गतवर्षी २४ ऑक्टोबरला भाजपला बसला होता मोठा धक्का ! - bjp had suffered a major blow on october twenty four last year | Politics Marathi News - Sarkarnama

गतवर्षी २४ ऑक्टोबरला भाजपला बसला होता मोठा धक्का !

राजेश चरपे  
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

सुमारे वीस वर्षे पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघावर भाजपचे वर्चस्व होते. देवेंद्र फडणवीस आणि सुधाकर देशमुख हे या मतदार संघाचे लोकप्रतिनिधी होते. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा गड मानला जात होता. मात्र काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी त्यांचा बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. अतिशय अटीतटीच्या लढतीत ठाकरे यांनी शेवटच्या क्षणी बाजी मारली.

नागपूर : २४ ऑक्टोबरला एक वर्षापूर्वीच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या ‘त्या’ सर्व आठवणी याच दिवशी ताज्या झाल्या होत्या. नागपूर २०१४ मध्ये नागपूर हा भाजपचा मजबूत गड बनला होता. त्यामुळे २०१९ मध्ये अनेक कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्ते धास्तावले होते. पण हिंमत हारली नव्हती. त्यांनी निकराची झुंज देत जबरदस्त कमबॅक केले आणि यांपैकी तीन आमदार आज राज्याच्या मंत्रीमंडळात आहेत. 

जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना २४ ऑक्टोबर २०१९ हा दिवस पुन्हा संजीवनी देऊन गेला. याच दिवशी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. मागील निवडणुकीत बारा पैकी अकरा जागा गमावणाऱ्या काँग्रेसने विधानसभेच्या निकालात जबरदस्त कमबॅक करून भाजपला चांगलाच धक्का दिला. शहरातील दोन जागा आणि ग्रामीणमधील गमावलेल्या तीन विधानसभेच्या जागा काँग्रेसने पुन्हा खेचून आणल्या. यापैकी तीन आमदार राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्याला काँग्रेसमुक्त करण्याचा संकल्प केला होता. तत्कालीन परिस्थिती आणि जिल्ह्यातील विकास कामांचा झपाटा बघता काँग्रेसचे काही खरे नाही असेच सर्वांना वाटत होते. कार्यकर्तेही धास्तावले होते. याच भीतीने काही दिग्गजांनी निवडणूक लढलीच नाही. आपला मतदारसंघ दुसऱ्याला दिला. मात्र नागपूरकरांनी अनपेक्षित निकाल दिला. भाजपच्या बड्या नेत्यांना जमिनीवर आणले. दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्षनेते फडणवीस यांनाही एक लाखांच्या मताधिक्यांनी निवडून येता आले नाही. काँग्रेसच्या आशिष देशमुख यांनी त्यांच्या विरोधात निकराने लढा दिला. 

सुमारे वीस वर्षे पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघावर भाजपचे वर्चस्व होते. देवेंद्र फडणवीस आणि सुधाकर देशमुख हे या मतदार संघाचे लोकप्रतिनिधी होते. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा गड मानला जात होता. मात्र काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी त्यांचा बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. अतिशय अटीतटीच्या लढतीत ठाकरे यांनी शेवटच्या क्षणी बाजी मारली. त्याच बरोबर उत्तर नागपूरमधून विद्यमान ऊर्जा व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पराभवानंतर पुन्हा मुसंडी मारली. दक्षिण नागपूरमध्ये भाजपचे आमदार मोहन मते आणि काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांच्यात शेवटच्या फेरीपर्यंत चुरस रंगली होती. मात्र पांडव यांची ताकद कमी पडली. मध्य नागपूर भाजपने गमावले अशीच चर्चा रंगली होती. 

भाजपचे विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना काँग्रेसचे युवा नेते बंटी शेळके यांनी चांगलेच जेरीस आणले होते. पूर्व नागपूरमध्ये आमदार कृष्णा खोपडे यांच्याही मताधिक्यात मोठी कपात झाली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काटोलचा गड परत आपल्याकडे खेचून आणला. पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी संपूर्ण ताकद पणाला लावून सावनेरमध्ये लीड वाढवली, रामटेकमध्ये शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल यांनी तर उमरेडमध्ये तत्कालीन आमदार व भाजपचे उमेदवार सुधीर पारवे यांना काँग्रेसचे उमेदवार राजू पारवे यांनी धूळ चारली.

(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख