दुर्लक्ष केल्यामुळेच भैय्यालालचा मृत्यू, पोलिस उपनिरीक्षकासह ४ कर्मचारी निलंबित - bhaiyalal dies due to negligence four employees including psi suspended | Politics Marathi News - Sarkarnama

दुर्लक्ष केल्यामुळेच भैय्यालालचा मृत्यू, पोलिस उपनिरीक्षकासह ४ कर्मचारी निलंबित

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 13 मार्च 2021

मुख्यालयातील कर्मचारी संजय पांडे ९ मार्चला सकाळी १० वाजता दुचाकीने जात होता. तेव्हा गोरेवड्याजवळ जखमी अवस्थेत पडून असलेल्या बैस यांच्याकडे त्याचे लक्ष गेले. त्याने बैस यांना पाणीही पाजले. त्यानंतर मानकापूर पोलिस ठाण्यात तशी सूचना दिली आणि तो पुढे आपल्या कामावर निघून गेला.

नागपूर : बराच वेळ जखमी अवस्थेत पडून असलेल्या ६४ वर्षीय भैय्यालाल बैस यांना वेळीच उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मानकापूर पोलिसांना माहिती मीळूनही त्यांनी बैस यांना रुग्णालयात पोहोचवण्याची तत्परता दाखवली नाही. परिणामी बैस यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी एका पोलिस उपनिरीक्षकासह चार कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केले. 

लोखंडे लेआऊटमध्ये राहणारे भैय्यालाल बैस ८ मार्चला सकाळी बेपत्ता झाले होते. ९ मार्चला सायंकाळी ४.३० ते ५ वाजताच्या दरम्यान गोरेवाड्यातील निर्जन स्थळी त्यांचा मृतदेह आढळला.  ते जखमी अवस्थेत पडून होते. त्यांचा खून केला, ही बाब पहिल्या नजरेतच पाहिल्यावर लक्षात येत होती. प्रथम मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आणि नंतर ११ मार्चला खुनाचा गुन्हा दाखल केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकापूर पोलिसांना संजय पांडे या पोलिस कर्मचाऱ्याने ९ मार्चला सकाळी बैस जखमी अवस्थेत पडून असल्याची माहिती दिली होती. पण मानकापूर पोलिसांनी तत्काळ दखल न घेतल्यामुळे बैस यांचा मृत्यू झाल्याचा ठपका मानकापूर पोलिसांवर ठेवण्यात आला आहे. 

मुख्यालयातील कर्मचारी संजय पांडे ९ मार्चला सकाळी १० वाजता दुचाकीने जात होता. तेव्हा गोरेवड्याजवळ जखमी अवस्थेत पडून असलेल्या बैस यांच्याकडे त्याचे लक्ष गेले. त्याने बैस यांना पाणीही पाजले. त्यानंतर मानकापूर पोलिस ठाण्यात तशी सूचना दिली आणि तो पुढे आपल्या कामावर निघून गेला. संजयकडून मानकापूर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतरही त्यांनी काहीच केले नाही आणि वेळ निघून गेली. बैस यांना तेव्हाच रुग्णालयात दाखल केले असते, तर त्यांचे प्राण वाचू शकले असते. पण पोलिसांनी तसे न केल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिस आयुक्त अमितेषकुमार यांनी पोलिस उपनिरीक्षक लाकडे यांच्यासह पोलिस कर्मचारी राहुल बोटरे, रोशन यादव व मुख्यालयाचे संजय पांडे यांना तत्काळ निलंबित केले. आयुक्तांच्या या कारवाईने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.  
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख