खेमनारांनी सोडला नाही पदभार, तरीही गुल्हानेंचा खुर्चीवर ताबा  - khemnar did not relinquish his post but gulhane still held the chair | Politics Marathi News - Sarkarnama

खेमनारांनी सोडला नाही पदभार, तरीही गुल्हानेंचा खुर्चीवर ताबा 

प्रमोद काकडे 
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही डॉ. खेमनार यांच्या बदलीवर ‘अंधेर नगरी चौपट राजा’अशा शब्दांत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यांनीही मुख्यमंत्र्यांना काल आणि आज पत्र पाठविले. माजी खासदार नरेश पुगलियांनीही पत्रव्यवहार केला आहे.

चंद्रपूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीबाबत सध्या सर्वत्र गोंधळ सुरू आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची तडकाफडकी बदली झाली असली, तरीही त्यांनी अद्याप आपला पदभार सोडलेला नाही. असे असताना नवे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पदभार स्विकारला. या प्रकारामुळे कार्यालयातील अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. याशिवाय या विषयावरुन सत्ताधाऱ्यांतच दोन गट पडल्याचे दिसत आहे. 

आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार नरेश पुगलिया आणि कॉंग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून कोरोनाचे संकट संपेपर्यंत खेमनार यांनाच जिल्हाधिकारीपदी कायम ठेवा, अशी विनंती केली आहे. यानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीवरून सत्ताधाऱ्यांमध्येच दोन गट पडल्याचे समोर आले. जनविकास सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हीच मागणी घेऊन आंदोलन केले. 

सन २०१८ मध्ये डॉ. कुणाल खेमनार रुजू झाले. त्यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण व्हायचा आहे. सामान्य माणसांना सहज उपलब्ध होणारे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. कोरोनाचे संकट आल्यानंतर डॉ. खेमनार यांचे काम जिल्हावासींना भावले. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. या ज्ञानाचा उपयोग कोरोनाच्या लढाईत झाला आणि होतो आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोना संक्रमित सापडला असताना तब्बल दोन महिन्यांपर्यंत या जिल्ह्यात एकालाही कोरोनाची लागण झालेली नव्हती. याचे श्रेय जिल्हाधिकारी डॉ. खेमणार यांच्याच नियोजनाला जाते, असे प्रशासनातील अधिकारी सांगतात. 

आता रुग्णांची संख्या जिल्ह्यात वाढत असताना अचानक त्यांची बदली झाली. त्यांच्याऐवजी पदोन्नती मिळालेले अजय गुल्हाने यांना चंद्रपूरचे जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली. डॉ. खेमनार यांनी आपल्या कार्यकाळात चुकीचे निर्णय होऊ दिले नाही. याच कारणाने त्यांची उचलबांगडी करण्यासाठी मोठी लॉबिंग झाल्याची चर्चा आहे. यासाठी मोठ्या ‘अर्थ’पूर्ण तडजोडी झाल्याचे समजते. दरम्यान, प्रधान सचिवांनी खेमनार यांना बदलविणार नाही, असे सांगितले. त्यामुळे गुल्हाने यांनी बदलीच्या आदेश मिळताच मुंबईवरून थेट चंद्रपूर गाठले आणि कुणाच्याही ध्यानीमनी नसताना पदभार स्वीकारला. यावेळी डॉ. खेमनार कार्यालयात नव्हते. प्रशासकीय संकेतानुसार जुने जिल्हाधिकारी नव्या जिल्हाधिकाऱ्याकडे कार्यभार सोपवितात. परंतु येथे खेमनार यांनी आपला कार्यभार सोडल नसतानाही गुल्हईसकाळाने त्यांच्या खुर्चीत जावून बसले. 

दुसरीकडे जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या काही लोकप्रनिधिनींनी खेमनार यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे घातले. पालकमंत्री मात्र गुल्हाने यांच्या पाठीशी असल्याचे समजते. या पार्श्‍वभूमीवर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्ती आणि बदलीवरून कॉंग्रेसमध्येच दोन गट पडले आहे. दरम्यान, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही डॉ. खेमनार यांच्या बदलीवर ‘अंधेर नगरी चौपट राजा’अशा शब्दांत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यांनीही मुख्यमंत्र्यांना काल आणि आज पत्र पाठविले. माजी खासदार नरेश पुगलियांनीही पत्रव्यवहार केला आहे. कोरोनाच्या परिस्थितीत कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून जनतेच्या जिवाशी खेळण्याचे पाप जिल्ह्यातील काही नेते करीत आहे. या नेत्यांच्या कारस्थानाला आपण आणि महसूलमंत्री बळी पडले आहात. जिल्ह्यातून कोरोनाचे संकट संपल्यानंतर डॉ. खेमनारांची बदली करा, अशी विनंती पुगलिया यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. 

जनविकास सेनेचे आंदोलन 
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या बदलीच्या निषेधार्थ जनविकास सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. कोरोनाचे संकट असताना बदली करणे योग्य नाही. त्यामुळे त्यांची बदली तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनाचे नेतृत्व नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केले.   (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख