करोडपती गल्लीत होऊ लागल्या शिवसेनेच्या बैठका, निष्ठावंत झाले अस्वस्थ  - shiv sena meetings started taking place in crorepati lane loyalists became restless | Politics Marathi News - Sarkarnama

करोडपती गल्लीत होऊ लागल्या शिवसेनेच्या बैठका, निष्ठावंत झाले अस्वस्थ 

राजेश चरपे 
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

नव्या दमाचे तसेच युवा नेते दुष्यंत चतुर्वेदी सर्वांना एकत्रित करून शिवसेना भवनात आणतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, त्यांनी भवनाऐवजी बंगल्याला प्राधान्य दिले. यासंदर्भात एका माजी पदाधिकाऱ्याने आमचा नाइलाज होता. नेत्यांची मर्जी सांभाळावी लागते. त्यामुळे बंगल्यात बैठकीला जावे लागले.

नागपूर : आत्ताआत्तापर्यंत शिवसैकांच्या बैठका शिवसेना भवनमध्ये व्हायच्या. पण नवनियुक्त संपर्कप्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांनी शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांच्या आढावा बैठका त्यांच्या करोडपती गल्लीतील बंगल्यावर घेतल्या. शिवसेनेतही आता बंगला संस्कृती फोफावत असल्याने निष्ठावंत शिवसैनिक अस्वस्थ झाल्याचे जाणवत आहे. 

उच्चशिक्षित नेत्यांच्या आगमनामुळे शिवसैनिकांच्या बैठका आता शिवसेना भवनाऐवजी बंगल्यात होऊ लागल्या आहेत. शिवसेनेतही काँग्रेसी कल्चरचा शिरकाव होऊ लागल्याने उपराजधानीतील निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता दिसत आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांनी दोन दिवस शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांच्या आढावा बैठकी त्यांच्या करोडपती गल्लीतील बंगल्यात घेतल्या. सर्व पदाधिकाऱ्यांची ओळख तसेच विधानसभानिहाय महापालिकेच्या निवडणुकीची चाचपणी यात करण्यात आली. बैठकीला सर्वच आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. 

नागपूरमध्ये शिवसेनेची दोन भवने आहेत. रेशीमबाग येथील भवन अनेक वर्षे बंद होते. ते ताब्यात घेण्यावरून यापूर्वी राडेही झाले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी किशोर कुमेरिया यांनी ते सुशोभित केले. दुसरे भवन बैधनाथ चौकात असून त्याचा वापर फारसा होताना दिसत नाही. जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांनी काही बैठका येथे घेतल्या. महापालिकेच्या निवडणुकीत या भवनाचा वापर झाला होता. 

नव्या दमाचे तसेच युवा नेते दुष्यंत चतुर्वेदी सर्वांना एकत्रित करून शिवसेना भवनात आणतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, त्यांनी भवनाऐवजी बंगल्याला प्राधान्य दिले. यासंदर्भात एका माजी पदाधिकाऱ्याने आमचा नाइलाज होता. नेत्यांची मर्जी सांभाळावी लागते. त्यामुळे बंगल्यात बैठकीला जावे लागले. शिवसेना भवनात बैठक झाली असती तर अधिक मोकळेपणाने बोलता आले असते, असे नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले. 

पावलावर पाऊल 
माजी पालकमंत्री, काँग्रेसचे दिग्गज नेते सतीश चतुर्वेदी यांनीही काँग्रेसचे स्वतंत्र कार्यालय उघडले होते. माजी खासदार विलास मुत्तेमवार गटाशी वाद झाल्यानंतर त्यांनी देवडिया काँग्रेस भवनमध्ये जाणे टाळले. त्याऐवजी एचबी टाऊन येथे काँग्रेसच्या बैठका घेतल्या जात होत्या. राज्यातील आणि केंद्रातील अनेक नेतेही त्यावेळी त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहत होते. त्यांच्या समर्थकांच्या महापालिकेच्या उमेदवारांच्या मुलाखती व एबी फॉर्मचे वाटपही येथूनच केले जायचे. यावरून अनेकदा वादही झाले. मात्र, देवडियात त्यांनी पाय ठेवला नाही. निवडणुकी दरम्यान राज्याचे निरीक्षक आले असतानाही त्यांनी देवडियात येणे टाळले. तसेच आपल्या समर्थकांनाही जाऊ दिले नव्हते. त्यामुळे सदर येथील एका हॉटेलमध्ये काँग्रेसची बैठक घेण्यात आली होती.      (Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख