संदीप जोशी आमदार होणारे पाचवे महापौर ठरणार ? - sandeep joshi to be fifth mla | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

संदीप जोशी आमदार होणारे पाचवे महापौर ठरणार ?

अतुल मेहेरे
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

महापौरपद भाजपचे युवा तडफदार नेते संदीप जोशी भूषवीत आहेत आणि तेसुद्धा पदवीधर मतदारसंघात नशीब अजमावत आहेत. चार महापौर यशस्वीपणे आमदार बनल्यानंतर संदीप जोशी निवडून येतील आणि आमदार होतीलच, असा विश्‍वास भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांना आहे. 

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचे उमेदवार महापौर संदीप जोशी निवडणूक लढवीत आहेत. महानगरपालिकेच्या इतिहासात यापूर्वी चार महापौर पुढे विधानसभा आणि विधानपरिषदेचे आमदार झाले, तर काही महापौरांची कारकीर्द संपुष्टात आली. आताही महापौर निवडणूक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवीत आहेत, त्यामुळे ते आमदार होणारे पाचवे महापौर ठरणार का, याची उत्सुकता नागपूरकरांना लागलेली आहे. 

नगरसेवकापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारे अनेक जण पुढे महापौर, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री झालेले या नागपूरने बघितलेले आहे. तर महापौर झाल्यानंतर महानगरपालिकेच्या सर्कलबाहेर पडू न शकलेले आणि तेथेच कारकीर्द संपुष्टात आलेले नेतेही जनतेने बघितले आहे. देवेंद्र फडणवीस महापौर होते, पुढे ते आमदार, विरोधी पक्ष नेते, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री झाले. सध्या ते विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. भाजपचे नेते प्राध्यापक अनिल सोले महापौर होते आणि नंतर त्यांनी पदवीधर मतदारसंघात नशीब अजमावले, तेसुद्धा आमदार झाले. 

भाजपचे शहराध्यक्ष, आमदार प्रवीण दटके महापौर होते, तेसुद्धा मोठ्या सभागृहात आमदार म्हणून कार्य करीत आहेत. त्यानंतर कॉंग्रेसचे नेते विकास ठाकरे हे सुद्धा महापौर होते. सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते, दोन वेळा आमदार राहिलेले सुधाकर देशमुख यांचा पराभव करून ते आमदार झाले. त्यांची महापौरपदाची कारकीर्द यशस्वी समजली जाते. आता महापौरपद भाजपचे युवा तडफदार नेते संदीप जोशी भूषवीत आहेत आणि तेसुद्धा पदवीधर मतदारसंघात नशीब अजमावत आहेत. चार महापौर यशस्वीपणे आमदार बनल्यानंतर संदीप जोशी निवडून येतील आणि आमदार होतीलच, असा विश्‍वास भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांना आहे. 

महापौरपद उपभोगल्यानंतर कारकीर्द संपुष्टात आली अशा नावांची यादीही भलीमोठी आहे. त्यामध्ये आघाडीवर आहेत ते अटलबहादूर सिंह. अपक्ष लढलेले अटलबहादूर सिंह हे कॉंग्रेस विचारधारेचे होते. ते दोन वेळा नागपूरचे महापौर होते. लोकदल गटामार्फत त्यांनी अनेकांचे करिअर बनवले. महानगरपालिकेच्या राजकारणात त्यांना ‘किंगमेकर’ म्हणून ओळखले जायचे. भारतीय जनता पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. पण ते निवडून नाही येऊ शकले. किंगमेकर असले तरीही राजकारणात महानगरपालिकेच्या सर्कलबाहेर ते पडू शकले नाही. महापौर बनल्यानंतर ज्यांची कारकीर्द संपुष्टात आली असे म्हणता येईल, त्यामध्ये कॉंग्रेसचे नरेश गावंडे, अपक्ष राजेश तांबे, अपक्ष किशोर डोरले आणि भाजपच्या कल्पना पांडे, माया इवनाते, अर्चना डेहनकर आणि नंदा जिचकार यांचा समावेश आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख