आयाराम आणि निष्ठावंतांचा वाद पेटला, अन् आमदारांनी काढता पाय घेतला... - the argument between ayaram and loyalists erupted and mla took a step back | Politics Marathi News - Sarkarnama

आयाराम आणि निष्ठावंतांचा वाद पेटला, अन् आमदारांनी काढता पाय घेतला...

राजेश चरपे
बुधवार, 13 जानेवारी 2021

प्रत्येक जिल्हाप्रमुखांनी आपआपल्या समर्थकांची शिवसेनेत वर्णी लावली होती. प्रकाश जाधव हे जिल्हाप्रमुख मंगेश कडव यांच्यामुळे अडचणीत आले. यापूर्वी शेखर सावरबांधे आणि सतीश हरडे जिल्हाप्रमुख होते. त्यांच्याही कार्यकारिणीवर सर्व खूष नव्हते.

नागपूर : दुष्यंत चतुर्वेदी विधानपरिषदेवर निवडून आल्यानंतर शिवसेनेने त्यांच्यावर शहराची जबाबदारी सोपवली. मग कार्यकारिणी गठित करताना त्यांनी साहजिकच आपल्या समर्थकांना झुकते माप दिले. पण हे करताना जुन्या निष्ठावंतांना पदावनत केले. त्यामुळे आयाराम आणि निष्ठावंतांमध्ये चांगलाच वाद पेटला. आता समन्वय समिती स्थापन करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी शिवसैनिकांचा रोष बघून शहराचे संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांनी काढता पाय घेतला.

शिवसेनेच्या कार्यकारिणीवरून निष्ठावंत आणि आयाराम यांच्यातील वाद समन्वयकांसमोरच विकोपाला गेला. विशेष म्हणजे सोमवारी सेनेचे समन्वयक यांच्यासमोरच दोन्ही गटाची जुंपली होती. शहराच्या कार्यकारिणीनंतर विधानसभा प्रमुखांपासून तर शाखा प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. त्यामुळे एकदमच भडका उडाला. दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सोमवारी पूर्व विदर्भाचे समन्वयक प्रकाश वाघ नागपूरला आले होते. सायंकाळी रवी भवन येथे झालेल्या बैठकीत गरमागरम चर्चा झाली. अनेकांनी राजीनामे दिले. शिवसैनिकांचा रोष बघून शहराचे संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांनी काढता पाय घेतला.
 
सतीश हरडे, शेखर सावरबांधे हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. त्यांना सन्मानाचे पद देण्यात आले नाही. उलट डिमोशन केले. हरडे यांनी तत्काळ आपण काम करण्यास इच्छुक नसल्याचे वरिष्ठांना कळविले. सावरबांधे यांनी वादात पडण्याऐवजी मौन बाळगले होते. मात्र त्यानंतर केलेल्या कार्यकारिणीच्या विस्तारामुळे तेसुद्धा चिडले. समन्वयकांसमोर त्यांनीसुद्धा आपली नाराजी स्पष्ट केली. काही निष्ठावंतांनी काहीच फरक पडत नसल्याने बैठकीला येण्याचे टाळले. 
दुष्यंत चतुर्वेदी यांनी कार्यकारिणी तयार करताना आपल्या समर्थकांना प्रमुख पदांवर नेमले. 

यांपैकी बहुतांश काँग्रेसमधून अलीकडेच आले आहे. त्यातही ‘बाबुजी‘ यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. दक्षिण नागपूर लढायचेच असल्याने प्रमोद मानमोडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना प्रभारी जिल्हा प्रमुख करण्यात आले. माजी नगरसेवक दीपक कापसे हे सतीश चतुर्वेदी यांचे कट्टर समर्थक समजले जातात. त्यांनी काँग्रेस सोडून सेनेत प्रवेश केला असून त्यांच्या गळ्यात शहर प्रमुखाची माळ टाकण्यात आली. हीच बाब निष्ठावंत शिवसैनिकांना खटकत आहे. 

वादाची परंपरा 
प्रत्येक जिल्हाप्रमुखांनी आपआपल्या समर्थकांची शिवसेनेत वर्णी लावली होती. प्रकाश जाधव हे जिल्हाप्रमुख मंगेश कडव यांच्यामुळे अडचणीत आले. यापूर्वी शेखर सावरबांधे आणि सतीश हरडे जिल्हाप्रमुख होते. त्यांच्याही कार्यकारिणीवर सर्व खूष नव्हते. सावरबांधे जिल्हाप्रमुख असताना रेशीमबाग येथील शिवसेनेच्या कार्यालयात राडा झाला होता. यावेळी जिल्हाप्रमुखांऐवजी शहर संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांच्या हाती सर्व सूत्र देण्यात आली आहेत.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख