पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी भाजपच्या बाजुने : मुंढेंना पाठिंबा दिला नाही ! 

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय हे सुद्धा संचालक म्हणून कालच्या बैठकीला उपस्थित होते. दोघेही सनदी अधिकारी असताना त्यांनीही अतिशय सावधपणे आणि अप्रत्यक्षपणे तुकाराम मुंढेंचा विरोधच केला.
Tukaram Mundhe-upadhyay-ravindra thakr
Tukaram Mundhe-upadhyay-ravindra thakr

नागपूर : प्रशासनातील सनदी अधिकारी म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते रुबाबदार व्यक्तीमत्व. मागेपुढे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांचा लवाजमा. जनतेत फारसा न मिसळणारा पण जनहिताची कामे करणारा आणि राजकारणाशी थेट संबंध नसणारा व्यक्ती. पण हल्ली प्रशासनातील अधिकारीसुद्धा राजकारणाचा एक भाग होत असल्याचे जाणवते आहे. पालिकेचे आयुक्त अमुक पक्षाने पाठवलेले, तर पोलीस आयुक्त तमुक पक्षाचे, असे वारंवार ऐकायला मिळते. स्मार्ट सिटीच्या सीईओपदावरुन काल घडलेल्या घडामोडींनी अधिकाऱ्यांचेही राजकीय विभाजन होत असल्याची बाब अधोरेखीत केली. 

महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपणच नागपूर स्मार्ट ऍन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे सीईओ असल्याचे सांगत स्मार्ट सिटीचा कारभार चालवण्याचा प्रयत्न केला. त्याला महापौर संदीप जोशींनी कडाडून विरोध केला. त्यानंतर आधीपासूनच सुरू असलेला आयुक्त आणि सत्ताधारी हा संघर्ष अधिक तीव्र झाला. गेल्या काही महीन्यांत विविध आरोप प्रत्यारोप झाले. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी आपल्याला सीईओ पद सांभाळण्यासाठी फोनवरुन सांगितल्याचे आयुक्त मुंढे अगदी कालपर्यंत सांगत आले. 

कालच्या बैठकीत "तुम्ही स्मार्ट सिटीचे सीईओ नव्हतेच', असे परदेशींनी ठासून सांगितल्यामुळे आयुक्तांची मोठी पंचाईत झाली. भर बैठकीत त्यांच्यावर खजिल होण्याचा प्रसंग आला आणि सर्व संचालकांमध्ये ते एकटे पडल्याचे दिसून आले. कालच्या सभेत सत्ताधारी आणि सर्व अधिकारी नियमांनुसार जे आहे, तेच झाले पाहीजे असा सूर आवळताना दिसले. पण मुंढे एकाकी का पडले, याच्या खोलात जाऊन माहिती घेतली असता जाणकारांकडून काही तथ्ये समोर आली. 

महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे आले तेव्हापासून त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यांनी आणलेले प्रकल्प थांबविले. मंजूर झालेली कामे निधी नसल्याचे कारण पुढे करीत थांबविली. स्मार्ट सिटीचे सीईओपदही त्यासाठीच त्यांनी बळकावले होते, असेही सांगण्यात येते. आयुक्तांनी येथे केलेल्या कामांची दखल राज्यात प्रमुख सत्ताधारी असलेल्या शिवसेनेकडून प्रत्येक वेळी घेण्यात आली. मग तो नागपुरातल्या नद्यांच्या स्वच्छतेचा विषय असो, की कोरोनाच्या लढ्यात कोवीड केअर सेंटर उभारण्याचा. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्येक वेळी ट्‌विटरवर आयुक्त मुंढेंचे कौतुक केले आहे. 

स्मार्ट सिटीचे अध्यक्ष प्रवीण परदेशी भाजपमधील मंडळीच्या निकटतम असल्याचे सांगण्यात येते. आयुक्त मुंढे यांना शिवसेनेच्या मंडळींकडून सातत्याने पाठींबा मिळत आला आहे. कालच्या बैठकीतही एकमेव शिवसेनेच्या नगरसेवक मंगला गवरे याच फक्त मुंढेंच्या समर्थनार्थ बोलल्या. परदेशींनी कालच्या बैठकीत पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडूनच कौल दिला. त्यामुळे मुंढेंना शिवसेनेचा पाठींबा असल्यामुळेच भाजपशी सलगी ठेवून असलेल्या परदेशींनी स्वतः प्रशासनातील अधिकारी असतानाही मुंढेविरोधी भूमिका घेतल्याचे सांगितले जाते.

शिवसेनेने परदेशींची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन उचलबांगडी केली होती. हेसुद्धा त्यामागील एक कारण असल्याची चर्चा आहे. याशिवाय जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय हे सुद्धा संचालक म्हणून कालच्या बैठकीला उपस्थित होते. दोघेही सनदी अधिकारी असताना त्यांनीही अतिशय सावधपणे आणि अप्रत्यक्षपणे तुकाराम मुंढेंचा विरोधच केला. यामागेही पक्षीय राजकारणच असल्याचे सांगण्यात येते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com