कॉंग्रेससोबत वाटाघाटी करताना बरोबरीचा वाटा मागू : प्रफुल्ल पटेल - when negotiating with the congress ask for an equal share praful patel | Politics Marathi News - Sarkarnama

कॉंग्रेससोबत वाटाघाटी करताना बरोबरीचा वाटा मागू : प्रफुल्ल पटेल

अतुल मेहेरे
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

आजी माजी मंत्रीपुत्रांना अध्यक्षपदाची संधी दिल्यास जिल्ह्यातील कार्यकर्त्यांत संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रेष्ठी या दोन्ही नावांवर विचार करणार नाहीत. तिसरेच नाव वेळेवर पुढे येणार, हे निश्चित.

नागपूर : आज राज्यात आपली स्थिती चांगली आहे. आपल्याकडे सत्ता आहे, गृहमंत्रालय आणि कामगार, गृहनिर्माण यांसारखी महत्त्वाची खाती आहेत. पक्ष वाढविण्यासाठी ही चांगली नामी संधी आपल्याला आहे. विदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य प्रत्येक कार्यकर्त्याने ठेवले पाहिजे. कॉंग्रेससोबत वाटाघाटी करताना आपण आता बरोबरीचा वाटा मागू, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले. 

शहरातील जय जवान जय किसान संघटनेचे प्रमुख, आंदोलक नेते म्हणून ओळखले जाणारे प्रशांत पवार यांनी काल रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. पवार यांच्या पक्षात स्वागताच्या वेळी श्री पटेल बोलत होते. पवार यांच्या येण्याने राष्ट्रवादी अधिक मजबूत होईल, असेही ते म्हणाले. पक्षाचे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष दोघेही निष्क्रिय आहे, अशी ओरड कार्यकर्त्यांकडून सातत्याने होत आहे. यावरून शहर आणि जिल्हा पातळीवरील नेत्यांमध्ये यापूर्वी वादावादीही झाल्याचे काही कार्यकर्ते सांगतात. ज्येष्ठ नेते पटेल यांचा दौरा झाल्यानंतर शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष  दोघांनाही बदलवण्याचा हालचाली वेग घेतील, असे सांगण्यात येत आहे. 

पवार राष्ट्रवादीत येणार या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. चर्चा तर येथपर्यंत होती की, ते थेट शहराध्यक्ष म्हणूनच पक्षात येतील. पण पवारांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी तशी कुठलीही घोषणा ज्येष्ठ नेत्यांनी केली नाही. शहराध्यक्ष कोण, याचे सस्पेन्स अद्यापही कायम आहे. सद्यःस्थितीत महानगरपालिकेत पक्षाचा केवळ एकच नगरसेवक आहे. राज्यात राष्ट्रवादी सत्तेत असल्यामुळे महापालिकेतही नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न पक्ष निश्‍चितपणे करणार. प्रशांत पवार आंदोलक नेते म्हणून ओळखले जातात. नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी शहरात बरीच आंदोलने केली आहे. नुकतेच महानगरपालिकेत सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आंदोलन केले होते. असा नेता शहराध्यक्ष झाल्यास शहरात पक्ष बळकट होईल, असेही मानले जात आहे. पण यासाठी आता श्रेष्ठींच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

जिल्हाध्यक्ष कोण, देशमुख की बंग ?
शहर अध्यक्षाचा निर्णय ज्याप्रमाणे राखून ठेवला आहे, तसाच जिल्हाध्यक्षांचा निर्णय देखील अद्याप झालेला नाही. जिल्हाध्यक्ष पदासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख आणि माजी मंत्री रमेश बंग यांचे सुपुत्र दिनेश बंग या दोघांच्या नावावर विचार सुरू आहे. पण आजी माजी मंत्रीपुत्रांना अध्यक्षपदाची संधी दिल्यास जिल्ह्यातील कार्यकर्त्यांत संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रेष्ठी या दोन्ही नावांवर विचार करणार नाहीत, असे सांगितले जाते. तिसरेच नाव वेळेवर पुढे येणार, हे निश्चित. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे कौशल्य असलेले माजी आमदार सुनील शिंदे यांचे सुपुत्र सतीश शिंदे यांचा विचार जिल्हाध्यक्ष पदासाठी होण्याची शक्यताही पक्षाच्या गोटातून वर्तविली जात आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख