आता चंद्रपुरात कोरोना वाढला तर... - now if corona grows in chandrapur then what | Politics Marathi News - Sarkarnama

आता चंद्रपुरात कोरोना वाढला तर...

अतुल मेहेरे
रविवार, 16 ऑगस्ट 2020

डॉ. खेमनार जनमानसात लोकप्रिय असल्याने जिल्हाभर त्यांच्या बदलीची चर्चा झाली. त्यामुळे आता जर का कोरोना वाढला, तर जनतेसह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी याचे खापर पालकमंत्र्यांवर फोडण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असेच आजच्या स्थितीवरून दिसते.

नागपूर : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यात कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले होते. त्यांच्या पाठीशी जनाधारही चांगला होता. पण तडकाफडकी त्यांची बदली करण्यात आली. यामध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भूमिका महत्त्वाची होती. खेमनार स्वतः डॉक्टर असल्याचा फायदा कोरोनाच्या नियंत्रणात जिल्ह्याला झाला. त्यांच्या बदलीनंतर आता जर जिल्ह्यात कोरोना फोफावला, तर त्याचे खापर वडेट्टीवारांवर तर फुटणार नाही ना, याची चिंता त्यांच्या समर्थकांना लागली आहे. 

अख्या महाराष्ट्रात जेव्हा कोरोनाने हाहाकार माजवला होता. त्यावेळी म्हणजे सुरुवातीच्या दोन महिन्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. याचे सर्व श्रेय तत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांना देण्यात आले. अधिकारी येतात आणि जातात. प्रशासनाच्या कारभारातील ती एक प्रक्रिया आहे. पण ज्या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाची स्थिती हाताळली होती. त्यामुळे त्यांच्याबाबत जनभावना चांगली होती. बदली करण्याला विरोध मुळी नव्हताच, पण ही स्थिती थोडीफार निवळल्यावर बदली करावी, असा एक सूर उमटला होता. 

पालकमंत्र्यांनी आणखी काही काळ जरी त्यांची बदली टाळली असती, तर या बदलीमध्ये जे राजकारण झाले, तेसुद्धा झाले नसते. कारण डॉ. खेमनार यांची बदली होऊ नये, म्हणून जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार या सर्वांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले. वडेट्टीवार विरुद्ध जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी असे चित्र तेव्हा झाले होते. पण या बदलीच्या राजकारणामध्ये पालकमंत्र्यांनी बाजी मारली. डॉ. खेमनार जनमानसात लोकप्रिय असल्याने जिल्हाभर त्यांच्या बदलीची चर्चा झाली. त्यामुळे आता जर का कोरोना वाढला, तर जनतेसह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी याचे खापर पालकमंत्र्यांवर फोडण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असेच आजच्या स्थितीवरून दिसते. त्यामुळे नवीन आलेले जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यावर कोरोनावर नियंत्रण मिळविण्याची मोठी जबाबदारी आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख