नागपूर : राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे मूळ गाव पाटणसावंगी ग्रामपंचायतीवर केदार पॅनलचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. येथील १७ही जागांवर केदारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. जिल्ह्यात झालेल्या प्रत्येक निवड निवडणुकीत सुनील केदार यांचे वर्चस्व त्यांनी सिद्ध केले आहे.
आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर केदार गटाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. तेव्हाच कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी सुरू केली होती. कोरोना काळामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडेल, असे मानले जात होते. पण याही परिस्थितीत कोरोनाच्या नियमांना बाजूला सारत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. सोशल डिस्टंसिंग विसरून गुलाल उधळत आज सर्वत्र जल्लोष सुरू आहे.
युवा उमेदवारावर मतदार दाखवत आहेत विश्वास, प्रस्थापितांना हादरे..
ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा मतदारांनी युवा उमेदवारांवर विश्वास दाखविला आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालात सर्वाधिक तरुण उमेदवार विजयी होत आहेत. युवा मुसंडी मारत असल्याने प्रस्थापितांना हादरे बसत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील 925 ग्रामपंचायतींमधील आठ हजार 101 जागांसाठी आज सकाळी नऊ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आता हाती आलेल्या माहितीनुसार 110 ग्रामपंचायतीचे निकाल घोषित झाले आहेत. यात निवडणूक येणाऱ्यामध्ये युवा, तरुण उमेदवारांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यातील 925 ग्रामपंचायतींची मतमोजणी सकाळी नऊ वाजतापासून तालुकास्तरावर सुरू झाली आहे. 16 तालुक्यांत 15 टेबलांवर मतमोजणी सुरू आहे. संबंधित तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या संख्येनुसार फेरींची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. साधारणतः 15 फेऱ्या प्रत्येक तालुक्यात होणार आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले. दुपारी चार वाजेपर्यंत जिल्ह्यातील स्थिती स्पष्ट होणार आहे.
Edited By : Atul Mehere

