बावनकुळे म्हणाले, पोलिस महासंचालक हेमंत नगराळे निरीक्षक लगडवर कारवाई करतील...

पुण्याचे पोलिस आयुक्त तपासाच्या नावाखाली निव्वळ टाईमपास करीत आहेत. दिवस वाया घालवले जात आहेत. पोलिस आता तपास करू शकत नाही, असा आमचा समज झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून काढून सीबीआयकडे द्यावा.
Hemant Nagrale - Bawankule
Hemant Nagrale - Bawankule

नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या चित्रा वाघ या पूजा चव्हाण मृत्युप्रकरणात माहिती घेण्यासाठी वानवडी पोलिस ठाण्यात गेल्या होत्या. तेथे ठाणेदार दीपक लगड यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. त्याबाबत पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची भेट घेऊन आम्ही तक्रार केली आहे. घडल्या प्रकाराची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्‍वासन महासंचालकांनी दिले आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या ठाणेदार लगडवर कारवाई होईल, अशी आशा असल्याचे राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आज येथे म्हणाले. 

बावनकुळे म्हणाले, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होत नाहीये. म्हणून माहिती घेण्यासाठी चित्रा वाघ वानवडी पोलिस ठाण्यात गेल्या होत्या. तेथे लगड नावाच्या इन्स्पेक्टरने त्यांच्यासोबत गैरव्यवहार केला. धड बोलायचं नाही, हुकूमशहासारखं वागायचं, माहिती नीट द्यायची नाही, असा प्रकार लगड यांनी केला. ही माहिती आम्ही पोलिस महासंचालकांना दिली आहे. त्यावर कायर्वाही करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे. राज्यातला एक मंत्री कायदा व सुव्यवस्था मोडीत काढतो. कोरोनाचे संकट असतानाही शक्तिप्रदर्शनासाठी पोहरादेवीत १० हजारांपेक्षाही अधिक लोकांची गर्दी जमा करतो. परिणामी कोरोनाची स्थिती भयावह होण्याची शक्यता वाढली आहे. राठोडांचे शक्तिप्रदर्शन आणि होम हवन सुरू असताना तेथील महंत स्वतः कोरोना पॉझिटिव्ह होते, अशी माहिती आहे. असे असतानाही गर्दीतील लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येतात. पण मंत्री राठोडांवर काहीच कारवाई होत नाही. त्यामुळे राज्य सरकार अशा मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न कशासाठी करत आहे, हे कळायला मार्ग नाही. 

पूजा चव्हाणच्या मृत्युला १७ दिवस होऊन गेले. अनेक प्रश्‍न अद्याप अनुत्तरीत आहेत. पोलिसांनी गेल्या तीन वर्षांतील पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे मोबाईल लोकेशन्स बघितले, तरी पोलिसांना माहिती मिळेल. संबंधितांचे लॅपटॉप आणि मोबाईलमधूनही बरीच माहिती मिळू शकते. त्यांच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल होत आहेत. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात रात्री दोन वाजता गर्भपात करण्यात आला. ती तरुणी कोण होती, याबद्दलही विविध चर्चा सुरू आहेत. अशा अनेक बाबी लोकांना दिसत आहेत. पण त्या दिशेने तपास केला जात नाहिये. सामान्य लोकांनी थोडी जरी चूक केली, तरी कारवाई होते, गुन्हे दाखल केले जातात. संजय राठोड यांनी हजारोंची गर्दी पोहरादेवीत जमा केली. तरीही त्यांच्याविरोधात अद्याप एकही गुन्हा दाखल केला गेला नाही. त्यामुळे सरकार राठोडच्या पाठीशी आहेत आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा घणाघाती आरोप बावनकुळे यांनी केला.

पुण्याचे पोलिस आयुक्त तपासाच्या नावाखाली निव्वळ टाईमपास करीत आहेत. दिवस वाया घालवले जात आहेत. पोलिस आता तपास करू शकत नाही, असा आमचा समज झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून काढून सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. 
 Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com