‘कौन बनेगा करोडपती’ प्रकरणी नवा वाद उकरण्याचा प्रयत्न : शिवराय कुळकर्णी

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पवित्र भारतीय राज्यघटनेला सर्वोतोपरी मानणारा व घटनेच्या चौकटीत वागणारा अभिमन्यू पवार हा कार्यकर्ता आहे. कारण आम्ही सारे भाजपाच्या मुशीत वाढलेले आहोत. अमिताभ बच्चन व सोनी टेलिव्हिजन नेटवर्क विरोधात अभिमन्यू पवार यांनी रास्त तक्रार करून घटनेने दिलेल्या अधीकाराचाच उपयोग केलेला आहे.
Shivray Kulkarni.
Shivray Kulkarni.

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सोनी टीव्ही वरच्या प्रसिद्ध कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरांच्या ऑप्शनला आक्षेप घेतला आहे. भाजपा विरोधक काही महाभागांनी आपल्या नेहमीच्या सवयीनुसार मूळ आक्षेपाला बाजूला ठेऊन सोयीस्कर नवा वाद उभा करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी केला आहे. 
 
श्री कुळकर्णी म्हणाले, अभिमन्यू पवार यांनी मनुस्मृती विषयी प्रश्न विचारला म्हणून आक्षेप घेतला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या धर्मग्रंथाचे दहन केले होते, हा प्रश्न होता. या प्रश्नाच्या उत्तराच्या चार पर्यायांपैकी तीन पर्याय हिंदू धर्मीयांसाठी श्रेष्ठ आणि पूजनीय असलेल्या भगवद्गीता, विष्णुपुराण व ऋग्वेद हे देण्यात आले. मानवी जीवनमूल्ये शिकवणारे व आज संपूर्ण जग ज्या मानव कल्याणाच्या विचाराने प्रेरित होते आहे, ते धर्मग्रंथ डॉ. आंबेडकर असे काय जाळतील? डॉ. आंबेडकरांचा संदर्भ देऊन हिंदूंच्या पूजनीय धर्मग्रंथांविषयी असा अपमानजनक उल्लेख करण्याचे स्वातंत्र्य या वाहिनीला व अमिताभ बच्चन यांना कोणी दिले ?

अभिमन्यू पवार यांनी अमिताभ बच्चन व सोनी टेलिव्हिजन नेटवर्क विरोधात दिलेल्या तक्रारीचा विपर्यास करत अनेक वृत्तपत्रांनी व न्युज चॅनेल्सनी "मनुस्मृतीबद्दल प्रश्न विचारला म्हणून भाजप आमदारांची अमिताभ बच्चन विरोधात पोलिसात तक्रार" अशा बातम्या प्रसारित केल्या आहेत. यातून बातमी वाचणाऱ्या व पाहणाऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत. १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी मनुस्मृतीच्या प्रति जाळल्या हा इतिहास आहे. इतिहास नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अभिमन्यू पवार यांच्या तक्रारीचा आणि २५ डिसेंबर १९२७ च्या घटनेचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. पण काही वृत्तपत्रांनी व न्यूज चॅनेल्सनी चुकीच्या पद्धतीने तक्रारीचा आशय प्रस्तुत केल्याने कथित धर्मनिरपेक्ष, डावे, पुरोगामी आणि बुद्धिजीवी कंपूला भाजपा विरोधात चरायला कुरण मिळाल्याचा आनंद झाला असल्याचे काही प्रतिक्रियांवरून दिसून आले.
 
"कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या त्या प्रश्नाच्या पर्यायात देशात अनेक धर्म असतानाही हिंदू धर्मीयांसाठी श्रेष्ठ आणि पूजनीय असलेल्या भगवतगीता, विष्णुपुराण व ऋग्वेद ग्रंथांचेच पर्याय का देण्यात आले" हा अभिमन्यू पवार यांचा मूळ आक्षेप आहे आणि तक्रारही त्याच बाबतीत आहे. हिंदू सहिष्णू आहेत म्हणून अशा प्रकारे त्यांच्या भावना दुखावण्याच्या किती प्रयत्नांकडे अजून दुर्लक्ष करायचे म्हणून त्यांनी तक्रार केली आहे. ती एकदम रास्त आहे. भगवद्गीता, विष्णुपुराण आणि ऋग्वेद या धर्मग्रंथांऐवजी समजा कुराण, हदीस, बायबल किंवा यांसारख्या अन्य धर्मग्रंथांचा पर्याय दिला असता तर आतापर्यंत देशभर हलकल्लोळ माजवला गेला असता. 

पुन्हा नवे शाहीनबाग सुरू झाले असते. एका प्रश्नाच्या उत्तरावरून दंगे पेटायला वेळ लागला नसता. अर्थात त्यांनी हिंदू धर्मग्रंथांचाच नव्हे तर कोणत्याच धर्मग्रंथांचा असा अपमान करू नये. हिंदू सहिष्णू असल्याने व तीव्र प्रतिक्रिया देत नसल्याने यावे त्याने टपली मारून जावे, कितपत उचित आहे, असा प्रश्‍न कुळकर्णी यांनी उपस्थित केला आहे. २५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले. पुढे आपण संविधानाच्या रूपाने भीमस्मृती स्वीकारली आहे. संविधानावर सर्वांची निष्ठा असायलाच हवी. परिणामी मनुस्मृती आपण नाकारली आहे. पण त्या घटनेचा आधार घेऊन भगवतगीता, विष्णुपुराण व ऋग्वेद या ग्रंथांची अवहेलना करण्याचा अधिकार कोणालाही नाही, अगदी महानायकालाही.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पवित्र भारतीय राज्यघटनेला सर्वोतोपरी मानणारा व घटनेच्या चौकटीत वागणारा अभिमन्यू पवार हा कार्यकर्ता आहे. कारण आम्ही सारे भाजपाच्या मुशीत वाढलेले आहोत. अमिताभ बच्चन व सोनी टेलिव्हिजन नेटवर्क विरोधात अभिमन्यू पवार यांनी रास्त तक्रार करून घटनेने दिलेल्या अधीकाराचाच उपयोग केलेला आहे. देवी, देवता, धर्मग्रंथ व हिंदूंची श्रद्धास्थाने यावर टीका व अपमान करण्याची हिंमत कोणी करू नये. नाही तर आम्ही धडा शिकवू, हीच भूमिका या मागे असल्याचे शिवराय कुळकर्णी म्हणाले.        (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com