'आचार्य ठाकरे, पवार आणि थोरात यांचं हभप यांच्याशी काय वाकडं ?' - acharya thackeray pawar and Thorat why angried on temples | Politics Marathi News - Sarkarnama

'आचार्य ठाकरे, पवार आणि थोरात यांचं हभप यांच्याशी काय वाकडं ?'

जयेश गावंडे
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

वंचितच्या तिकिटावर नांदेड लोकसभेची निवडणूक लढवलेले व सव्वा लाखाच्या जवळपास मते घेतलेले यशपाल भिंगे व चंद्रपूर येथून वंचितच्या तिकिटावर विधानसभा लढवलले अनिरुद्ध वनकर यांची नावे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेसाठी राज्यपालांकडे पाठविलेल्या यादीत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीकडे त्या लायकीचे नेते नसल्याने त्यांनी वंचितचे नेते पळविले असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर केला.

अकोला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा आचार्य असा उपरोधिक उल्लेख करीत या आचार्यांचं हभप यांच्यासोबत काय वाकडं आहे, असा सवाल वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी करून राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी केली. मॉल, दारुची दुकाने सुरू होऊ शकतात, तेथून कोरोना पसरत नाही आणि मंदिरे उघडली तर कोरोना कसा होईल, असाही प्रश्न त्यांनी राज्य सरकारला विचारला. 

श्री आंबेडकर म्हणाले, या आचार्यांना हभपचा असा कोणता राग आलेला आहे की, तो राग ही मंडळी मंदिरांवर काढत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि तात्पुरते रुग्णालये सुरू करण्याची क्षमता देवस्थानांची आहे. महाराष्ट्राची श्रद्धास्थाने असलेली नावाजलेल्या सर्व मोठ्या मंदिरांनी राज्य सरकारला ऑफर दिली आहे की, तुम्ही भक्तांसाठी मंदिरं खुली करा. येणाऱ्या सर्व भक्तांची तपासणी आम्ही करतो, पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांवर उपचारही करतो. शासन सांगेल तेथे आम्ही कोविड सेंटर सुरू करतो. त्याचा कुठलाही भार आम्ही शासनावर येऊ देणार नाही. तरीही मंदिरं उघडायला परवानगी का दिली जात नाही, हे कोडे न उलगडणारे आहे. 

वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञ सांगतात की, कोविडची दुसरी, तिसरी, चौथी लाट येणार आहे. त्यांचं म्हणण आपण मान्य केलं पाहिजे. परंतु लॉकडाऊन करुन आणि लोकांना घरांत कोंडूनही लोकांचे जीव वाचवता येत नाही, हे एव्हाना लक्षात आले आहे. त्यामुळे वैद्यकीय दृष्ट्या रुग्णांची काळजी घेणेच गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. विधान परिषद निवडणुकीबाबत ते म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना विधान परिषदेसाठी नामनिर्देशित केल्याने या दोन्ही पक्षांतील नेत्यांची लायकी किती हे दिसून येते. बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आटोपल्यानंतर प्रथमच अकोल्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पुन्हा एकदा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. 

वंचितच्या तिकिटावर नांदेड लोकसभेची निवडणूक लढवलेले व सव्वा लाखाच्या जवळपास मते घेतलेले यशपाल भिंगे व चंद्रपूर येथून वंचितच्या तिकिटावर विधानसभा लढवलले अनिरुद्ध वनकर यांची नावे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेसाठी राज्यपालांकडे पाठविलेल्या यादीत आहे. त्यावर बोलताना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे त्या लायकीचे नेते नसल्याने त्यांनी वंचितचे नेते पळविले असल्याचा आरोप केला.     (Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख