मुंढें म्हणाले, 'त्यांचे' हित दुखावल्याने मला हुकुमशहा म्हणताहेत !  - mundhe said the dictator is saying that it hurts their interests | Politics Marathi News - Sarkarnama

मुंढें म्हणाले, 'त्यांचे' हित दुखावल्याने मला हुकुमशहा म्हणताहेत ! 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 31 मे 2020

मी पूर्णपणे 'परफेक्‍ट' आहे, असा दावा नाही. पण 'परफेक्‍ट' करण्याचा प्रयत्न करतो. कठोर उपाययोजनांची गरज पडली तर तेही करेन, याला कुणी हुकूमशाही म्हणत असेल तर म्हणू द्या, असे प्रतिपादन नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले

नागपूर : "स्टंटबाजी तुम्हाला करता येत असेल. ती माझ्या स्वभावात नाही. मला ऍक्‍शन घेता येते'', असे नमुद करीत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज विरोधकांना टोला हाणलाच, शिवाय इशाराही दिला. "कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेकांचे हित दुखावले गेल्याने हुकूमशहासारखी विशेषणे जोडली जात आहे. आरोप करण्यापूर्वी हुकूमशाह म्हणजे काय? याचा अभ्यास करावा'', असा सल्लाही त्यांनी कुणाचेही नाव न घेता दिला. 

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी अनेकांनी त्यांना प्रश्‍न विचारले. यात एकाने 'तुम्ही स्टंटबाजी करता, हुकूमशहासारखे वागता' अशी 'कमेंट' केली. हीच संधी साधत गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी व विरोधी पक्ष नेत्याने केलेल्या आरोपांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. गेल्या तीन महिन्यांत कधी स्टंट केला?, असा सवाल करीत आयुक्तांनी स्टंटबाजी केली असती तर कोरोनाबाबत केलेल्या उपाययोजनातून जे चांगले परिणाम येत आहे, ते आले नसते, असे सांगितले. जनहितालाच प्राधान्य दिले, प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन स्वतः दुकाने बंद केली. केवळ कोरोनाच नव्हे तर स्वाईन फ्लूही यंदा आटोक्‍यात आहे, असे ते म्हणाले.

यशाचे श्रेय लाटले नाही

आतापर्यंत केवळ दोनच प्रकरणे पुढे आली. मागील वर्षी अडीचशे रुग्ण होते. ही माझी नव्हे तर आरोग्य विभागाची आकडेवारी आहे, असे ते म्हणाले. कायद्यानुसार कामे न करणारा हुकूमशहा असतो. मग मी हुकूमशहा कसा? व्यक्तिगत फायदा न पाहता लोकांचे हित जपणे हुकूमशाही आहे काय? असे प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले. गेल्या अडीच महिन्यांपासून लोकांना सामाजिक संस्थांकडून जेवण देत आहे. यासाठी शासनाने पैसे दिले. पण ते वापरले नाहीत. मी पूर्णपणे 'परफेक्‍ट' आहे, असा दावा नाही. पण 'परफेक्‍ट' करण्याचा प्रयत्न करतो. कठोर उपाययोजनांची गरज पडली तर तेही करेन, याला कुणी हुकूमशाही म्हणत असेल तर म्हणू द्या, असे ते म्हणाले. मी कधीही यशाचे श्रेय लाटले नाही. जे यश मिळत आहे, ते पोलिस, आशा वर्कर, जिल्हाधिकारी, पदाधिकारी, आरोग्य विभागाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

आरोप-प्रत्यारोप करण्याची वेळ नाही 

विलगीकरण केंद्रात उच्च दर्जाचे जेवण दिले. आणखी दर्जेदार अन्नासाठी राधास्वामी सत्संग मंडळाला विनंती केली. सकाळचा नाश्‍ता, दुपार, सायंकाळचे जेवण ते निःशुल्क देत आहेत. मी स्वतः जेवण केले. उत्तम दर्जाचे जेवण आहे. ही आरोप-प्रत्यारोप करण्याची वेळ नाही, असेही ते म्हणाले. जेवणात अळ्या निघतात, हे अत्यंत चुकीचे आहे. पाणी सुद्धा कॅनचे दिले जाते, असेही त्यांनी नमुद केले. 

अन्‌ ट्रोलर्स गायब 

आयुक्तांच्या संपूर्ण फेसबुक लाईव्हदरम्यान अनेकांनी त्यांच्या कार्यशैलीवर टिका केली. एकच कमेंट अनेकांनी केली. त्यामुळे एकूणच 'ट्रोल आर्मी' कार्यरत असल्याचे दिसून आले. मात्र, आयुक्तांनी 'स्टंटबाजी', हुकूमशाहीवरून आपली भूमिका स्पष्ट व सडेतोडपणे नमुद केली. त्यानंतर मात्र टोलर्सनी काढता पाय घेतला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख