सावधान..! उपराजधानी झाली स्फोटक, दर तासाला दोन मृत्यू

जिल्‍ह्यात काल सर्वाधिक ६४ मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे काल, मृत्यूसंख्या १८७९ पर्यंत पोहोचली. आज, शुक्रवारी ४५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे प्रशासनाने कळविले. त्यामुळे आतापर्यंत मृत्यूची संख्या १९२४ पर्यंत पोहोचली. परंतु प्रशासनाने १९३५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद केली असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. ११ बळी प्रशासनाने हातचे धरले की काय?
nagpur zero mile-corona
nagpur zero mile-corona

नागपूर : कोरोनाचे भय कमी होण्याची कुठलीही चिन्हे आता दिसत नाहीत. ‘भय इथले सुरू झाले’, असे म्हणण्याची वेळ गेल्या ४८ तासांत झालेल्या मृत्यूंमुळे आली आहे. तब्बल १०९ जणांचा मृत्यू गेल्या दोन दिवसांत कोरोनामुळे झाला आहे. दर तासाला दोनपेक्षा अधिक मृत्यू होत असल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे. एकूण मृतकांची संख्या दोन हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. 

काल ६४ जण कोरोनाने मृत्युमुखी पडले, आज यात ४५ जणांची भर पडली. आज आढळून आलेल्या १७०३ बाधितांसह कोरोनाची लागण झालेल्याचा आलेख ६० हजार ५९३ पर्यंत पोहोचला. संपूर्ण यंत्रणा बेड, ॲम्बुलन्सची सोय उपलब्ध करून देण्यात गुंतली असतानाच त्यांचे अपयशही या आकडेवारीने अधोरेखित केले. मृतांच्या वाढत्या आकड्यांनी नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. महापालिका, आरोग्य यंत्रणा कामाला लागली असली तरी बाधित व मृत्यूची संख्या नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरत आहे. प्रशासकीय अपयशाने नागरिकांत भीती आणखी वाढली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या १० हजारांवर रुग्णांतही दहशत पसरली आहे. जिल्ह्यात आज ४५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. यात २९ जणांचा तर ग्रामीणमधील १३ जणांचा समावेश आहे. ३ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. या मृत्यूसह कोरोनाबळींची संख्या १९२४ वर पोहोचली. 

शहरातील विविध लॅबमधून आलेल्या अहवालातून शुक्रवारी १७०३ जण बाधित आढळून आले. या शहरातील १४३३, ग्रामीणमधील २६७ तर जिल्ह्याबाहेरील तीन जणांचा समावेश आहे. बाधितांच्या संख्येने ६० हजारांचा टप्पा ओलांडला. यात ग्रामीणमधील १२ हजार ११३ जणांचा समावेश असल्याने खेड्यापाड्यांतही कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आज एकूण ६ हजार १५१ जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यामुळे एकूण तपासणी झालेल्यांची संख्या ३ लाख ८६ हजार ५८५ वर पोहोचली आहे. दरम्यान, नमुन्यांची संख्या कमी असली तर दररोज सतराशे ते दोन हजारांपर्यंत नागरिकांचे नमुने पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे नियंत्रणावर कुठल्या उपाययोजना कराव्या, याबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या डोक्याचाही ताप वाढला आहे. दरम्यान, काल ६४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. एका दिवसात सर्वाधिक कोरोनाबळींची नोंद काल झाली. 

एका दिवसांत तीन हजारांवर कोरोनामुक्त 
एकीकडे मोठ्या प्रमाणात बाधित व मृत्यूसंख्या वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे. मात्र, त्याचवेळी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढत असल्याने प्रशासन नैराश्य झटकून कामे करीत आहेत. आज दिवसभरात ३ हजार २४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या ४८ हजार ३९६ झाली. रुग्ण बरे होण्याचा दर ७९.८७ वर पोहोचला आहे. 

११ मृत्यू कुठले ? 
जिल्‍ह्यात काल सर्वाधिक ६४ मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे काल, मृत्यूसंख्या १८७९ पर्यंत पोहोचली. आज, शुक्रवारी ४५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे प्रशासनाने कळविले. त्यामुळे आतापर्यंत मृत्यूची संख्या १९२४ पर्यंत पोहोचली. परंतु प्रशासनाने १९३५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद केली असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. ११ बळी प्रशासनाने हातचे धरले की काय? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित झाला आहे.       (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com