दान आलेला प्लाझ्मा वाढवतोय केवळ मेयो-मेडिकलची शान, वापर अद्याप नाही - increasing donated plasma is just the glory of mayo and medical not yet in use | Politics Marathi News - Sarkarnama

दान आलेला प्लाझ्मा वाढवतोय केवळ मेयो-मेडिकलची शान, वापर अद्याप नाही

केवल जीवनतारे
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

नागपुरात पाच पट मृत्यू वाढल्यानंतरही प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात नाही. २१५ मृत्यू झाल्यानंतरही या गंभीर रुग्णांवर मेयो मेडिकलमध्ये प्लझ्माचा वापर झाला नाही, यावरून येथील प्लाझ्मा थेरपीला फिजिशियन्सकडून बगल देण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता आहे.

नागपूर : कोरोनाबाधितांवर उपचाराशी प्लाझ्मा थेरेपी वरदान ठरला. प्रयोगांतू ते सिद्धही झाले. राज्यभरात हा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्लाझ्मा थेरेपी युनिट तयार झाले. मात्र उपराजधानीत तयार झालेल्या युनिटमध्ये दान मिळालेला ‘प्लाझ्मा’ अद्यापही वापरण्यात आला नाही. तर केवळ मेडिकल-मेयोच्या रक्तपेढीची शान वाढवत असल्याचा भास होतो आहे. प्लाझ्मा थेरपीचा वापरात येथील डॉक्टरांनाच रस नसल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाच्या प्राणघातक आजारामधून सरकारी आणि खासगी उपचार घेऊन बरे झालेल्या सर्व रुग्णांना प्लाझ्मा थेरपीसाठी प्लाझ्मा दान करणे बंधनकारक करावे, असा सूर उमटत आहे. प्लझ्मा दानकर्त्यांशी संपर्क साधून प्लाझ्माचे दान मिळवण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील संबधित प्लाझ्मा युनिटमधील प्रमुखांनी प्रयत्न करावे, असे वैद्यकीय संचालक कार्यालयातून सांगण्यात येते. मेडिकलमध्ये सध्या १८ युनिट तर मेयोत ११ युनिट प्लाझ्मा कोरोनाबाधित रुग्‍णांवरील वापरासाठी तयार आहे.

नागपूरच्या मेडिकलमध्ये अमरावती येथील एका डॉक्टरवर वापर करण्यात आला. मात्र त्यानंतर एकाही रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला नाही. हा वापर का होत नाही, हा मेयो आणि मेडिकलच्या बाबतीत संशोधनाचा विषय बनला आहे. प्लाझ्मा दान करण्यासाठी दाते पुढे येताना दिसत आहेत. मेडिकल आणि मेयोत २८ युनिट प्लाझ्मा दानातून मिळाला आहे. येवढच नव्हे तर नागपुरात मेयो रुग्णालयात एका व्यक्तीने एक नाही तर दोन वेळा सामाजिक बांधिलकीतून त्यांनी प्लाझ्मा दान केला. यासंदर्भात मेयो, मेडिकल प्रशासनाशी संपर्क साधला, परंतु त्यांनी चुप्पी साधली.

४ हजारांपैकी केवळ १४ जण दानकर्ते
नागपूर जिल्ह्यात मेयो, मेडिकल आणि एम्स मधून सुमारे ४ हजार कोरोनाबाधितांनी कोरोनाला हरवले. हे चार हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले. मात्र चार हजार कोरोनामुक्तांपैकी केवळ १४ व्यक्तींनी प्लाझ्मा दान केला. यातील एकाचा प्लाझ्मा तेवढा वापर झाला. उर्वरित २७ युनिट प्लाझ्मा मेडिकल, मेयोच्या रक्तपेढीत केवळ शान म्हणून ठेवला आहे. त्याचा वापर झाला नाही. विशेष असे की, कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून 28 दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कोणताही रुग्ण प्लाझ्मा दान करू शकतो. एका वेळेस एक रुग्ण 400 मिलि प्लाझ्मा दान करू शकतो. 15 दिवसांच्या अंतराने 2-3 वेळेसही प्लाझ्मा दान करू शकतो. प्लाझ्मा दान केल्याने रुग्णाला कोणताही त्रास होत नाही. मात्र, कोरोनामुक्त झाल्यानंतर चार महिन्यांपर्यंत प्लाझ्मा दान करता येते.

मृत्यूदर वाढूनही का होत नाही वापर?
एकिकडे कोरोनावर मात करणाऱ्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करावा, यासाठी त्यांना प्रवृत्त करावे, असे वैद्यकीय संचालनालयातून व्हिडिओ कॉन्फरंस्निंगद्वारे संबधितांना सांगण्यात येत आहे. प्लाझ्मा दान करण्याने सामाजिक बांधिलकी जपली जाते. मात्र नागपुरात पाच पट मृत्यू वाढल्यानंतरही प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात नाही. २१५ मृत्यू झाल्यानंतरही या गंभीर रुग्णांवर मेयो मेडिकलमध्ये प्लझ्माचा वापर झाला नाही, यावरून येथील प्लाझ्मा थेरपीला फिजिशियन्सकडून बगल देण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता आहे.    (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख