गृहमंत्री अनिल देशमुख महाराष्ट्राला देणार ‘दिशा’ - home minister anil deshmukh to give disha to maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

गृहमंत्री अनिल देशमुख महाराष्ट्राला देणार ‘दिशा’

अतुल मेहेरे
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

अनिल देशमुखांना अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे गृहखाते शरद पवार यांनी सोपविले. हे खाते ते अतिशय समर्थपणे सांभाळत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू आमदारांची कमतरता नाही. असे असताना पहिल्या पाच महत्त्वांच्या खात्यांमध्ये अनिल देशमुख यांचा समावेश करण्यात आला. ही अनिल देशमुख यांच्या कामाची आणि निष्ठेची पावती आहे. 

महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी आंध्र प्रदेशात दिशा कायदा बनवण्यात आला. महाराष्‍ट्रातही महिलांच्या सुरक्षेसाठी हा कायदा अस्तित्वात आणण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जोरदार तयारी केली आहे. यासाठी त्यांनी आंध्र प्रदेशचा दौराही केला. राज्यातील महिला आमदारांसोबत या विषयावर त्यांनी बैठका घेऊन चर्चा केली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राला ‘दिशा’ कायदा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 

राज्याच्या गृहमंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी पोलीस विभागात आमुलाग्र बदल घडविण्यास सुरूवात केली. राज्यावर कोरोनाचे आक्रमण झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून पोलिस अधिकारी आणि अंमलदारांचे मनोबल वाढवण्याचे महत्वाचे काम केले. त्यांच्या भावनिक आवाहनानंतर लोकांमध्ये कोरोनाबाबत जागृती झाली. या काळात पोलिसांना संक्रमण होऊच नये, याची पूर्ण काळजी राज्यभर घेण्यात आली. तरीही दुर्दैवाने काही पोलीस कोरोनाने दगावले. अशांच्या कुटुंबीयांना दहा लाख पोलिस वेल्फेअर फंडमधून, पाच लाख अॅक्सिस बँक आणि पन्नास लाख राज्य सरकारकडून, असे एकुण ६५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. राज्य सरकारचे पन्नास लाख रूपये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून त्यांनी तत्काळ मंजूर करून घेतले. घरातील कर्ता पुरूष गेल्याचे दुःख कुणी कमी करू शकत नाही, पण त्यानंतर कुटुबीयांची आबाळ होऊ नये, यासाठी त्यांनी वैयक्तिक स्तरावरही भरपूर प्रयत्न केले. 

मुंबईचे ग्लॅमर सोडून उतरले होते जिल्हा परिषदेच्या आखाड्यात
नव्वदच्या दशकात मुंबईचे ग्लॅमर सोडून आपल्या काटोल तालुक्यातील गावात येऊन थेट जिल्हा परिषदेच्या आखाड्यात उतरलेले अनिल देशमुख आता थेट गृहमंत्रालयाचा कारभार पाहात आहे. गृहममंत्री म्हणजे काटेरी मुकुट समजला जातो. पोलिसांप्रमाणे चोवीस तास ऑन ड्युटी सजग असावे लागते. अतिशय संवेदनशिल खाते असल्याने मुरब्बी नेत्यांकडेच ते सोपविले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे निर्माता शरद पवार यांनी गृहमंत्रालयाची जबाबदारी देशमुखांवर सोपवली. यावरून त्यांचे वजन आणि महत्त्व लक्षात येते. 

देशमुख कुटुंबीय जिल्ह्याच्या राजकारणात आधीपासूनच सक्रीय होते. त्यांचे बंधू रणजित देशमुख काँग्रेस आणि राज्याच्या मंत्रिमंडळात वजनदार नेते होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणूनच त्यांच्याकडे बघितले जात होते. मात्र ऐन मोक्याच्या वेळी त्यांना नशिबाने साथ दिली नाही. त्यांचे बोट पकडून अनिल देशमुख राजकारणात आले. जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकताच थेट अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसले. त्याच काळात सर्वच राजकीय पक्षांतील प्रस्थापितांच्या विरोधात असंतोष खदखदत होता. तरुण तुर्क सक्रिय झाले होते. नागपूर म्हणा किंवा विदर्भ सर्वत्र काँग्रेसचाच बोलबाला होता. अनिल देशमुख यांनी वेगळी वाट चोखळली. कुठल्याही पक्षाकडे तिकिट मागायला गेले नाही. थेट अपक्ष म्हणून काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उडी घेतली. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सुनील शिंदे यांचा पराभव केला. 

शरद पवारांचे विश्‍वासू
त्याच काळात शिवसेना-भाजपची युती सत्तेवर आली. अनिल देशमुख यांना क्रीडा राज्यमंत्री करण्यात आले. नंतर काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. अनिल देशमुख राष्ट्रवादीत सहभागी झाले. त्यानंतर सलग तीन वेळा ते निवडून आले. सांस्कृतिक क्रीडा शिक्षण मंत्री, अबकारी मंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री या खात्यांचे त्यांनी मंत्रिपद भूषविले आहे. पाच वर्षानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाली. अनिल देशमुखांना अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे गृहखाते शरद पवार यांनी सोपविले. हे खाते ते अतिशय समर्थपणे सांभाळत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू आमदारांची कमतरता नाही. असे असताना पहिल्या पाच महत्त्वांच्या खात्यांमध्ये अनिल देशमुख यांचा समावेश करण्यात आला. ही अनिल देशमुख यांच्या कामाची आणि निष्ठेची पावती आहे. 

उत्कृष्ठ कुक
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दरारा राज्यभर आहे. लोक त्यांच्याकडे आपली कामे घेऊन अपेक्षेने येतात. प्रत्येकाला समाधानी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. नियमित जनता दरबार घेतात. त्यांच्या दरबारात शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय ते स्वतः उठत नाहीत. आलेल्या प्रत्येकाची आस्थेने चौकशी करतात. शरद पवारांप्रमाणेच आपल्या मतदारसंघातील लोकांना ते नावाने ओळखतात. अशा वजनदार मंत्र्यांचे सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्य कसे असेल असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडतोच. देशमुख साहेब उत्कृष्ठ कुक आहेत. अनेक अनेक दिवसांनंतर घरी आल्यावर सर्वप्रथम नातवासोबत खेळतात. किचनमध्ये शिरतात आणि स्वतः स्वयंपाक करून कुटुंबीयांना जेवू घालतात. ही त्यांची आवड आहे. 

गृहमंत्र्यांच्या ‘गृहमंत्री’...
अनिल देशमुख यांच्या पत्नी सौ. आरतीताई यासुद्धा त्यांच्याइतक्याच ॲक्टिव आहेत. कोरोनाचे संक्रमण झाले तेव्हा अनिलबाबू परिस्थिवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यभर फिरत होते. पोलिसांचा उत्साह वाढवत होते. त्या काळात आरतीताई यांनी राज्यभरातल्या पोलिसांच्या कुटुंबीयांची जबाबदारी उचलली. पोलिस अधिकारी आणि अंमलदारांच्या कुटुंबीयांशी त्या सातत्याने बोलायच्या, त्यांना धीर द्यायच्या. बरेच वेळा तर अनिल बाबू नागपुरात असूनही घरी जात नव्हते. कारण कोरोनाची प्रचंड दहशत तेव्हा होती. अशाही परिस्थितीत त्यांनी आपल्या परिवारासोबत पोलिसांच्या परिवारांचीही काळजी घेतली. याशिवाय मतदारसंघातही त्या ॲक्टीव असतात. सार्वजनिक कार्यक्रम आणि लोकांच्या सुख-दुखात त्या नेहमी सहभागी होतात. आरतीताई गृहमंत्र्यांचे ऊर्जास्थान आहेत. 

संयम पाळला आणि वाढवली वर्दीची शान...
लॉकडाऊनच्या काळात वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने पोलिसांनी आघाडीवर येऊन काम केले आणि आजही करत आहेत. कोविड काळ तर ठिक आहे, पण एरवीदेखील सणवार असो, उत्सव किंवा नैसर्गिक संकट, पोलिस कायमच ड्युटीवर असतात. स्वतःचं घरदार, बायकामुलं यांची पर्वा न करता, स्वतःच्या आरोग्याची तमा बाळगता कोरोना काळातल्या कर्तव्यामुळे सुमारे तीस हजार पोलिस कोरोनाबाधित झाले. यांपैकी सुमारे २९० जणांचा मृत्यू झाला. परंतु याच पोलिसांवर भर रस्त्यावर हात उचलला जातो तेव्हा काय होते, तर केवळ गर्दी जमते. आणि त्या गर्दीत एकही जण असा असत नाही की जो पुढे येईल आणि पोलिसांवर होणार अत्याचार थांबवेल, हे वास्तव गृहमंत्र्यांना व्यथित करतं. या बाबतीत ते म्हणतात, त्याच वेळी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने त्याच्यावर हात उचलणाऱ्या स्त्रीचा प्रतिकार केला असता तर? त्याच्यासाठी सहज शक्य होतं ते. पण त्याच वेळी कदाचित आज गप्प असणाऱ्या बघ्यांच्या गर्दीने गलका केला असता आणि म्हणाले असते की, ‘एका पोलिसानं भर रस्त्यात एका महिलेला मारहाण केली’, पण आमच्या पोलिस कर्मचाऱ्यानं संयम पाळला आणि वर्दीची शान वाढवली. 

साडेबारा हजार तरुण-तरुणींची भरती होईलच
पोलिस दल किती कठीण परिस्थितीत काम करतं, याचं भान प्रत्येकानं ठेवण्याची गरज आहे. पोलिस दल अधिक सक्षम करण्यासाठी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने मेगा पोलिस भरतीचा कार्यक्रम आखला आहे. १२,५२८ तरुण-तरुणींना यामुळे संधी मिळेल. परंतु पोलिसांची संख्या वाढवण्यावरही मर्यादा आहेत. समाजाला पोलीसांची साथ देण्यासाठी पुढे यावंच लागेल. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जितकी पोलिसांची आहे, तितकीच या राज्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आहे. साध्या-साध्या गोष्टींमधला लोकसहभाग वाढला तरी पोलिसांवरचा ताण किती तरी पटींनी कमी होईल. पोलिसांना अन्य महत्वांच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणं सोपं जाईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांचं मत आहे.  

राज्य पोलीस दलाची होती अग्निपरिक्षा... 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन अजूनही पूर्णपणे उठले नाही. या काळात राज्याचा गृह विभाग आपल्या घोषवाक्याला म्हणजे सद्रक्षणाय खलनिग्रहणाय यास अनुसरून अहोरात्र कार्यरत आहे. याचा अभिमान असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात. संपूर्ण देशात २४ मार्चपासून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता हा लाँकडाऊन वाढवण्यात आला. लाँकडाऊनमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात अस्वस्थ झालेले दिसून येतात. ते विविध कारणांनी घराबाहेर येत असताना त्यांनी रस्त्यावर येऊ नये, यासाठी पोलीसांनी २४ तास रस्त्यावर उभे राहून याचे नियंत्रण केले आहे. पोलीस कर्मचारी हे देखील तुमच्या आमच्यासारखे माणूसच असून त्यांनाही कुटूंब आहे, याची जाणीव जनतेने ठेवावी, असे भावनिक आवाहन गृहमंत्र्यांनी केले.  

मी कुटुंबप्रमुख
राज्याचे संपूर्ण पोलीस दल हे एक मोठे कुटूंब आहे. गृहमंत्री या नात्याने मी त्याचा कुटुंबप्रमुख असल्याने माझी जबाबदारी मोठी असल्याचे ते मानतात. या लाँकडाऊनमध्ये त्यांनी स्वतः मुंबईसह १८ जिल्ह्यांत भेटी देऊन त्याठिकाणी कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. ते करीत असलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच भेटी दिलेल्या जिल्ह्यांमध्ये त्या जिल्ह्यांचे विभागीय आयुक्त, आय.जी., पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक इतर अधिकारी बहुतेक जिल्ह्यांमध्ये तेथील पदाधिकारी यांच्यासोबत कोरोना संदर्भात आढावा बैठका घेतल्या. महाराष्ट्र पोलिसांच्या बरोबरीने आपले राज्य राखीव दलातील जवान देखील कार्यरत आहेत. राज्यात असलेल्या ५९ तुकड्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी संवाद साधला.

काही जणांना कोरोनाची बाधा झाली होती पण एकूण कोरोनाग्रस्त जवानांच्या ७० टक्के जवान आतापर्यंत बरे झाले आहेत. जे जवान खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचा उपचार घेत आहेत. त्यांना तातडीने वेलफेअर फंडातून एक लाख रुपये देण्यात येत आहेत. राज्य राखीव पोलीस बलाच्या सर्व केंद्रावर जवानांसाठी ऑक्सीमीटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे तेथील जवानांच्या ऑक्सिजन लेवलची तपासणी नियमीत होत आहे. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या जवानांशी गृहमंत्र्यांनी ऑनलाइन संवाद साधून त्यांची विचारपूस केली. त्यांना मिळत असलेले औषधोपचार, तेथील सुविधा यांबाबत सविस्तर माहिती घेतली. उपचार सुरु असलेल्या जवानांनी त्यांना उत्तम सुविधा व औषधोपचार मिळत असल्याचे त्यांना सांगितले. महत्वाची व कौतुकास्पद बाब अशी की, राज्य राखीव दल पोलीस जवानांच्या  कुटूंबियांनी बचत गटाच्या माध्यमातून मास्क व सँनिटायझरची निर्मिती केली असून ते मास्क स्थलांतरित मजुरांसाठी देण्यात आले.  

जनतेचा खरा मित्र
असे म्हणतात की, संकटकाळी खऱ्या मित्राची ओळख होते, तसेच आमच्या पोलिसांनी आपल्या कृतीतून पोलीस हा जनतेचा खरा मित्र व हितचिंतक असल्याचे दाखवून दिले आहे. यापुढेही ते आपली सेवा याच निष्ठेने आणि समर्पणाच्या भावेनेने देत राहातील, याची खात्री गृहमंत्र्यांना आहे.  

कोरोना योद्धे
अतिशय दुःखद अंतकरणाने मला हे नमूद करावे लागत आहे की, कोरोना विरुद्धच्या या लढाईत आमच्या काही पोलीस योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागला. आमच्या पोलीस दलातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कुटुंबाच्या मागे महाराष्ट्राचे गृह खाते व महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्रातील जनता ठामपणे उभी आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात. 

दिवाळीही पोलिसांसोबत...
गृहमंत्री अनिल देशमुख सणावाराला देखील जनतेमध्ये रमतात. अशा दिवसांमध्ये कुणीही दुखी, कष्टी राहू नये, याकडे त्यांचे लक्ष असते. नागपुरात असताना जास्तीत जास्त वेळ मतदारसंघात ते असतात. आज दिवाळीच्या दिवशी पण ते कुटुंबीयांसोबत घरी नव्हे, तर गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जात आहेत. ते म्हणतात, ‘पोलिस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मी गडचिरोलीमधल्या पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. चोवीस तास जनसेवेत असलेल्या पोलिसांचा उत्साह वाढवणे, ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे घरी न थांबता मी थेट 'फिल्ड'वर जाण्याचे ठरवले. कठीण स्थितीत सेवा करणाऱ्या पोलिसांचे मनोबल वाढवण्याचा माझा प्रयत्न आहे. दिवाळीसारखा आनंददायी सण कुटुंबासमवेत, आप्त-मित्रांसह साजरा करावा, असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र पोलिसांना ते प्रत्येकवेळी जमत नाही. त्यामुळे कुटुंबप्रमुख म्हणून मीच त्यांच्या जवळ जाऊन चार आनंदाचे क्षण त्यांच्या आयुष्यात पेरण्याचा प्रयत्न करणार आहे’ आज दुपारी गृहमंत्री देशमुख दुपारी हेलीकॉप्टरने गडचिरोली येथे रवाना होणार आहेत. 

शब्दांकन : अतुल मेहेरे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख