भाईगिरीचे वेड; क्राईम सिटीत फेमस होण्यासाठी अल्पवयीन मुलांची धडपड ! - the madness of brotherhood struggle of minors to become fmous in crime city | Politics Marathi News - Sarkarnama

भाईगिरीचे वेड; क्राईम सिटीत फेमस होण्यासाठी अल्पवयीन मुलांची धडपड !

अनिल कांबळे 
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

गेल्या महिन्यात जरीपटक्यात बारमध्ये सशस्त्र दरोडा घालून त्यानंतर पुन्हा दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या ५ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना घटनास्थळावर पायी घेऊन जात असताना त्यांचा व्हीडिओ व्हायरल झाल्याने जरीपटका पोलिस चांगलेच अडचणीत आले होते.

नागपूर : खेळण्या-शिकण्याच्या वयातील किशोरवयीन मुलांना भाईगिरीचे भलतेच वेड लागत आहे. त्यामुळे अशा मुलांचे भविष्य अंधकारमय होण्याची दाट शक्यता आहे. शहरात असलेल्या गुन्हेगारांच्या टोळ्या त्यांना पोषक वातावरण उपलब्ध करून देत आहेत. ‘क्राईम सिटी’ म्हणून ओळख असलेल्या उपराजधानीत गुन्हेगारांच्या टोळ्यांत सहभागी होण्यासाठी १६ ते १८ वयोगटातील युवा धडपड करीत आहेत. या युवांना ‘भाईगिरी’चे वेड लागले असून गुन्हेगारी जगतात फेमस होण्यासाठी टोळीचा सदस्य बनत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकर, राजू बद्रे, सुमोत चिंतलवार, पाजी, सरदार, खान ब्रदर्स, बाल्या या गुंडांमुळे उपराजधानीला गुन्हेपूर अशी ओळख मिळाली. गुन्हेगारी जगतात दबदबा निर्माण केल्यास दहशत निर्माण होते. गुंडगिरीत नाव कमावल्यास खंडणी, वसुली, हप्ता, प्रोटेक्शन मनी आणि चंदा या माध्यमातून बक्कळ पैसा कमावता येतो, अशी धारणा झाल्यामुळे १६ ते २१ या वयोगटातील मुले गुन्हेगारी जगताकडे वळत आहेत. झोपडपट्टी वस्ती, व्यसनाधीन आई-वडील, किंवा विभक्त कुटुंबात जगणारी मुले लवकर वाईट संगतीत येऊन व्यसनाधीन होतात. झटपट पैसा कमवण्यासाठी गुन्हेगारीकडे वळतात. दारू किंवा अमली पदार्थाचा नशा करण्यासाठी लूटमार, वाटमाऱ्या, चोरी, चेनस्नॅचिंग, घरफोडी असे मार्ग पत्करतात. त्यातूनच त्यांचे मन गुन्हेगारीत टॉपवर असलेल्या भाई किंवा दादाकडे वळते. केवळ गुंडगिरीत फेमस होण्यासाठी अल्पवयीन मुले गुंडांच्या टोळीत सहभागी होत असल्याचे चित्र आहे. 
 
शस्त्रांचा खेळ 
शहरातील अनेक टोळ्यांतील सदस्यांकडे पिस्तूल, देशी कट्टे आहेत. त्यामुळे गुन्हेगारीत जम बसविण्यासाठी टोळीच्या सदस्यांकडे देशीकट्टा असतो. चित्रपटांतील भाईगिरीचे सीन पाहून पिस्तूलाचे आकर्षण वाढते. प्राथमिक सदस्यत्व मिळालेल्या युवांना चाकू, तलवार किंवा गुप्ती भेट देण्याची परंपरा आहे. याच कारणामुळे शहरात शस्त्रांच्या तस्करीचे प्रमाण वाढत आहे. 

पोलिसांनी दाखवावे गांभीर्य 
रस्त्यावरून भरधाव आणि दुचाकीवर तीन ते चार जणांनी ओरडाआरडा करीत जाणे, महिलांची छेडछाड, वाटसरूंना त्रास देणे या गोष्टीही वाढल्या आहेत. या सगळ्या बाबींकडे पोलीस प्रशासनाने देखील गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. शाळा, महाविद्यालय, महत्त्वाचे चौक येथे आढळणाऱ्या अशा मुलांची चौकशी करणे, त्यांच्याकडे असलेल्या हत्यारांबाबत तपास करणे, अशा मुलांना बालसुधार गृहात भरती करणे या गोष्टी त्वरीत होणे आवश्‍यक आहे. अन्यथा अशा अल्पवयीन मुलांकडून पुढील काळात मोठे गुन्हे घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

जरीपटका प्रकरणामुळे पोलिस भयभीत 
गेल्या महिन्यात जरीपटक्यात बारमध्ये सशस्त्र दरोडा घालून त्यानंतर पुन्हा दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या ५ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना घटनास्थळावर पायी घेऊन जात असताना त्यांचा व्हीडिओ व्हायरल झाल्याने जरीपटका पोलिस चांगलेच अडचणीत आले होते. ही अल्पवयीन मुलांची टोळी होती. तसेच त्यांच्यावर लुटमार, घरफोडीचे गुन्हेही दाखल होते. केवळ अल्पवयीन असल्याचा लाभ घेत पोलिस निरीक्षकासह सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख