बर्थ ईयर आणि बाईकचे क्रमांक ठरताहेत घातक, ईझी पासवर्ड’मुळे सायबर क्रिमिनल्सची ‘चांदी’ - birthdays and bike numbers are dangerous easy passwords make cybercriminals work easier | Politics Marathi News - Sarkarnama

बर्थ ईयर आणि बाईकचे क्रमांक ठरताहेत घातक, ईझी पासवर्ड’मुळे सायबर क्रिमिनल्सची ‘चांदी’

अनिल कांबळे
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

आपल्या सोशल मिडीयावर असलेल्या प्रोफाईलवरून आपली बरीच खाजगी माहिती सार्वजनिक झालेली असते. त्यामुळे फेसबूक, वॉट्सॲपवर आपले खासगी फोटो टाकू नये. हा प्रकार सायबर क्रिमिनल्सला आमंत्रण देण्यासारखा आहे.

नागपूर : एटीएम कार्ड, फोन पे, पेटीएम, गुगल पे आणि पेमेंट ॲप्सला ‘ईझी पासवर्ड’ ठेवल्यामुळे सायबर क्रिमिनल्सची चांदी होत आहे.  पासवर्ड मिळविण्यासाठी सायबर क्रिमिनल्स सोशल मिडियाचा वापर करीत आहेत. फेसबूक आणि ट्वीटरवर अपलोड केलेल्या फोटोंमधून पासवर्ड चोरी होण्याचे प्रमाण वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकांना सोशल मिडियावर अकाऊंट उघडताना खासगी माहिती मागितली जाते. त्यामध्ये जन्मतारीख, जन्मवर्ष, फोन नंबर, टोपन नाव, जॉब संदर्भात माहितीचा समावेश राहतो. तसेच अनेकांना फेसबूकवर स्वतःचे फोटो, कार-दुचाकीचे फोटो आणि मुलांच्या नावासह फोटो टाकण्याची सवय असते. या सर्व बाबींचा फायदा सायबर क्रिमिनल्स घेत असतात. डीजीटल पेमेंट करताना किंवा एटीएमने पैसे काढताना अडचणी येऊ नये म्हणून अनेक जण सोपा पासवर्ड ठेवतात. जवळपास ३० ते ३५ टक्के ग्राहकांचे पासवर्ड जन्मतारीख, जन्मवर्ष, फोन नंबर, टोपन नाव, मुलाचे नाव, कार, दुचाकीचा क्रमांक असतो. ही सर्व पासवर्ड सहज मिळू शकतात. त्यावरून सायबर क्रिमिनल्स आपले अकाऊंट हॅक करू शकतात किंवा पेमेंट ॲप्समधून मोठी रक्कम परस्पर उडवू शकतात. स्वतःची सुरक्षा ही आपल्याच हाती आहे. तीन महिन्यातून एकदा तरी आपला पासवर्ड बदलायला हवा. त्यामुळे हॅक होण्याचा धोका कमी असतो. 

चुकूनही ठेवू नका हे पासवर्ड
वन, टू, थ्री, आयलवयू, एकदोनतीन, एबीसी, वनझीरोवन, स्वतःचे नाव, कार क्रमांक, मोबाईलचे शेवटचे चार अंक, जन्मतारीख, जन्म वर्ष, मुलाचे किंवा मुलीचे नाव, एक ते सहा क्रमांक, टोपन नाव, नोकरी करीत असलेल्या कंपनीचे नाव तसेच आपल्या पत्नीचे नाव अशा प्रकारचे पासवर्ड चुकूनही ठेवू नका. हे सर्व पासवर्ड आपल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून सायबर क्रिमिनल्स मिळवू शकतात.

निवडा स्ट्रॉंग पासवर्ड
पासवर्डमध्ये एक कॅपिटल, अंक, कोडवर्ड, अक्षरांचा समावेश असेल तर तो क्रॅक करणं तुलनेनं कठीण होऊ शकते. त्यामुळे पासवर्डमध्ये केवळ क्रमांक ठेवण्यापेक्षा काही अक्षरांचा वापर करा. जवळपास लांबलचक म्हणजेच स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा. अशा पासवर्डची चोरी करणे थोडे कठीण असते.

आपल्या सोशल मिडीयावर असलेल्या प्रोफाईलवरून आपली बरीच खाजगी माहिती सार्वजनिक झालेली असते. त्यामुळे फेसबूक, वॉट्सॲपवर आपले खासगी फोटो टाकू नये. हा प्रकार सायबर क्रिमिनल्सला आमंत्रण देण्यासारखा आहे. एटीएम किंवा पेमेंट ॲप्सचे पासवर्ड सोपे ठेवू नये. स्ट्रॉंग पासवर्ड हॅक होण्याची शक्यता कमी असते. तरीही कुणाला सायबर क्रिमिनल्सने गंडविल्यास चोवीस तासांच्या आत सायबर पोलिसांकडे तक्रार करा. आम्ही तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन गुन्हेगारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करू.
- केशव वाघ, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम.

(Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख