नागपुरात शिवसेनेने कॉंग्रेसला पाडले खिंडार, भागीदारीचा धर्म तोडला ! - shiv sena overthrows Congress in nagpur breaks religion of partnership | Politics Marathi News - Sarkarnama

नागपुरात शिवसेनेने कॉंग्रेसला पाडले खिंडार, भागीदारीचा धर्म तोडला !

राजेश प्रायकर
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

माजी पालकमंत्री व काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र शिवसेनेचे आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांनी अस्वस्थ काँग्रेस नेत्यांना सेनेत येण्याचे आमंत्रण दिले. दक्षिण नागपुरातील माजी नगरसेवक दीपक कापसे, पूर्व नागपुरातील माजी नगरसेवक नाना झोडे यांनी त्यांचे आमंत्रण स्वीकारत काल शिवसेनेत प्रवेश केला. 

नागपूर : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांनी महाविकास आघाडी करून सत्ता स्थापन केली. पण राज्यात कुठे न कुठे सत्तेतील भागीदारी पक्षांमध्ये कार्यकर्त्यांच्या पळवापळवीवरून वाद झालेले आणि मग नंतर निवळलेले बघायला मिळाले. नागपुरातही शिवसेनेने कॉंग्रेसचे कार्यकर्ते फोडून खिंडार पाडले. त्यामुळे सत्तेतील भागीदारीचा धर्म शिवसेनेने पाळला नाही आणि सत्तेत भागीदार असलेल्या सहकारी पक्षाचा ‘गेम’ केल्याची चर्चा शहरात जोरात सुरू आहे. 

माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे खंदे समर्थक असलेल्या दोन माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. यात प्रदेश काँग्रेसचे माजी महासचिव दीपक कापसे व शहर काँग्रेसचे महासचिव नाना झोडे या मोठ्या नावांचा समावेश आहे. शहर काँग्रेसमधील अडगळीत पडलेल्या अनेकांमध्ये राजकीय भवितव्याबाबत अस्वस्थता दिसून येत आहे. ही संधी साधत माजी पालकमंत्री व काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र शिवसेनेचे आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांनी अस्वस्थ काँग्रेस नेत्यांना सेनेत येण्याचे आमंत्रण दिले. दक्षिण नागपुरातील माजी नगरसेवक दीपक कापसे, पूर्व नागपुरातील माजी नगरसेवक नाना झोडे यांनी त्यांचे आमंत्रण स्वीकारत काल शिवसेनेत प्रवेश केला. 

दीपक कापसे यांनी महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचीही जबाबदारी पार पाडलेली आहे. ते अखिल भारतीय काँग्रेसचे निमंत्रित सदस्य तसेच काही काळ प्रदेश काँग्रेसचे महासचिवही होते. नाना झोडे शहर काँग्रेसचे महासचिव आहेत. दीपक कापसे यांच्या सेनेतील प्रवेशामुळे दक्षिण नागपुरात काँग्रेसला चांगलाच धक्का बसला आहे. कापसे व झोडे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे कट्टर समर्थक आहेत. या दोघांसह माजी नगरसेविका कुमुदिनी कैकाडे यांचे पती श्रीकांत कैकाडे, अंकुश भोवते, विष्णू बनपेला, अविनाश मैनानी, रमेश अंबरते, गंगाधर गुप्ता या काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्यांनीही सेनेत प्रवेश केला. 

त्यांच्यासह भीम आर्मीचे हरीश रामटेके, भाजपा झोपडपट्‍टी सेलचे माजी उपाध्यक्ष सुधाकर वानखेडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सेनेत प्रवेश केला. चतुर्वेदी यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, निर्मल-उज्ज्वल समूहाचे प्रमुख प्रमोद मानमोडे, विशाल बरबटे, बंडू तळवेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

(Edited By : Atul Mehere)
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख