उद्या भंडाऱ्याला मिळणार २३ हजार लस, जिल्ह्याच्या सीमांवर नियंत्रण आणणार...  - bhandara will get twenty three thousand vaccine tomorrow will control of district boundaries | Politics Marathi News - Sarkarnama

उद्या भंडाऱ्याला मिळणार २३ हजार लस, जिल्ह्याच्या सीमांवर नियंत्रण आणणार... 

अभिजित घोरमारे
गुरुवार, 8 एप्रिल 2021

भंडारा जिल्ह्याचे प्रशासन, आमचे स्थानिक प्रतिनिधी आण एकुणच महाविकास आघाडी सरकार लोकांच्या आरोग्यासाठी वेगाने काम करत आहे. सध्या आलेला कोरोनाचा नवीन स्ट्रेन अधिक वेगाने पसरतोय. राज्य सरकारने घालून दिलेले नियम जनतेने पाळावे. सोशल डिस्टंसिंग आणि मास्क नेहमी घालावा.

भंडारा : भंडारा जिल्ह्यात ४५ वर्षांच्या वरील ३५ टक्के लोकांचे लसीकरण झालेले आहे. महाराष्ट्रातील भंडारा हा लसीकरणात पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे. लसींची तूट ही संपूर्ण देशात आहे, याची दखल केंद्र सरकारने घेतली पाहिजे. महाराष्ट्राला आवश्‍यक पुरवठा करावा, राज्य त्यात मागे पडणार नाही. आज आरोग्यमंत्र्यांशी बोलणे झाले. उद्या जिल्ह्यासाठी २३ हजार लस येणार असल्याचे पालकमंत्री विश्‍वजित कदम यांनी आज येथे सांगितले. 

भंडारा जिल्ह्यात रेमडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे मंत्री कदम यांनी आज सांगितले. आरोग्य मंत्री व आरोग्य सचिव विभागीय आयुक्त यांच्याशी याबाबत चर्चा करून लवकर उपाय योजना करणार असल्याचे ते बोलले. महाराष्ट्र सरकार जनतेच्या आरोग्यासाठी वेगाने काम करत असल्याचेही ते म्हणाले. पूर्व विदर्भात भंडारा जिल्हा हॉटस्पॉट ठरत आहे. हा जिल्हा नागपूरला लागून असल्याने येथील लोकांचे नागपूर शहरात आणि जिल्ह्याच्या तालुक्यांत जाणेयेणे आहे. त्यामुळेही कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. आता भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर नियंत्रण वाढविणे गरजेचे झाले आहे आणि आम्ही ते करणार आहोत. स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेऊन लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल. लग्न समारंभ आयोजित करताना सरकारच्या नियमांचे उल्लंघन जर कुणी करणार असेल तर त्यांची गय केली जाणार नाही, कडक कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री कदम म्हणाले. 

कोरोनाच्या पृष्ठभूमीवर पालकमंत्र्यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. लसीकरणाचा आढावा घेतला. कोरोनाच्या रुग्णांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये जे उपचार सुरू आहेत, त्याचाही आढावा आज घेण्यात आला. रेमडेसिव्हरच्या तुटवड्याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि आरोग्य खात्याचे सचिव यांच्याशी चर्चा केली. विभागीय आयुक्तांशीही चर्चा केली आहे. भंडारा जिल्ह्याचे प्रशासन, आमचे स्थानिक प्रतिनिधी आण एकुणच महाविकास आघाडी सरकार लोकांच्या आरोग्यासाठी वेगाने काम करत आहे. सध्या आलेला कोरोनाचा नवीन स्ट्रेन अधिक वेगाने पसरतोय. राज्य सरकारने घालून दिलेले नियम जनतेने पाळावे. सोशल डिस्टंसिंग आणि मास्क नेहमी घालावा, असे आवाहन पालकमंत्री कदम यांनी यावेळी केले. 

हेही वाचा : मोठी बातमी : युरोप अन् अमेरिकेकडून भारताची कोंडी; कोरोना लशीसाठीचा कच्चा माल रोखला

७५ टक्के तक्रारींचा निपटारा
भंडारा जिल्ह्यात झालेल्या जनता दरबारात प्राप्त झालेले निवेदन आणि तक्रारींचा ७० ते ७५ टक्के निपटारा झाला आहे. नागपूर बैठकीत उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भंडारा जिल्ह्याचे डीपीडीसी बजट वाढवून मिळाले आहे. हा पैसा विकास कामांसह कोरोनाच्या लढ्यात वापरण्यात येणार असल्याचे विश्‍वजित कदम यांनी सांगितले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख