arun gawli ordered to surrender in taloja Jail | Sarkarnama

अरुण गवळीने रविवारी तळोजा कारागृहात शरण यावे, उच्च न्यायालयाचे आदेश

सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 22 मे 2020

गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याला 20 मे 2008 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानुसार, तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता.

नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या पॅरोल रजेमध्ये मुदतवाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. येत्या रविवारी त्याची रजा संपत असून त्याला मुंबईच्या तळोजा कारागृहात शरण येण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. 

लॉकडाऊन असल्यामुळे हजर राहणे शक्‍य नसल्याने पॅरोल रजा वाढवून मिळावी, म्हणून उच्च न्यायालयात त्याने तिसऱ्यांदा याचिका दाखल केली होती. त्यावर, आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणी झाली. पत्नी आजारी असल्याने 13 मार्च रोजी अरुण गवळी याला 45 दिवसांची पॅरोल रजा मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर 28 एप्रिल रोजी त्याला 10 मे पर्यंत पुन्हा पॅरोल रजा मंजूर करण्यात आली होती. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने त्याने रजा वाढवून मिळावी या विनंतीसह त्याने 8 मे रोजी न्यायालयात पुन्हा अर्ज दाखल केला होता. 

त्यानुसार, 24 मे पर्यंत पॅरोल रजा वाढवून देण्यात आली होती. ही रजा संपत आल्याने गवळी याने काल तिसऱ्यांदा पॅरोलसाठी अर्ज केला होता. मात्र, त्याचा हा विनंती अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला असून त्याला मुंबई येथील तळोजा कारागृह प्रशासनाकडे शरण येण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याला 20 मे 2008 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानुसार, तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. गवळीतर्फे ऍड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली. या प्रकरणी न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख