`मनमानी` करणाऱ्या तुकाराम मुंढेंचा इफेक्ट नागपुरात दिसला...कोरोना रोखला!

आतापर्यंत नागपूर महापालिकेचा आरोग्य विभाग फक्त घनकचऱ्यापुरताच मर्यादित होता. कोव्हिडच्या संकटात नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे रुपडेच बदलले आहे. महापालिकेचे पाच हॉस्पिटल सुसज्ज झाले आहेत. याठिकाणी कोव्हिडच्या उपचारासाठी साडेचारशे बेड तयार करण्यात आले आहेत. ऑक्‍सिजन असलेल्या 50 बेडचाही त्यात समावेश आहे.
tukaram mundhe
tukaram mundhe

सोलापूर : ते कोणाचं ऐकत नाहीत, मनमानी करतात, लोकप्रतिनिधींची अवहेलना करतात, यांसह ढीगभर आरोप झेलत महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत तुकाराम मुंढे यांनी प्रत्येक ठिकाणी कार्यशैलीमुळे चर्चेत राहिले. नागपूरचे पालिका आय़ुक्त म्हणूनही तेथे त्यांचा लोकप्रतिनिधींशी खटका उडाला. त्यात कोरोनाचे संकट आले. या वादात शहराचे काय होणार, अशी शंका असताना मुंढेंनी कठोर व्यवस्थापन राबवत नागपूरमधील कोरोना आटोक्‍यात ठेवला.  

नागपूर शहरातील खासगी हॉस्पिटल आणि दारूविक्रीबाबत महापालिका आयुक्तांना अधिकार आहेत का? यांसह इतर मुद्यांवर आधारित तब्बल दहा याचिका आयुक्त मुंढे यांच्या विरोधात दाखल झाल्या आहेत. या सर्व याचिकांना तोंड देत त्यांनी नागपूर शहरातील कोरोना नियंत्रित ठेवला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची माहिती लपविली म्हणून आतापर्यंत पाच एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.

जालना, सोलापूर, पुणे, नवी मुंबई यांसह राज्याच्या विविध जिल्ह्यांत मुंढे यांची वादग्रस्त राहिली. राज्याची उपराजधानी व जवळपास 27 लाख लोकसंख्येचे शहर असलेल्या नागपूरमधील कोरोना नियंत्रणात ठेवण्यात नागपूरमध्ये त्यांच्या कार्यशैलीच यश दिसून आले. एवढ्या मोठ्या शहरात सध्या अवघे 396 कोरोना बाधित रुग्ण असून फक्त सात जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई परिसरातील महापालिका, पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, मालेगाव, सोलापूर या शहरांतील कोरोनाची स्थिती गंभीर असताना नागपूरमधील वेगळी स्थिती नजरेत भरते.

राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्यानंतर राज्य सरकारने कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी व संबंधित महापालिकेच्या आयुक्त यांना सक्षम प्राधिकृत अधिकारी म्हणून घोषित केले. सक्षम प्राधिकृत अधिकारी या शब्दाचा अर्थ काय असतो, याचा अभ्यास करून मुंढे यांनी या कायद्याचा पुरेपूर वापर केला. 

आपत्ती व्यवस्थापन कायद्याने मिळालेल्या अधिकाराचा पुरेपूर वापर करणारे तुकाराम मुंढे हे राज्यातील पहिले महापालिका आयुक्त ठरले आहेत. होम क्वारंटाइनचा शिक्का मारलेला व्यक्ती घरी थांबत नाही, तो परिसरातच फिरतो त्यामुळे मुंढे यांनी नागपूर शहरात होम क्वारंटाइन ही संकल्पनाच रद्द केली. संशयित व्यक्तींना थेट इन्स्टिट्यूशन क्वारंटाइन केले. याशिवाय मास इन्स्टिट्यूशन क्वारंटाइन ही देखील महत्त्वाची संकल्पना त्यांनी नागपुरात राबविल्याने तेथील कोरोना नियंत्रणात राहिला आहे. जीवनावश्‍यक वस्तूसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी देखिल आयुक्त मुंढे यांनी चांगली पध्दत राबविली. शासनाचा एकही रुपया खर्च न करता आतापर्यंत लाख फुड पॅकेटचे वाटप एनजीओच्या माध्यमातून झाले आहे हे विशेष. 

सतरंजीपुरा, मोमीनपुरा हॉटस्पॉट 
राज्यातील ज्या महापालिका शहरात कोरोनाबाधित रुग्ण आहेत, तो परिसर झोपडपट्टी व दाट लोकसंख्येचा परिसर असल्याचे समोर आले आहे. नागपुरातील सतरंजीपुरा व मोमिनपुरा हेदेखील कोरोनाचे हॉट स्पॉट ठरले. 96% केसेस या भागात आढळल्या आहेत. या भागातील कोरोना नियंत्रित करण्यासाठी अडीच हजार जणांना इन्स्टिट्यूशन क्वारंटाइन करण्यात आले. मास इन्स्टिट्यूट क्वारंटाइनचा प्रभावी परिणाम दिसला. तबलिकी, गरोदर महिलांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण वेळीच आढळल्याने नागपुर मधील कोरोना रोखण्यात यश आले असल्याची माहिती त्यांनी `सरकारनामा`शी बोलताना दिली. 

सर्व्हेमधून मिळाली महत्त्वाची माहिती 
नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण 11 मार्च रोजी आढळला. त्यानंतर संपूर्ण शहराचा हाय रिस्क पॉप्युलेशन सर्व्हे करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक, रक्तदाब, उच्च रक्तदाब, शुगर, टीबी यांसह इतर आजार असलेल्या व्यक्तींची माहिती, त्यांचे संपर्क क्रमांक संकलित करण्यात आले. ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळला, त्या भागात सलग चौदा दिवस महापालिकेच्यावतीने सर्व्हे करण्यात आला. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींना वेळीच इन्स्टिट्यूशन क्वारंटाइन करण्यात आले. 

ट्रेसिंगचा सुटला तिढा 
शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर त्या व्यक्तीला कोरोना आला कसा? त्या व्यक्तीच्या संपर्कात कोण - कोण आले? याचा शोध कोणी घ्यायचा? महापालिका, आरोग्य विभाग की पोलिस यंत्रणा? हा प्रश्न राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये आहे. त्यामुळे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगचे काम प्रभावीपणे होत नसल्याचे समोर आले. कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग करण्यासाठी महापालिकेने आरोग्य अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथक तयार केले. या पथकाच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर अवघ्या तीन ते चार तासात कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगची प्रक्रिया पूर्ण केली. महापालिकेच्या मनुष्यबळातून जवळपास सात प्रकारच्या विविध टीम तयार केल्या आहेत. प्रत्येक प्रभागासाठी रॅपिड ऍक्‍शन टीम, रुग्णांसाठी अन्न, पाणी, वाहतूक करणारी टिम, मेडिसिन टीम, प्रतिबंधित क्षेत्र निश्‍चित करणारी टीम तयार असल्याने रुग्ण आढळल्यानंतर अवघ्या काही तासांत प्रत्येक टीमच्या माध्यमातून सर्व यंत्रणा व्यवस्थितपणे काम करते. 

महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय 
आतापर्यंत नागपूर महापालिकेचा आरोग्य विभाग फक्त घनकचऱ्यापुरताच मर्यादित होता. कोव्हिडच्या संकटात नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे रुपडेच बदलले आहे. महापालिकेचे पाच हॉस्पिटल सुसज्ज झाले आहेत. याठिकाणी कोव्हिडच्या उपचारासाठी साडेचारशे बेड तयार करण्यात आले आहेत. ऑक्‍सिजन असलेल्या 50 बेडचाही त्यात समावेश आहे. मे अखेरपर्यंत हे पाचही हॉस्पिटल कार्यान्वित होतील, अशी माहिती मुंडे यांनी दिली. या शिवाय कळमेश्‍वर मार्गावर पाच हजार बेडचे कोव्हिड केअर सेंटरही तयार करण्यात आले आहे. 

सर्वांप्रमाणे माझ्यासाठी देखील कोरोनाचे संकट हे नवीन होते. संपूर्ण शहराचा केलेला सर्व्हे, वेळेवर निदान, उपचार, आयसोलेशन यामुळे नागपूर शहरातील कोरोना नियंत्रित राहिला. कोव्हिड वॉर रूमच्या माध्यमातूनही आम्हाला मोठी मदत झाली. सकाळी आठ ते अकरा या वेळेत मी रोज नागपूर शहरातील विविध भागात स्वतः फिरतो विविध उपाययोजना स्वतः पाहतो. त्यानंतर अकरा वाजता कार्यालयात जातो. 
- तुकाराम मुंढे, आयुक्त नागपूर महापालिका. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com