आता शिक्षक करतील आपले मूळ काम, कोरोनाच्या कामातून झाले मुक्त - now the teachers will do their original work freed from coronas work | Politics Marathi News - Sarkarnama

आता शिक्षक करतील आपले मूळ काम, कोरोनाच्या कामातून झाले मुक्त

मंगेश गोमासे
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

शिक्षकांना शिकविण्याच्या कामाशिवाय इतरच कामे देण्यात येतात. सध्या बरेच शिक्षक कोरोना सर्वेक्षणाच्या कामात व्यस्त आहेत. त्यांनी शाळेत जाऊन ऑनलाइन केव्हा शिकवावे हा प्रश्‍न होता. आता सरकारने आदेश काढले आहे. यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविता येणे शक्य होईल.

नागपूर : सरकारने राज्यात आॅनलाईन शिक्षणाला सुरुवात केली. पण शिक्षकांना मात्र कोविडच्या सर्वेमध्ये गुंतवून ठेवले. त्यामुळे विद्यार्थी ‘आॅनलाईन’पासून वंचित राहिले. शिक्षक संघटनांनी विभागाकडे शिक्षकांना त्यांच्या मूळ आस्थापनेवर पाठवण्याची वारंवार मागणी केली. पण आजपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पण आता शिक्षकांना या कोविड सर्वेतून मुक्त करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे या कामातून शिक्षकांना मुक्ती मिळाली आहे.  

राज्यात ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील बरेच शिक्षक सध्या कोरोनाच्या सर्व्हेक्षणामध्ये व्यस्त असल्याने ऑनलाइन शिक्षण घेणारे विद्यार्थी वाऱ्यावर आहेत. महापालिका आणि शिक्षण विभागाकडे वारंवार मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्यामुळे विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे, हा प्रश्‍न उपस्थित होत होता. त्यामुळे आता यापुढे शिक्षकांना या कामापासून सूट देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेऊन तसा आदेश काढला आहे. 

राज्यात एक जुलैपासून नववी ते बारावीच्या ऑनलाइन शिक्षणास सुरुवात करण्यात आली. शिक्षणमंत्र्यांनी आदेश काढून आता केजी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात करण्याचे निर्देश दिले. मात्र, सध्या बरेच शिक्षक महानगरपालिका आणि जिल्ह्यात कोरोना सर्व्हेक्षणासाठी फिरत आहेत. काही शिक्षक क्वारंटाइन सेंटरवर कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवायचे केव्हा, हा प्रश्‍न शिक्षकांना पडला होता. 

विशेष म्हणजे शिक्षक आणि संघटनांकडून वारंवार पालिका आणि शिक्षण विभागाला शिक्षकांना या कामातून काढून घेत त्यांच्या मूळ आस्थापनांवर पाठविण्यासाठी निवेदने देण्यात आले होते. मात्र, दोन्ही विभागांकडून या विषयाला बगल देण्यात येत असल्याचे चित्र होते. यामुळे आत्तापर्यंत शिक्षक नाक्यावर आणि क्वारंटाइन सेंटरमध्ये कामावर होते. आता सरकारने आदेश काढल्यावर त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

शिक्षकांना शिकविण्याच्या कामाशिवाय इतरच कामे देण्यात येतात. सध्या बरेच शिक्षक कोरोना सर्वेक्षणाच्या कामात व्यस्त आहेत. त्यांनी शाळेत जाऊन ऑनलाइन केव्हा शिकवावे हा प्रश्‍न होता. आता सरकारने आदेश काढले आहे. यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविता येणे शक्य होईल. 
-योगेश बन, कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद.     (Edited By : Atul Mehere)
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख