नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांचा १८ हजार ९१० मतांनी पराभव केला. या निवडणुकीला कॉंग्रेसचे सर्व नेते प्रचंड आत्मविश्वासाने सामोरे गेले. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गेल्या महिन्यातच सांगितले होते की, कॉंग्रेसचे अभिजित वंजारी १०१ टक्के विजयी होणार.
विधानपरिषदेची झालेली ही निवडणूक म्हणजे महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात थेट झालेला सामना होय. कधी नव्हे ते कॉंग्रेसचे सर्व नेते एकजुटीने या निवडणुकीच्या प्रचारात लागलेले बघायला मिळाले. असं बोललं जातं की, कॉंग्रेसला जर कुणी पराभूत करू शकत असेल, तर ती फक्त कॉंग्रेस. गटबाजीचे ग्रहण जर सुटले तर कॉंग्रेसला हात लावायची कुणाचीही हिंमत नाही. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत नेमके हेच घडले. कॉंग्रेसमधील गटबाजीचे विसर्जन झाले आणि सर्व नेते एकदिलाने आपल्या उमेदवारासाठी झटले. त्याचा निकाल आज समोर आहे. कॉंग्रेसचे नेते एक झाले तर विजय निश्चित आहे, याचा विश्वास मंत्री विजय वडेट्टीवारांना होता. त्यामुळे त्यांनी गेल्या महिन्यातच या निवडणुकीचा निकाल देऊन टाकला होता.
मंत्री वडेट्टीवार आणि कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी गेल्या महिन्यात ओबीसींच्या मागण्यांसाठी काढलेला मोर्चा लक्षवेधी ठरला. या मोर्चाच्या समारोपीय सभेत ओबीसी कार्यकर्ते मंचावर होते, तर आपल्या पदाची आणि प्रतिष्ठेची झूल उतरवून सर्व नेते खाली जनतेमध्ये बसले होते. त्यामध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे यांच्यासह चंद्रपूर जिल्हा आणि शहरातील नेत्यांचा समावेश होता. या मोर्चाने ओबीसी एकतेचा संदेश गेला. त्याचाही प्रभाव या निवडणुकीवर पडल्याचे निकाल बघून जाणवते. महाविकास आघाडी किती भक्कम आहे, हे या निकालाने दाखवून दिले.

