आशा भोसलेंचे उपराजधानी नागपूरशी आहेत जुने ऋणानुबंध... - asha bhosales bond with vice capital nagpur is very special | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आशा भोसलेंचे उपराजधानी नागपूरशी आहेत जुने ऋणानुबंध...

केतन पळसकर
शुक्रवार, 26 मार्च 2021

गानकोकिळा लता मंगेशकर, क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. हा सोहळा नागपूरमध्ये पार पडला होता. यावेळी अनिल देशमुख सांस्कृतिक मंत्री होते. योगायोग म्हणजे आजही ते मंत्रिपदी विराजमान आहेत. त्यामुळे हा सोहळा पुन्हा एकदा नागपूरनगरीमध्ये व्हावा, अशी अपेक्षा सांस्कृतिक क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. 

नागपूर : प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना राज्य शासनातर्फे काल ‘महाराष्ट्रभूषण पुरस्कार’ जाहीर झाला. आशा भोसले यांचे नागपूरशी विशेष नाते आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उपराजधानीतील मोठे नाव असलेल्या शेवाळकर कुटुंबीयांशी आशाताईंचे जुने ऋणानुबंध आहेत. शहरात आल्यावर बरेचदा त्यांचा मुक्काम शेवाळकर कुटुंबीयांकडे असतो. राज्याचा सर्वात मानाचा समजला जाणारा पुरस्कार आशाताईंना जाहीर झाल्याबद्दल शेवाळकर कुटुंबीयांना विशेष आनंद झाला. 

आशाताईंनी कविवर्य सुरेश भट यांनी रचलेली अनेक गाणी गायली आहेत. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी अनेकदा नागपुरात हजेरीही लावली. सुरेश भट यांच्याबद्दल आशा भोसले यांना आस्था होती. आशाताईंबद्दल सांगताना आशुतोष शेवाळकर म्हणाले, आशाताई सुरेश भट यांची आस्थेने विचारपूस करत. सुरेश भट यांची प्रकृती बरी नसताना आशा भोसले यांचे अनेकदा फोन आले. त्यांच्या प्रकृतीसह आर्थिक परिस्थितीबद्दलही त्या विचारपूस करी. आशा भोसले यांचे सुरेश भट यांच्याशी सख्य होते, असेही ते म्हणाले. आशा भोसले यांना राज्य शासनातर्फे गुरुवारी ‘महाराष्ट्रभूषण पुरस्कार’ जाहीर झाला. 

१९९६ सालापासून राज्य शासनातर्फे महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिला जातो. विदर्भातील चार नामवंतांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यामध्ये १९९९ साली विजय भटकर (विज्ञान), २००३ साली अभय आणि राणी बंग (वैद्यकीय), २००४ साली बाबा आमटे (सामाजिक कार्य) आणि २००७ साली रा. कृ. पाटील (सामाजिक कार्य) यांच्या नावाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, विदर्भातील गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात काम करणाऱ्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. 
 
सोहळा नागपूरमध्ये व्हावा 
गानकोकिळा लता मंगेशकर, क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. हा सोहळा नागपूरमध्ये पार पडला होता. यावेळी अनिल देशमुख सांस्कृतिक मंत्री होते. योगायोग म्हणजे आजही ते मंत्रिपदी विराजमान आहेत. त्यामुळे हा सोहळा पुन्हा एकदा नागपूरनगरीमध्ये व्हावा, अशी अपेक्षा सांस्कृतिक क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. 
 
आशाताईंना स्वच्छतेची आवड 
कार्यक्रमांच्या निमित्ताने नागपुरात आल्यानंतर शेवाळकर कुटुंबीयांकडे त्यांचे नेहमी वास्तव्य असते. त्या घरी येणार म्हटल्यावर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आदरयुक्त धास्ती मनात असायची. कारण आशा भोसले फारच नीटनेटक्या. घरामध्ये कुठेही डाग दिसल्यास त्या येण्यापूर्वी ते स्वच्छ केले जायचे. 
 
पुरस्कार मिळायला उशीर झाला 
आशा भोसले यांना पुरस्कार मिळाल्याची बातमी कळल्यावर आनंद झाला. कार्यक्रमानिमित्त त्या अनेकदा नागपूरमध्ये आल्या आहेत. हा पुरस्कार त्यांना मिळायला उशीर झाला. खूप आधीच हा पुरस्कार मिळायला हवा होता. 
-गिरीश गांधी, अध्यक्ष, गिरीश गांधी फाउंडेशन.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख