मित्राचे स्वप्न केले पूर्ण, राजकारणातील दिल, दोस्ती, दुनियादारीची चर्चा ! - friends dream fulfilled heart of politics friendship talk of worldliness | Politics Marathi News - Sarkarnama

मित्राचे स्वप्न केले पूर्ण, राजकारणातील दिल, दोस्ती, दुनियादारीची चर्चा !

आनंद चलाक
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

ह्या सरप्राईज गिफ्ट मुळे नगरसेवक आणि मित्रमंडळही अवाक झाली. कुठलीही पूर्वकल्पना नगरसेवकांना किंवा नगर प्रशासनाला नव्हती. अरुण धोटे यांनी आपल्या मित्राला सरप्राईज गिफ्ट द्यायचे ठरविले होते. अरुण धोटे यांनी अचानकपणे दोन महिन्यांच्या रजेवर जाण्याचा निर्णय घेतला.नगराध्यक्षाचा पदभार सुनील देशपांडे यांनी स्वीकारला आहे.

राजुरा (चंद्रपूर) : राजकारण आज कोणत्या थराला चालले आहे, याचा अनुभव रोजच्या घटनावरुन येतो. राजकीय आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अनेक गुन्हेदेखील घडताना आपण बघतो. असे म्हटले जाते की, राजकारणात कोणी मित्र किंवा कोणी शत्रू नसतो. प्रसंगानुरुप अनेक जण आपला चेहरा बदलतात. पण राजकारणातही दोस्ती निभवणारे आहेत. पस्तीस वर्षाच्या राजकारणातील जिवलग जोडीने एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. हे जिवलग मित्र आहेत नगराध्यक्ष अरुण धोटे व उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे.

नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी अचानक दोन महिने रजेवर जाण्याचा निर्णय घेत आपले मित्र आणि उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे यांना दोन महिन्यांसाठी नगराध्यक्षपदाची धुरा दिली. आणि पस्तीस वर्षाच्या राजकारणातील नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचे आपल्या मित्राचे स्वप्न पूर्ण केले. विश्वासाचे नाते जपणाऱ्या राजकीय मैत्रीबाबत शहरात चांगली चर्चा रंगली आहे. राजकारणातील जिवलग मित्रांनी आपल्या निखळ दोस्तीचा परिचय दिला आहे.

राजुरा नगर परिषद सभागृहात सर्वाधिक कार्यकाळ अरुण धोटे आणि सुनील देशपांडे यांचा राहिलेला आहे. अरुण धोटे यांचे वडील स्वर्गीय रामचंद्रराव धोटे हे नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष राहिलेले आहेत. राजुरा नगरपालिकेची स्थापना १९५८ मध्ये झाली. त्यानंतर शहराची धुरा रामचंद्र धोटे यांच्याकडे आली. आपल्या पित्याचा आवाज, वारसा जोपासण्याचे काम नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केलेले आहे. शहराच्या राजकारणात स्वतःचे वलय निर्माण केले आहे. अनेक नगरपरिषद निवडणुकीत मुत्सद्दी राजकारणाचा प्रत्यय आणून दिलेला आहे. प्रत्येक प्रसंगात सुनील देशपांडे हे अरुण धोटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. 

महाविद्यालयीन शिक्षणानंतर या दोघांनीही शहराच्या राजकारणात प्रवेश केला आणि या दोघांचीही राजकीय मैत्रीला वलय प्राप्त झाले. दोघांनीही १९८६ मध्ये राजकीय जीवनाची सुरुवात नगर परिषद निवडणुकीतून केली. पहिल्याच निवडणुकीमध्ये राजकीय जीवनाचा श्रीगणेशा केला व नगर परिषद सभागृहात प्रवेश केला. तब्बल ३५ वर्षांपासून दोघेही सभागृहाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आतापर्यंत नगराध्यक्ष अरुण धोटे  सतत सात वेळा नगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडून आलेले आहेत. शहराचे तीनदा नगराध्यक्ष पद भूषविलेले आहेत. दोनदा थेट नगराध्यक्ष म्हणून लोकांमधून निवडून आलेले आहेत. एकदा बहुमताने नगराध्यक्ष बनलेले आहेत. 

सुनील देशपांडे यांचा ही राजकीय आलेख चढता आहे. सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. २०११ मध्ये पराभूत झाल्यानंतर नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी लगेच स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात घेतले. सत्तेत आल्यानंतर आपला मित्र पराभूत झाल्याची खंत अरुण धोटे यांना होती. मित्रत्वाचे नाते  जोपासत स्वीकृत सदस्य करून दिलदारपणा जोपासला. मागील पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनात अनेक चढ-उतार आलेत. मात्र अरुण धोटे आणि सुनील देशपांडे यांनी आपल्या मैत्रीत कधीही दुरावा निर्माण होऊ दिला नाही. एवढ्या वर्षाच्या मैत्रीत मित्रालाही नगराध्यक्षपद मिळावे यासाठी १९९१ मध्ये सुनील देशपांडे यांना उमेदवारी दिली. 

काँग्रेसकडून सुनील देशपांडे तर शेतकरी संघटनेचे विलास बोंगीरवार नगराध्यक्षपदासाठी रिंगणात होते. मात्र काँग्रेसकडील सदस्य फुटल्यामुळे सुनील देशपांडे यांचे नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगले. अशाही परिस्थितीत मित्रत्वाचे नाते कायम राखले. अरुण धोटे आणि सुनील देशपांडे यांचे नगर परिषद मधील राजकारण हे सर्वश्रुत आहे. ३५ वर्षांपासून येथील जनमाणसांच्या हृदयावर राज्य करणारी ही जोडी अजूनही मित्रत्वाचे नाते अतूट जोपासत आहे. प्रदीर्घ राजकारणाच्या वाटचालीत कधीही मनभेद होऊ दिले नाहीत. आपल्या मित्राची नगराध्यक्षपदाची इच्छा पूर्ण करण्यासाठी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी अचानक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मित्राकडे नगराध्यक्ष पदाचा पदभार सोपवला. 

ह्या सरप्राईज गिफ्ट मुळे नगरसेवक आणि मित्रमंडळही अवाक झाली. कुठलीही पूर्वकल्पना नगरसेवकांना किंवा नगर प्रशासनाला नव्हती. अरुण धोटे यांनी आपल्या मित्राला सरप्राईज गिफ्ट द्यायचे ठरविले होते. अरुण धोटे यांनी अचानकपणे दोन महिन्यांच्या रजेवर जाण्याचा निर्णय घेतला.नगराध्यक्षाचा पदभार सुनील देशपांडे यांनी स्वीकारला आहे. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ते नगराध्यक्ष म्हणून शहराचे काम पाहणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर शहरात पुन्हा या राजकीय मित्रत्वाची चर्चा रंगली.

ही सरप्राईज गिफ्ट आहे. गेली पस्तीस वर्षे आम्ही राजकारणात एकत्र आहोत. शहराच्या विकासासाठी अरुण धोटे यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यकाळातील विकासकामांना पुढे नेण्याचा प्रयत्न राहील. तसेच मूलभूत सुविधा सर्वसामान्य नागरिकांना मिळण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले जातील.
सुनील देशपांडे,
प्रभारी नगराध्यक्ष, राजुरा.

(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख