कोरोनावरही राजकारण, भाजप आमदारांचा थोरातांच्या बैठकीवर बहिष्कार - politics on corona too bjp mlas boycott thorat meeting | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनावरही राजकारण, भाजप आमदारांचा थोरातांच्या बैठकीवर बहिष्कार

राजेश चरपे
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

मुंढे यांच्या परस्पर, कोणालाही विश्वासात न घेता राबवलेल्या नियोजनाचा फटका शहराला बसला आहे. विलगीकरण कक्षाला आता त्यांनी कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतरीत केले. मात्र तेथे डॉक्टरांची काही सुविधा नाही. आलेल्या रुग्णांना थेट मेयो,मेडिकलमध्ये पाठवून ते आपली जबाबदारी ढकलत आहे.

नागपूर : राज्य सरकार कोरोनासारख्या आपदेतही राजकारण करीत असल्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल आयोजित केलेल्या कोरोना आढावा बैठकीवर बहिष्कार घातला. महानगरपालिकेने ठरविलेल्या दिवशी, ठरविलेल्या वेळेवरच पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोरोना या विषयावरच बैठक घेतली. त्यामुळे सरकारला कोरोनाच्या स्थितीचे काही देणे-घेणे नसून त्यांना फक्त राजकारणच करायचे आहे, असा आरोप भाजपच्या आमदारांनी केला.

थोरात यांनी जिल्ह्यातील कोरोनाचा आढाव घेण्यासाठी काल बैठक घेतली. मात्र त्यात सहभागी होण्यास भाजपच्या आमदारांनी नकार दिला. त्यानंतर आमदार गिरीश व्यास, भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार विकास कुंभारे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, उपमहापौर मनीषा कोठे यांनी पत्रकार परिषद घेऊन बहिष्काराची माहिती दिली.

मुंढेंचा फक्त दिखावा
पालिका आयुक्त तुकराम मुंढे आपणच एकटे काम करतो याचा दिखावा करतात. प्रत्यक्षात ते सर्वकाही प्रसिद्धीसाठी करतात. त्यांनी खरच प्रामाणिकपणे काम केले असते तर नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या इतकी वाढली नसती. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची सत्ता आहेत तेथे अडथळे आणण्याचे आदेश राज्य सरकाने दिले असल्याचे दिसते. हे मुंढे यांच्या वागणुकीवरून तसेच त्यांना वरिष्ठ देत असल्याच्या संरक्षणावरून स्पष्ट दिसते असा आरोप यावेळी दयाशंकर तिवारी यांनी केला.

मुंढे यांच्या परस्पर, कोणालाही विश्वासात न घेता राबवलेल्या नियोजनाचा फटका शहराला बसला आहे. विलगीकरण कक्षाला आता त्यांनी कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतरीत केले. मात्र तेथे डॉक्टरांची काही सुविधा नाही. आलेल्या रुग्णांना थेट मेयो,मेडिकलमध्ये पाठवून ते आपली जबाबदारी ढकलत आहे. मेयो,मेडिकलमध्ये पाठवलेले रुग्णांना अनेक तास ताटकळत राहावे लागते. काहींचे मृत्यू वेळेवर उपचार मिळाला नसल्याने झाल्याचा दावाही यावेळी तिवारी यांनी केला.    (Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख