विदर्भवाद्यांना खुणावतेय पदवीधर विधान परिषदेची निवडणूक ! - election of graduate legislative council marking vidarbha activists | Politics Marathi News - Sarkarnama

विदर्भवाद्यांना खुणावतेय पदवीधर विधान परिषदेची निवडणूक !

राजेश चरपे
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

मागील निवडणुकीत बसपचे उमेदवार सेवानिवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात छाप असलेला उमेदवार त्यांच्याकडे नाही. संयुक्त उमेदवार देण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यास यंदाची निवडणूक चांगलीच रंगतदार होऊ शकते. 

नागपूर : विदर्भवाद्यांनी आधी वेगळ्या विदर्भासाठी कॉंग्रेसवर आरोप केले. त्यानंतर भारतीय जनता पक्षावर त्यांनी विश्‍वास ठेवला. पण केंद्रात आणि राज्यातही जेव्हा भाजपची सत्ता आली, तेव्हा त्यांनी विदर्भवाद्यांच्या तोंडाला पानेच पुसली. पण त्यांचा लढा आजही नेटाने सुरू आहे. आता विदर्भवाद्यांना पदवीधर विधान परिषदेची निवडणूक खुणावतेय. काँग्रेस किंवा भाजप या दोनच राष्ट्रीय पक्षांभोवती प्रामुख्याने फिरत असलेल्या पद‍वीधर विधान परिषदेच्या निवडणुकीत यंदा विदर्भवाद्यांनी उडी घेण्याचे ठरवले आहे. त्याचा कोणाला फायदा, कोणाला तोटा? या भाग निराळा असला तरी साक्षरांच्या मतदारसंघात चांगले यश मिळेल, अशी आशा विदर्भवाद्यांना आहे. 

विदर्भवाद्यांनी यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी विद्यमान राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी नशीब अजमावले. मात्र कोणालाच यश आले नाही. निवडणूक लढण्यावरून विदर्भवाद्यांमध्येच मतभेद आहेत. झाकली मूठ झाकूनच ठेवा, निवडणुकीचे गणित वेगळे असते, असे यांपैकी काहींचे मत आहे. असे असले तरी किमान आपली मागणी घराघरांमध्ये जाईल, भविष्यात चांगले दिवस येतील, या अपेक्षेने निवडणुका लढण्यात आल्या. सहा वर्षांपासून वातावरण चांगलेच तापले असताना लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या प्रमुख नेत्यांनी केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यावर स्वतंत्र विदर्भाची मागणी पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले होते. केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर भाजप नेत्यांनी सोयीची भूमिका घेतली. अनेक वर्षे काँग्रेसवर आरोप केल्यानंतर भाजप नेते विचार करतील, विदर्भवाद्यांची ही आशाही फोल ठरली. असे असले तरी विदर्भवादी निराश झाले नाहीत. त्यांची आंदोलने नेमाने आणि नेटाने सुरू आहेत. 

आता पदवीधर निवडणूक विदर्भवाद्यांना खुणावू लागली आहे. मतदार पद‍वीधर असल्याने विदर्भावर होत असलेल्या अन्यायाची, उपेक्षेची जाणीव त्यांना आहे. हाच धागा पकडून एक तरुण उमेदवार आणि अनुशेषाचे अभ्यासक येथून एकदा नशीब अजमावण्याचे प्रयत्न करीत आहेत. बसप आणि आम आदमी पार्टी यांची भूमिका स्वतंत्र विदर्भ राज्याची आहे. त्यांना एकत्रित करून यावेळी संयुक्तपणे एकच उमेदवार उभा करण्याचाही प्रयत्न त्यांच्यामार्फत सुरू आहे. आम आदमी पार्टीने यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. बसपाने अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. मागील निवडणुकीत बसपचे उमेदवार सेवानिवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात छाप असलेला उमेदवार त्यांच्याकडे नाही. संयुक्त उमेदवार देण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यास यंदाची निवडणूक चांगलीच रंगतदार होऊ शकते.   

(Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख