने लढा दिला आहे. शहरात टीम वर्क केल्याने रुग्णांचा मृत्यूदर कमी ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे. अशा परीस्थितीत पालिकेतील सत्ताधारी आयुक्तांना टोकाचा विरोध करीत आहे. एका अधिकाऱ्याला घेरण्यासाठी नगरसेवकापासून ते केंद्रीय मंत्री भिडले आहेत. कारण हे आयुक्त यांचे बिंग फोडतील, याची भिती त्यांना असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत "सरकारनामा'शी बोलताना म्हणाले. 

नागपूर शहरात आयुक्त तुकाराम मुंढे आणि सत्ताधारी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. पालकमंत्री डॉ. राऊत यांनी आज प्रथमच या विषयावर भाष्य केले. ते म्हणाले, स्मार्ट सिटीच्या संदर्भात आयुक्तांची पोलीसांत तक्रारही करण्यात आली. सीईओच्या रिक्त पदी नियुक्ती करण्याचे अधिकार त्या मंडळाला आहेत. त्याचे अध्यक्ष प्रवीण परदेशी आहेत. त्यांनी तात्पुरती व्यवस्था म्हणून पालिकेच्या आयुक्तांना अधिकार दिले. त्यामुळे स्मार्ट सिटीचा कारभार ते पाहात आहेत. सीईओची नियमित नियुक्ती करण्यासाठी बोर्डाकडे प्रस्ताव द्यावा लागणार आहे. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल. आयुक्त मुंढे यांना जे तात्पुरते अधिकार मिळाले. त्यानुसार त्यांनी काही देणी दिली. भाजपच्या मंडळींना आता असे वाटायला लागले आहे की, आयुक्त आपले बिंग तर फोडणार नाही. मुंढेंच्या हाती आपला एखादा घोटाळा लागला, तर आपल्या पक्षाची अवस्था वाईट होईल. त्यामुळे त्यांनी पराकोटीचा विरोध चालविला आहे. 

भाजपच्या मंडळीनी पाच दिवस पालिकेचे सभागृह चालविले. बाकी सर्व गोष्टींना त्यांचा विरोध असला तरी आयुक्तांनी कोरोनाची परिस्थिती कुशलतेने हाताळली, ही बाब कुणीही नाकारू शकणार नाही. त्या तिन महिन्यांत त्यांचा परीवार येथे नसताना, कुणीही नातेवाईक नसताना त्यांनी कोरोनाच्या विरोधात एकाकी लढा दिला. प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांशी आणि कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून टीमवर्क करीत नागपुरातील जिवहानी कमी केली. मोठ्या संख्येने लोक बरे होऊन घरी गेले. खरं तर या कामासाठी सभागृहात त्यांचे अभिनंदन करायला पाहीजे होते. पण यांच्यापैकी एकानेही तसे केले नाही. उलट विविध आरोप लाऊन त्यांना टारगेट करण्यात आले. भाजपकडून येथेही राजकारण करण्याचा प्रयत्न होतो आहे. 

महाविकास आघाडी सरकारने मुंढेंना येथे पाठवले आहे. त्यामुळे कॉंग्रेसने, राष्ट्रवादीने किंवा शिवसेनेने येथे त्यांना पाठवले का, अशा ज्या चर्चा घडवून आणल्या जात आहेत. त्याला काही अर्थ नाही. मुंढेंच नाही तर कोणताही अधिकारी कोणत्याही शहरात जेव्हा जातो. तो त्या शहरात त्याचं काम प्रशासकीय काम करण्यासाठी, शहराचं भलं करण्यासाठी जात असतो. नवीन शहरात कुण्याही अधिकाऱ्याचं व्यक्तिगत काम असण्याचा प्रश्‍नच नाही. तुकाराम मुंढेही येथे व्यक्तिगत हीतासाठी काम करत नाहीत, असेही डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com