हा संघर्ष जिल्हाधिकारी-डॉक्टर्सचा की दोन सत्ताधारी पक्षांतला ? - is it a conflict between the collector and doctors or between the two ruling parties | Politics Marathi News - Sarkarnama

हा संघर्ष जिल्हाधिकारी-डॉक्टर्सचा की दोन सत्ताधारी पक्षांतला ?

अतुल मेहेरे
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

यवतमाळ जिल्ह्यात जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला, तेव्हा सुरूवातीच्या तीन महिन्यांत एकही मृत्यू झाला नाही. पण सद्यस्थितीत कोरोनाबाधितांचा मृत्यूदर वाढला आहे. तेव्हाही हेच जिल्हाधिकारी होते, हेच डॉक्टर होते. पण आता असे काय घडले की मृत्यूदर वाढला

नागपूर : यवतमाळमध्ये परवा-परवा जिल्हाधिकारी एम.डी. सिंग आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यात कुठल्याशा गोष्टीवरून वाद झाला. पुढे तो वाद इतका वाढत गेला की ८९ डॉक्टरांनी राजीनामे दिले आणि कालपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू झाले. परवापासून घडत आलेल्या सर्व घडामोडी पाहता हा संघर्ष फक्त जिल्हाधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यातला नसून राज्यातील सत्ताधारी दोन पक्षांमधला असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.  

दोन पक्षांमधला संघर्ष असल्यामुळे साहजिकच जिल्ह्यात दोन गट पडले आहेत. एक जिल्हाधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ आणि दुसरा विरोधात. विरोध करणारे सर्वच्या सर्व आझाद मैदानात एकवटले आहेत. त्यांना मिळणारा पाठिंबाही सतत वाढतो आहे. वृत्त लिहीत असताना आयएमएच्या राज्य संघटनेनेसुद्धा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याची माहिती हाती आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ आज शहरात पोस्टर्स लावण्यात आले. पण हे काम कुणी केले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे समर्थन करायचे आहे, तर खुलेपणाने समोर यावे, असा विचारप्रवाह पुढे येत आहे. 

किसान कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या खांद्यावर बंदुक ?
डॉक्टरांशी वाद झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यासाठी जिल्ह्यातील किसान कॉंग्रेसच्या एका नेत्याने पुढाकार घेतला आहे. हा वाद सुरू झाल्यावर या नेत्याने तडक मुंबई गाठली आणि विधानसभेतील एका ज्येष्ठ नेत्याच्या (विदर्भातील) कानावर यवतमाळ जिल्ह्यातील या प्रकाराची सर्व माहिती घातली. या ज्येष्ठ नेत्यांनी अजूनतरी या विषयात लक्ष घातल्याचे दिसत नाही. कदाचित आपल्या खांद्यावर बंदुक ठेवली जात असल्याची जाणीव या नेत्यांना झाली असावी. त्यामुळेच मुंबईतून अद्याप काहीही हालचाल झालेली नाही. जिल्ह्यातील एक मंत्री जिल्हाधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ उभे ठाकल्याने त्यांच्यासमोरही पेच निर्माण झाला असावा, असाही एक अंदाज आहे.

‘त्या’ नेत्याच्या अपमानाचा बदला तर नाही ?
काही काळापूर्वी कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला जिल्हाधिकाऱ्यांनी भेटीसाठी ताटकळत ठेवले होते, अशी माहिती आहे. याचे कारण म्हणजे तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात पालकमंत्री बसलेले होते. खुप वेळ ताटकळत ठेवल्यामुळे या ज्येष्ठ नेत्याला आपला अपमान जाणूनबूजून केला, असे वाटले आणि आता जिल्हयातील सर्व डॉक्टर्स जिल्हाधिकाऱ्याच्या विरोधात एकवटले असल्यामुळे आपल्या ‘त्या’ अपमानाचा बदला घेण्याची योग्य वेळ असल्याची जाणीव या कॉंग्रेस नेत्याला झाली असावी. अन् त्यांनी मग या भडकत्या प्रकरणाला हवा देण्याचे काम सुरू केले असण्याची शक्यताही जाणकार वर्तवत आहेत.  

कोरोनाकडे साफ दुर्लक्ष
यवतमाळ जिल्ह्यात जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला, तेव्हा सुरूवातीच्या तीन महिन्यांत एकही मृत्यू झाला नाही. पण सद्यस्थितीत कोरोनाबाधितांचा मृत्यूदर वाढला आहे. तेव्हाही हेच जिल्हाधिकारी होते, हेच डॉक्टर होते. पण आता असे काय घडले की मृत्यूदर वाढला? याचा शोध घेतला तेव्हा वैद्यकीय क्षेत्रातील काही कामचुकार लोकांमुळे हा प्रकार होत असल्याची माहिती मिळाली. ज्यांना काम करायचे नाही आणि राजकीय मंडळीच्या आश्रयाला जाऊन केवळ राजकारण करायचे आहे, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधाचे अस्त्र उगारले आहे. काम न करणाऱ्या लोकांना जिल्हाधिकारी बोलणारच. तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी काही बोलल्याचा येवढा बाऊ करून संपूर्ण व्यवस्थाच वेठीस धरणे कितपत योग्य आहे, असा प्रश्‍न सुज्ञ नागरिक विचारत आहेत. 

या सर्व भानगडीत कोरोना हा विषय पूर्णतः मागे पडला आहे आणि कोरोनामुळेच डॉक्टर्स आणि जिल्हाधिकारी हा वाद सुरू झाला असे सांगण्यात येते. जिल्हाधिकारी स्वतः पीपीई कीट घालून कोरोना वार्डात जातात. काही ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन लावायलाही माणूस नाही. ऑक्सिजनअभावी काही रुग्णांचा मृत्यू झाला. अशावेळी जिल्हाधिकारी कुणाला बोलले असतील, तर त्यात चुक काय? काही डॉक्टरांनी कामही करायचे नाही आणि त्यांना कुणा काही बोलायचेही नाही, असे असेल तर जमणार नाही, ही जिल्हाधिकारी सिंग यांची भूमिका आले, असे काही लोकांचे म्हणणे आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख