Nitin Raut - Sanjay Rathore
Nitin Raut - Sanjay Rathore

राठोडांवर प्रश्‍न विचारताच, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत सभागृहातून उठून गेले...

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर होत असलेले आरोप आणि दोन दिवसांपूर्वी त्यांनी पोहरादेवी येथे जमवलेली गर्दी, या विषयावर राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज बोलणे टाळले.

नागपूर : सध्या राज्यभर चर्चेच असलेल्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर होत असलेले आरोप आणि दोन दिवसांपूर्वी त्यांनी पोहरादेवी येथे जमवलेली गर्दी, या विषयावर राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज बोलणे टाळले.  पत्रकारांनी याबाबत प्रश्‍न विचारताच त्यांनी पत्रकार परिषद आवरती घेतली आणि ते सभागृहातून तडक उठून बाहेर निघून गेले. तिकडे मुंबईत सुभाष देसाईंनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनीही राठोडांचा प्रश्‍न येताच पत्रपरिषद आटोपती घेतली. 

नागपुरात कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्याची माहिती देण्यासाठी डॉ. राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यासंदर्भात महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिली. पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तरेही दिली. पण शेवटी पूजा चव्हाण, संजय राठोड आणि पोहरादेवीतील गर्दी याबाबत विचारताच एकही शब्द न बोलता त्यांनी निघून जाणे पसंत केले. तत्पूर्वी ते म्हणाले, सरकार नीट चालवण्यासाठी विरोधकांची गरज असतेच. विरोधकच नसले तर सरकारचा गाडा व्यवस्थित चालणार नाही आणि सध्याचे विरोधक त्यांचे काम करत आहेत. आम्ही आमचे काम करत आहोत. शेवटी काय तर, निंदकाचे घर असावे शेजारी. ते असले की अधिक चांगले काम करणे सोपे होते.

कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते म्हणाले, शनिवार आणि रविवारी संपूर्ण मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे. लॉकडाऊन सध्याच करण्यात येणार नाही. ७ मार्चपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. तोपर्यंत परिस्थितीचे निरीक्षण करण्यात येईल. त्यानंतर कोरोनासंदर्भात निर्णय घेतला जाईल. प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून कोरोनाच्या चाचण्या आम्ही तीन पट वाढवल्या आहेत. ‘मी जबाबदार’ मोहिमेची जनजागृती करण्याच्या सूचना माहिती संचालकांना दिल्या आहेत. या मोहिमेअंतर्गत मास्क लावा, गर्दी करू नका, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, अशा सूचना जनतेला देण्यात येत आहेत. 

नागरिकांच्या सोयीसाठी रुग्णालये सुसज्ज ठेवण्यात येत आहेत. कोविड मित्र तयार करण्याचे काम सुरू आहे. १७६९ ऑक्सिजन बेड आणि आयसीयुचे ६८४ आणि २६३ व्हेंटीलेटर तयार ठेवण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षसुद्धा काम करत आहे. लसीकरणाचे काम वेगात सुरू आहे. ५००० लोकांची नोंदणी लसीकरणासाठी झाली नव्हती. यासंदर्भात आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याशी चर्चा केली. ही नोंदणीही लवकर होणार आहे. नागपूरची आजची कोरोनाबाबतची स्थिती पाहता महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने चांगले नियोजन करून काम केलेले असल्याची माहिती डॉ. राऊत यांनी दिली. 

१ मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांकडून गदारोळ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी राठोड यांचा राजीनामा घेतला जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री मात्र याबद्दल ब्रसुद्धा बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री राठोडांचा राजीनामा घेणार का, हा प्रश्‍न सध्यातरी अनुत्तरीतच आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com