अमरावती शिक्षक मतदारसंघ : भाजपची उमेदवारी डॉ. नितीन धांडे यांना ! - amravati teachers constituency bjp candidature to dr nitin dhande | Politics Marathi News - Sarkarnama

अमरावती शिक्षक मतदारसंघ : भाजपची उमेदवारी डॉ. नितीन धांडे यांना !

सुरेंद्र चापोरकर
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत शिक्षक संघटनांचे बळ अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, काही प्रस्थापित संघटनांचे एकाच विचारसरणीचे दोन उमेदवार रिंगणात येण्याचे संकेत आहेत. शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणाऱ्या काही संघटना खिळखिळ्या झाल्याची चर्चा असून त्याचा लाभ उचलण्याची रणनीती आखण्यात येत असल्याची माहिती आहे.

अमरावती : विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यामध्ये अमरावतीच्या डॉ. नितीन धांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी, असाच सामना रंगणार आहे. पण आघाडीच्या उमेदवाराची घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे हा सामना नेमका कसा रंगणार, यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे. 

डॉ. नितीन धांडे हे विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष आहेत. शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच अधिकृतपणे आपला उमेदवार रिंगणात आणला आहे. यासोबतच राज्यात सत्तेत असलेल्या महाआघाडीचे उमेदवार मंगळवारी जाहीर होणार आहेत. राष्ट्रीय पक्ष प्रत्यक्षपणे शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत पहिल्यांदाच उतरल्याने उमेदवारांत चांगलीच चुरस वाढण्याचे संकेत आहेत. डॉ. नितीन धांडे हे गेल्या दहा वर्षांपासून विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आहेत. अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेनंतर ही सर्वांत मोठी शैक्षणिक संस्था असल्याचे मानले जाते.

कोणत्या प्रतिस्पर्ध्याचा करावा लागणार सामना ?
भाजपकडून अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आलेला नाही. त्यामुळे धांडे यांना कोणत्या प्रतिस्पर्ध्याचा सामना करावा लागणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शिक्षक संघटनांचे बळ महत्त्वाचे ठरणार
शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत शिक्षक संघटनांचे बळ अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, काही प्रस्थापित संघटनांचे एकाच विचारसरणीचे दोन उमेदवार रिंगणात येण्याचे संकेत आहेत. शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणाऱ्या काही संघटना खिळखिळ्या झाल्याची चर्चा असून त्याचा लाभ उचलण्याची रणनीती आखण्यात येत असल्याची माहिती आहे.

(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख