डॉ. आशिष देशमुखांना वाटते की, राज्यातून कॉंग्रेस संपतेय… - dr ashish deshmukh feels that the congress is coming to an end in the state | Politics Marathi News - Sarkarnama

डॉ. आशिष देशमुखांना वाटते की, राज्यातून कॉंग्रेस संपतेय…

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

कॉंग्रेसला जर गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर त्यांना जवळ केले पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे. याचे कारण म्हणजे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका.

नागपूर : महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती जवळ आली असताना कॉंग्रेसचे नेते, माजी आमदार आणि दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढलेले डॉ. आशिष देशमुख यांना अनेक प्रश्‍न पडले आहेत. देशातील सर्वांत जुना पक्ष कॉंग्रेस हा राज्यातून संपतोय, असे त्यांना सध्या वाटू लागले आहे. 

कॉंग्रेस राज्यात उरली आहे की नाही हे विचारताना ते म्हणतात, महाविकास आघाडीमध्ये कॉंग्रेसच्या मंत्र्यांकडे जी खाती आहेत. त्या सर्वच खात्यांची कामे पाहिजे तशी सुरू नाहीत. स्वतः त्या-त्या खात्यांच्या मंत्र्यांनाही त्यांच्याच खात्याच्या कामकाजावर समाधान नसावे, अशी परिस्थिती आली आहे. महसूल, ऊर्जा, शालेय शिक्षण, आदिवासी विकास, महिला व बालविकास अशी महत्वाची खाती कॉंग्रेसकडे आहेत. या खात्याच्या कारभाराचा रोजचा संबंध थेट लोकांशी येतो. तरीही या खात्यांचे मंत्री ‘परफॉर्मन्स’ देऊ शकत नाहीत, हे खेदाने सांगावेसे वाटते. ताजा आणि राज्यभर पेटत असलेला मुद्दा म्हणजे वीज बिल. वीज बिलात सवलत देण्याची घोषणा स्वतः सरकारनेच केली होती. हे खाते कॉंग्रेसकडे असल्यामुळेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सवलत देण्याच्या मुडमध्ये नसल्याचे सांगण्यात येते. मग सरकारमध्येच सहभागी असलेल्या कॉंग्रेससोबत हा दुजाभाव नाही तर काय आहे?

शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस वाढतेय..
सरकारमध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री हे दोघेही आपआपल्या पक्षाची वाढ कशी होईल, याकडे कटाक्षाने लक्ष पुरविताना दिसतात. तुलनेने कॉंग्रेसचे मंत्री हतबल झालेले दिसतात. विरोधी पक्षाचे नेतेसुद्धा ‘ऊर्जामंत्री हतबल झाले आहेत’, अशी वक्तव्य करायला लागले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी आपआपल्या पक्षांतील लोकांसाठी त्यांना मिळालेल्या खात्यांमार्फत काही करीत असेल, तर त्याचा विरोध करण्याचे कुठलेही कारण नाही. कोणताही पक्ष हे करेलच. पण कॉंग्रेसचे मातब्बर नेते सरकारमध्ये असूनही त्यांनी आपल्या पक्षातील लोकांसाठी काहीही करू नये, याबद्दल आश्‍चर्य वाटते. आताही कॉंग्रेस आपल्या सहकारी पक्षांना ‘शॉक’ देण्याची तयारी करीत नाही, ही दुःखाची बाब आहे. देशातील सर्वांत जुन्या आणि मोठ्या पक्षाचे मंत्री जर निष्क्रिय आणि हतबल असतील, तर कार्यकर्त्यांनी बघावे कुणाकडे, असा प्रश्‍न डॉ. आशिष देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

सरकारची कामगिरी चांगली, पण...
कॉंग्रेसच्या मंत्र्यांवर नाराजी व्यक्त करतानाच एकंदरीत सरकारच्या कामगिरीला डॉ. देशमुख चांगले मार्क देतात. कोरोनासारख्या संकटाच्या काळात सरकारची कार्यक्षमता चांगली होती. काही काळापूर्वी महाराष्ट्रातील सरकारमध्ये कॉंग्रेसने आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवले पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले होते. जे त्यांना वाटते, ते आमच्या महाराष्ट्रातील नेत्यांना का वाटत नाही, हा खरा प्रश्‍न आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये पक्षाची कोंडी होत असताना मंत्री त्याबद्दल बोलत का नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित करून डॉ. देशमुखांनी आपल्याच पक्षातील नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत. कॉंग्रेसच्या मंत्र्यांना लोकांच्या प्रश्‍नांशी काही देणेघेणे नाही, असे सध्या जाणवत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची जशी छाप राज्यात दिसते, तशी कॉंग्रेसची दिसत नाही, याचे दुःख असल्याचे डॉ. देशमुख म्हणतात. 

कार्यकर्त्यांना जपावे
कॉंग्रेसला जर गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर त्यांना जवळ केले पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे. याचे कारण म्हणजे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. या निवडणुकांमध्ये जर कॉंग्रेसचा परफॉरमन्स सुधारायचा असेल तर, पक्षसंघटन मजबूत केले पाहिजे, काही ठिकाणी कार्यकारीणींची पुनर्रचना केली पाहिजे. सध्या सत्तेत असल्यामुळे पक्षासाठी ही चांगली संधी आहे. पण या संधीचा फायदा घेण्यासाठी सरकारमधील कॉंग्रेसचा एकही मंत्री पुढाकार घेताना दिसत नाही. मंत्र्यांना मतदारसंघापुरते मर्यादित राहून चालणार नाही, तर पक्षवाढीसाठी त्यांना संपूर्ण राज्यात लक्ष घालावे लागेल. भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत निवडणूक लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसे झाले तर त्याचा फायदा ना भाजपला, ना शिवसेनेला होणार. फायदा झालाच तर तो राष्ट्रवादीला होणार आहे आणि कॉंग्रेस ही राज्यात सध्या राष्ट्रवादीच्या मागे जाताना दिसत आहे. हे सुद्धा कॉंग्रेसच्या मंत्र्यांना टाळावे लागेल, असा सल्ला डॉ. आशिष देशमुख देतात. 

(Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख