स्पष्टवक्ता, धोके पत्करणारा जिगरबाज योद्धा आणि मुत्सद्दी नेता बाळू धानोरकर - outspoken risky warrior and diplomat balu dhanorkar | Politics Marathi News - Sarkarnama

स्पष्टवक्ता, धोके पत्करणारा जिगरबाज योद्धा आणि मुत्सद्दी नेता बाळू धानोरकर

अतुल मेहेरे
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

भद्रावती नगरपालिकेपासून सुरू झालेला बाळू धानोरकर यांचा प्रवास आज दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचला आहे. कौटुंबिक पार्श्‍वभूमी राजकीय नसतानाही त्यांनी राजकारणात देदीप्यमान यश मिळविले. शिवसेना सोडल्यानंतरही त्यांचा आक्रमक बाणा कायम आहे. व्यस्त जीवनशैली, आंदोलक नेता, स्पष्टवक्तेपणा, धोका पत्करण्याची तयारी, कामातील सातत्य, आत्मविश्‍वास आणि लोकांची योग्य पारख ही त्यांच्या राजकारणाची वैशिष्ट्य़े आहेत.

त्यांचे मार्गदर्शक, मित्र, कुटुंबातील सदस्य सर्वांनी त्यांना समजावून सांगितलं की, तू आमदार आहेस आणि अशा परिस्थितीत पक्ष आणि आमदारकी सोडून खासदारकीच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही. जे आहे ते सुद्धा गमावून बसशील. पण ऐकतील ते ‘बाळूभाऊ’ कसले? त्यांचा निश्‍चय ठाम होता. खासदार व्हायचेच, हा त्यांचा निर्धार पक्का झालेला. त्यांची लढत होती ती भारतीय जनता पक्षाचे बलाढ्य नेते  केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासोबत. कॉग्रेसची उमेदवारी मिळाल्यावरही अनेकांनी त्यांना समजावून बघितले, पण जिद्द म्हणजे जिद्द… आणि इतिहास घडला. त्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून कॉंग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला, तो म्हणजे बाळूभाऊ धानोरकर. त्यांच्या विजयाने अनेक राजकीय दिशा बदलल्या आणि जाणकारांनीही अक्षरशः तोंडात बोटे घातली. महाराष्ट्रात आणि कॉंग्रेसच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले. पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी परवा-परवा यवतमाळ येथे एका कार्यक्रमात त्यांचा ‘इतिहास घडवणारा नेता’, असा गौरव केला.  

चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू नारायण धानोरकर. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर बाळू धानोरकर हे नाव देशभर चमकलं. तुम्हाला पटत असेल तर मत द्या, नाहीतर दुसऱ्या उमेदवाराला द्या, असं जाहीर भाषणात स्पष्ट बोलणारा हा नेता इतिहास घडवेल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण लोकांनी त्यांच्या स्पष्टवक्तेपणावर आणि प्रामाणिकतेवर विश्‍वास ठेवला आणि या इतिहासाचे साक्षीदार झाले. 

५० कामांची केली यादी
तकलादू काम करणे बाळूभांऊना कधी जमलेच नाही. आजच त्यांनी ५० कामांची यादी तयार केली. ही अशी कामे आहेत की, लोकांच्या रोजच्या जगण्यावर थेट परिणाम करतात. यामध्ये वेकोलिपासून ते शेतकऱ्यांपर्यंतच्या विषयांचा समावेश आहे. यातील काही कामे लोकांनी त्यांना सांगितली आहेत. त्यांची भूमिका अशी आहे की, एकदा एक काम पूर्ण केले की दुसऱ्यांदा तो प्रश्‍न उद्भवायला नको. एकाच कामासाठी तेच लोक वारंवार यायला नको. त्यामुळे ‘परमनन्ट सोल्यूशन’ काढण्यावर ते भर देतात. ते म्हणतात, ‘पुन्हा निवडून येण्यापुरती कामे मी कधी करतच नाही. लोकांनाही खोटी आश्‍वासने देत नाही. काम होण्याजोगे नसेल तर स्पष्टच सांगतो.’ त्यामुळे हा स्पष्टवक्ता नेता लोकांना भावला. 

सिनेमाची आवड, कालच बघितला ‘लक्ष्मी’
खासदार बाळू धानोरकर आणि त्यांच्या पत्नी सौ. प्रतिभा धानोरकर दोघांनाही सिनेमा बघण्याची आवड आहे. उद्बोधनात्मक सिनेमे बघण्याकडे त्यांचा कल असतो. कालच त्यांनी आत्ता रिलीज झालेला ‘लक्ष्मी’ हा सिनेमा बघितला. यानंतर किन्नर ज्या परिस्थितीत जगतात, बॉडीमध्ये हार्मोन्स कमीअधिक झाल्यामुळे त्यांचे जीवनच बदलून जातं. समाजातून त्यांना बहिष्कृत केलं जातं. याची माहिती त्यांना आधीही होती, पण हा सिनेमा बघितल्यानंतर त्यांनी किन्नरांसाठी ठोस काम करण्याचा निर्णय काल रात्रीच घेतला. त्यासाठीचे नियोजनही त्यांनी सुरू केलं आहे. लवकरच ते किन्नरांसाठी सकारात्मक काम करणार आहेत, हे निश्‍चित.

जुनी गाणी, गझल्स, वृत्तपत्र आणि क्रिकेट
खासदार आणि आमदार धानोरकर या दोघांनाही जुनी गाणी, गझल्स ऐकायला आवडतात. सिनेमाची आवड प्रतिभाताईंची जास्त आहे, तर बाळूभाऊंना क्रिकेट खेळायला आणि बघायला आवडते. आजही वेळ मिळाला की घरासमोर लहान मुलांसोबत ते क्रिकेट खेळतात. ते स्वतः १७ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील मुलांचे राज्यस्तरीय क्रिकेट सामने खेळलेले आहेत. आत्ता परवा परवा लेदर बॉल क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन करायला गेलेले असताना पॅड आणि हॅंडग्लोज न वापरता त्यांनी बॅटींग केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली. आता वेळ मिळत नसल्यामुळे खेळ सुटला याची खंत त्यांना आहे. प्रकृती उत्तम राखण्यासाठी ते नियमित व्यायाम आणि आहार नियंत्रण करतात. गेल्या दोन - तीन महिन्यांमध्ये त्यांनी १० ते १२ किलो वजन कमी केले आहे. 

वेकोलिची भरती प्रक्रिया चुकीची
वेस्टर्न कोलफिल्डमध्ये भरतीची प्रक्रियाच मुळात चुकीच्या पद्धतीने राबविली जात असल्याचे खासदारांचे म्हणणे आहे. सद्यःस्थितीत त्यांच्या प्रक्रियेमध्ये वैद्यकीय तपासणी शेवटी केली जाते. हे पूर्णपणे चुकीचे आहे. या प्रक्रियेत त्यांना पूर्णपणे बदल करायचा आहे. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र थ्री फेज लाइन त्यांना करायची आहे. याचे कारण म्हणजे संपूर्ण राज्यात १३ हजार मेगावॅट वीज तयार होते. त्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यात ४४२० मेगावॅट वीज तयार होते आणि येथील शेतकऱ्यांना विजेच्या तुटवड्याचा सामना करावा लागतो. त्यामुळे या दोन विषयांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल, पण जिल्ह्यातून या दोन्ही समस्या निकाली काढण्याचा चंग त्यांना बांधला आहे. 

आमदार प्रतिभाताई म्हणतात, आजही अंगावर काटा उभा राहतो....
राजकारण आणि समाजकारण करताना खासदार साहेबांवर गुन्हे दाखल झाले. विरोधकांनी याचा फायदा घेत सत्तेचा दुरुपयोग करून त्यांना दोन वेळा तडीपार केले. गुन्हे दाखल करून त्यांना संपविण्याचा विरोधकांचा कट होता. हेतुपुरस्सर त्यांना अशी वागणूक देण्यात आली. आमच्या घरच्या मुलांचे शाळेत जाणे अवघड होऊन बसले होते. ‘तुम्हारा आदमी तडीपार है’, असे सतत लोकांच्या तोंडून आमच्या कुटुंबीयांना ऐकावे लागत होते. तेव्हा आमचा मोठा मुलगा आठ महिन्यांचा होता. त्याला सोबत घेऊन आम्ही दोघेही महिनाभर बाहेरगावांमध्ये भटकत होतो. ते दिवस आठवले की आजही अंगावर काटा उभा राहतो, असे आमदार प्रतिभाताईंनी सांगितले. 

कार्यकर्ते नव्हे, कुटुंबातील सदस्य
प्रतिभाताई म्हणतात, मी पण शेतकरी कुटुंबातीलच. आमचे संयुक्त कुटुंब होते. माहेरी पण कॉंग्रेसच्या विचारसरणीचे लोक होते. लग्न झाल्यानंतर धानोरकर कुटुंबीयांची सून म्हणून भद्रावतीत आले. तेव्हा पती शिवसेनेत होते. सामाजिक कार्य करण्याची माझी इच्छा आधीपासूनच होती. राजकारणात येण्याचीही सुप्त इच्छा होतीच. साहेबांनी मला प्रोत्साहन दिले आणि त्यांचे पाठबळ आणि मार्गदर्शनामुळेच मी आमदार झाले. जेवढे ते मुत्सद्दी राजकारणी आहेत, तेवढेच प्रेमळ पती आहेत. महिलांनी राजकारणात आले पाहिजे, असे ते नेहमी म्हणतात आणि फक्त म्हणतच नाहीत, तर याची सुरुवात त्यांनी स्वतःच्या घरातून केली. त्यांच्या राजकीय वाटचालीत मी नेहमी सहभागी झाले आहे. राजकारणात वेळ द्यावा लागतो. त्यांचे कार्यकर्ते म्हणजे केवळ कार्यकर्ते नाहीत, तर घरातील सदस्य आहे. त्यामुळेच पक्ष सोडून ऐन वेळेवर दुसऱ्या पक्षात जाऊनही त्यांनी इतिहास घडविला.  

‘तो’ क्षण सर्वाधिक आनंदाचा
आम्ही दोघेही राजकारणात आहोत. पण निर्णय राजकारणातील असो की कुटुंबातील दोघे मिळूनच घेतो. आजही माझ्याशी बोलल्याशिवाय ते निर्णय घेत नाहीत, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्यापेक्षाही सिनेमाची आवड मला जास्त आहे. ते आमदार असताना आम्ही महिन्यातून दोन वेळा तरी सिनेमा बघायला जात होतो. आता तेवढा वेळ मिळत नाही, पण येन केन प्रकाराने सिनेमे बघतोच. मुलांचे, आमचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस कधीच मिस करत नाही. बाहेर फिरायला जाऊन सर्वांचे वाढदिवस साजरे करायला आवडते. लोकसभा निवडणुकीत सर्वांचाच पाठिंबा मिळाला होता. माझ्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारीवरून विरोध सुरू झाला होता. जवळचे लोक दूर गेले. पण अटीतटीच्या लढतीतही मी निवडून आले. दिवसभर बूथवरच होते. साहेबही दिवसभर विविध बूथवर फिरत होते. इतरही मतदारसंघ त्यांना सांभाळायचे होते. मी ज्या बूथवर होते, त्या बूथवर निकाल लागल्यानंतर ते रात्री ११.३० वाजता आले आणि एकमेकांना बघून आमच्या दोघांच्याही डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या, आम्ही दोघांनीही एकाच वेळी सुखाच्या आसवांना वाट मोकळी करुन दिली आणि निशब्द झालो होतो. तो क्षण माझ्या आयुष्यातील अत्याधिक आनंदाचा क्षण होता, असे प्रतिभाताई सांगतात. 

गुड मार्निंग टी…
खासदार साहेबांना कुकींगची फार हौस आहे. एखाद वेळी थोडी फुरसत असली की साहेब किचनचा ताबा घेतात आणि त्यांच्या व सर्वांच्या आवडीचा स्वयंपाक करतात. नाही म्हणायला मी मदत करतेच त्यांची, पण स्वयंपाकातील मुख्य कामे तेच करतात. करुन घाऊ घालण्याची त्यांना भारी आवड आहे. त्यांना सकाळी उठल्याबरोबर चहा लागतो. म्हणून दररोज (जेव्हा घरी असतात तेव्हा) सकाळी चहा तेच करतात आणि आयता मला आणून देतात. मला आता रोजची ती सवय झाली आहे. कधी मुंबई, दिल्लीला असले की सकाळी चहा घेताना त्यांना मिस करते, असे प्रतिभाताई म्हणाल्या. 

खासदार भाऊ
खासदार धानोरकरांचे भाऊ आणि भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर त्यांच्याबाबत सांगतात की, कुटुंबातील सर्वांत लहान असलेले बाळू खासदार झाले. साधारण कुटुंबातील आम्ही चार भावंड. तीन भाऊ आणि एक बहीण. वयाच्या २१ व्या वर्षी मोठा भाऊ आम्हाला सोडून गेला. वडील शिक्षक होते. त्यांच्या बदलीनुसार आमचे गाव आणि शाळा बदलायची. नागभीड, आनंदवन वरोरा आणि वणी येथे त्यांनी शिक्षण घेतले. परप्रांतीय येथे येऊन व्यवसाय करतात, तर आपण का नाही, असे ते नेहमी म्हणत. व्यवसायाची आवड असल्यामुळे सुरुवातीला कपड्यांचे दुकान, नंतर वाहन खरेदीसाठी कर्जपुवठा करणारी कंपनी सुरू केली त्यानंतर भद्रावतीमध्ये बार सुरू केला. कोणताही व्यवसाय लहानमोठा असत नाही, या त्यांच्या म्हणण्यावर ते आजही ठाम आहेत. यातूनच पुढे ते राजकारणात प्रवेशकर्ते झाले आणि आज खासदार आहेत. 

माजी खासदार पुगलियांनी दिला होता कानमंत्र
२००९ च्या निवडणुकीत तत्कालीन खासदारांनी युतीधर्मापासून फारकत घेतली. त्यामुळे बाळूचा दोन हजार मतांनी पराभव झाला. त्यानंतर माजी खासदार नरेश पुगलिया यांची वाढदिवसानिमित्त भेट झाली. पुगलिया यांनी बाळूला कानमंत्र दिला भद्रावती तुमचे गाव आहे आणि वरोरा हे मतदारसंघाचे मुख्यालय आहे. त्यामुळे तेथेच घर बांधून राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्यानंतर एकाच वर्षात २०१० ला बाळू वरोरा येथे रहायला गेला आणि त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत इतिहास घडवला. 

रिस्क घेण्याच्या सवयीने दिले यश
खासदार धानोरकर यांच्या राजकीय जीवनाला दोन दशकं झाली. या कालावधीत त्यांनी एक-एक टप्पा गाठत अल्पावधीत मोठी मजल मारली आणि खासदार झाले. बिनभरोशाच्या राजकारणात नशीब आणि कर्तृत्व अजमावणे, हे कुणीही खासदार धानोरकर यांच्याकडून शिकावे. आमदारकी असताना पक्ष आणि पद सोडून बलाढ्य पक्ष आणि प्रतिस्पर्ध्यासमोर उभे ठाकण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याचे जिगर या असामान्य व्यक्तीने दाखविले. तेव्हा बाळूभाऊ राजकारणातून संपेल, अशी भाकितं वर्तविली जात होती. परंतु घेतलेला निर्णय चुकीचा नसतो, तो योग्य कसा होता, हे सिद्ध करण्याची ताकद असली पाहिजे, हे त्यांनी करून दाखविले. त्यांच्या विजयाला अनेक पदर आहेत. महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे ते एकमेव खासदार आहेत.

हेच रिस्क घेण्याचे धाडस आणि आत्मविश्‍वास त्यांनी वरोरा-भद्रावती विधानसभा निवडणुकीच्या वेळी दाखवून दिला. पत्नीला उमेदवारी देण्याची चर्चा त्यांनी सुरू केली तेव्हा अनेकांनी त्यांना समजावले. पक्षातूनही विरोध झाला. जवळचे लोकं दूर गेले, पण बाळू आपल्या निर्णयावर ठाम होते. पत्नीला उमेदवारी देऊन मातब्बर उमेदवार आणि पक्षाला त्यांनी अक्षरशः धूळ चारली. राजकारणात नवख्या असलेल्या पत्नी प्रतिभा यांना त्यांनी आमदार बनवूनच दम घेतला. या घटना राजकीय डावपेच वाटत असल्या तरी यातून नवा इतिहास घडला. धानोरकर यांच्या राजकीय जीवनात घडलेल्या अनेक घटना पहिल्यांदाच घडल्या. त्या दखलपात्र ठरल्या. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात २० वर्षांनंतर मराठी माणूस खासदार म्हणून निवडून आला. त्यांच्या पत्नी प्रतिभा या वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार आहेत. धानोरकरांनी लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये केंद्रात आणि राज्यात मंत्री असलेल्या बलाढ्य उमेदवारांना पराजित केले, हे विशेष. 

भद्रावती नगरपालिकेपासून सुरू झालेला बाळू धानोरकर यांचा प्रवास आज दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचला आहे. कौटुंबिक पार्श्‍वभूमी राजकीय नसतानाही त्यांनी राजकारणात देदीप्यमान यश मिळविले. शिवसेना सोडल्यानंतरही त्यांचा आक्रमक बाणा कायम आहे. व्यस्त जीवनशैली, आंदोलक नेता, स्पष्टवक्तेपणा, धोका पत्करण्याची तयारी, कामातील सातत्य, आत्मविश्‍वास आणि लोकांची योग्य पारख ही त्यांच्या राजकारणाची वैशिष्ट्य़े आहेत. शेवटी काय तर घरादारावर तुळशीपत्र ठेवल्याशिवाय, संघर्ष केल्याशिवाय राजकारण होत नाही, हेच बाळू धानोरकर यांनी सिद्ध केले आहे.

शब्दांकन : अतुल मेहेरे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख