‘हिच’ ऑडिओ क्लिप ऐकवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला : नितीन तिवारी - attempted to blackmail by listening to audio clip said nitin tiwari | Politics Marathi News - Sarkarnama

‘हिच’ ऑडिओ क्लिप ऐकवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला : नितीन तिवारी

अतुल मेहेरे
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

खंडणी मागणाऱ्यांची नावेही आपणास माहिती आहे. योग्य वेळी ती उघड केली जातील. पोलिसांनी याची चौकशी करावी, आपला सीडीआर तपासावा. सर्व चौकशीला सामोरे जाण्याची आपली तयारी आहे, असे नितीन तिवारी यांनी सांगितले. 

नागपूर : जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही. हीच ऑडिओ क्लिप ऐकवून आपणास ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पैसे देण्यास नकार दिल्याने ती व्हायरल करण्यात आली. खंडणी मागणाऱ्यांची नावेही आपणास माहिती आहे. योग्य वेळी ती उघड केली जातील. पोलिसांनी याची चौकशी करावी, आपला सीडीआर तपासावा. सर्व चौकशीला सामोरे जाण्याची आपली तयारी आहे, असे नितीन तिवारी यांनी सांगितले. 

शिवसेनेचे नवनियुक्त शहर प्रमुख नितीन तिवारी यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी त्यांची नियुक्ती झाली आणि शुक्रवारी क्लिप आल्याने जवळच्या कुणाचे तरी हे कारस्थान असल्याची चर्चा आहे. ऑडिओ क्लिपमध्ये तिवारी आणि अभय मेश्राम नावाच्या एका व्यक्तीसोबत खंडणी वाटपासंदर्भातील संवाद आहे. ही क्लिप दीड वर्षांपूर्वीची असल्याचे समजते. यापूर्वीचा शहर प्रमुख मंगेश कडव याची खंडणी प्रकरण उघडकीस आल्याने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याचा फटका जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांनाही बसला. त्यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली होती. बऱ्याच दिवसानंतर शिवसेनेची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात नितीन तिवारी यांना शहर प्रमुख करण्यात आले. मात्र दुसऱ्याच दिवशी क्लिप व्हायरल झाल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी रेती चोरी प्रकरणी चिंटू महाराज यांचीही शिवसेनेतून हकालपट्टी झाली आहे. 

क्लिपमध्ये वसूल केलेल्या खंडणीची वाटणी कशी केली, याबाबत दोघे चर्चा करीत आहेत. त्यात माजी पदाधिकारी चिंटू महाराज, हितेश यावद यांच्यासह अनेकांच्या नावाचा उल्लेख आहे. खंडणीची रक्कम सात लोकांमध्ये कशी वाटली गेली याचाही माहिती आहे. मंगेश कडव, चिंटू महाराज, विक्रम राठोड यांना खंडणी मागितल्याने पक्षातून काढण्यात आले आहे. हाच न्याय आता नितीन तिवारी यांना लावणार का? असा सवाल शिवसैनिकांमार्फत उपस्थित केला जात आहे. तिवारी शिवसेनेचे शहर संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांचे खंदे समर्थक आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख