तुकाराम मुंढेंनी ठणकावले; म्हणाले, कर्मचाऱ्यांची तपासणी करावीच लागेल ! - tukaram mundhe nodded said employees have to be checked strictly | Politics Marathi News - Sarkarnama

तुकाराम मुंढेंनी ठणकावले; म्हणाले, कर्मचाऱ्यांची तपासणी करावीच लागेल !

राजेश प्रायकर
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

आत्तापर्यंत अर्ज करण्यासाठी कुठलाही निश्चित कालावधी नव्हता. परंतु आता व्यापाऱ्यांना परवान्यासाठी अर्ज करण्याकरिता कालावधी निश्चित करण्यात येईल. या कालावधीत अर्ज न केल्यास दुकानेच उघडू शकणार नाही, असा इशारा तुकाराम मुंढेंनी दिला. कोरोनाचे कारण पुढे करून नियम फेटाळून लावणे चालणार नाही, असेही त्यांनी बजावले.

नागपूर : नागपूर हे ३० लाख लोकांचे शहर आहे. हे शहर व्यापाऱ्यांमुळे नव्हे तर या लोकांमुळे चालते. कोरोनासंदर्भातली मार्गदर्शक तत्त्वे पाळायची नसतील तर दुकाने बंद करा. दुकानदार आणि दुकानातील कर्मचारी कोरोनाचे प्रसारक ठरू शकतात. त्यामुळे दुकानदारांना आपल्या कर्मचाऱ्यांची चाचणी करावीच लागेल. नोकर ठेवण्यासाठी पैसे आहेत, पण त्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी पैसे नाहीत काय, असा प्रश्‍न करून हे अजिबात चालणार नाही, असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दुकानदारांना सुनावले. 

नागपुरात महाराष्ट्र महापालिका कायद्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू केली. परंतु व्यापाऱ्यांनी विरोध सुरू केला. त्यामुळे आता परवाने घेण्यासाठी कालावधी निश्चित करण्यात येईल. या कालावधीत परवाना न घेतल्यास दुकाने सुरू ठेवता येणार नाहीत, ही धमकी नसून इशारा असल्याचे आयुक्त मुंढे यांनी स्पष्ट केले. व्यवसायासाठी परवाना घेण्यास विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले. संपूर्ण राज्यातील महापालिकांत व्यवसायाची नोंद करण्यात आली. परंतु नागपुरात नाही. या कायद्याची अंमलबजावणी सुरू केल्याने ‘लायसन्स राज'चा आरोप करीत विरोध केला जात आहे. मी नियमानुसार काम करीत आहे तर लायसेन्स राज कसे?, व्यापारी निवासी इमारतीत व्यवसाय करीत आहेत, त्यांची मनमानी चालेल काय? असा सवाल उपस्थित करून त्यांनी व्यवसायाची नोंदणी होणारच, असे ठणकावले. 

लोकांची दिशाभूल करणे टाळावे, रीतसर नियमानुसार धंदा करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. आता काही व्यापारी संघटनांनी परवान्यासाठी अर्ज करू नये, असे आवाहन व्यापाऱ्यांना केले आहे. आत्तापर्यंत अर्ज करण्यासाठी कुठलाही निश्चित कालावधी नव्हता. परंतु आता व्यापाऱ्यांना परवान्यासाठी अर्ज करण्याकरिता कालावधी निश्चित करण्यात येईल. या कालावधीत अर्ज न केल्यास दुकानेच उघडू शकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. कोरोनाचे कारण पुढे करून नियम फेटाळून लावणे चालणार नाही, असेही त्यांनी बजावले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख