वंजारींचा अर्ज भरण्यासाठी बाळासाहेब थोरात उद्या नागपुरात, भाजपचेही ठरणार उद्याच? - balasaheb thorat will be in nagpur tomorrow to fill wanjaris application will bjp also be there tomorrow | Politics Marathi News - Sarkarnama

वंजारींचा अर्ज भरण्यासाठी बाळासाहेब थोरात उद्या नागपुरात, भाजपचेही ठरणार उद्याच?

राजेश चरपे
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

विदर्भाच्या मुद्यावर अनुशेषाचे अभ्यासक नितीन रोंघे यांनीही तयारी सुरू केली आहे. काँग्रेसतर्फे जयंत जांभुळकर यांनीही दावेदारी केली आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत चालली आहे. याचा फटका काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अभिजित वंजारी यांना काँग्रेसने आधीच हिरवी झेंडी दाखविली होती.

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नागपूर दौऱ्यावर आले असताना पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा दोन दिवसांत करु, असे त्यांनी जाहिर केले होते. पण अद्यापही उमेदवार घोषीत झालेला नाही. अनिल सोले आणि महापौर संदीप जोशी यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे. दुसरीकडे काँग्रेसने ॲड. अभिजित वंजारी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली असून उद्या सोमवारी ते उमेदवारी दाखल करणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात याकरिता खास नागपूरला येत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची महाआघाडी सोबत असल्याने वंजारी यांचे पारडे जड झाले आहे. 

आजवर पदवीधर मतदारसंघातून भाजपशिवाय कुठलाच उमेदवार निवडून आलेला नाही. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची राजकीय कारकीर्दच या मतदारसंघाने घडविली. त्यांच्यानंतर अनिल सोले यांनी भाजपची जागा कायम राखली. मात्र यंदा त्यांना पक्षातूनच आव्हान दिले जात आहे. महापौर संदीप जोशी निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. ओबीसी चेहरा म्हणून सहकार क्षेत्रातील भाजपचे पदाधिकारी संजय भेंडे यांच्याही नावाची चर्चा आहे. भाजपने अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. मध्यंतरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. या दरम्यान, अनिल सोले आणि संदीप जोशी यांनीही गडकरी यांची भेट घेतली. यांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. भाजपचा बंद लखोटा केंद्राकडे पाठवण्यात आल्याचे कळते. त्यानुसार उद्या सोमवारी भाजपच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

दरम्यान, विदर्भाच्या मुद्यावर अनुशेषाचे अभ्यासक नितीन रोंघे यांनीही तयारी सुरू केली आहे. काँग्रेसतर्फे जयंत जांभुळकर यांनीही दावेदारी केली आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत चालली आहे. याचा फटका काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अभिजित वंजारी यांना काँग्रेसने आधीच हिरवी झेंडी दाखविली होती. त्यामुळे सुमारे वर्षभरापासून ते कामाला लागले होते. मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणीही त्यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रसने आघाडीचा धर्म पाळण्याचा निर्णय घेतला आहे. शहराध्यक्ष अनिल अहीरकर यांनी तसे स्पष्ट केले आहे. तसेच मतदान नोंदणीसाठीही सहकार्य करीत आहेत. शिवसेनेने अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र भाजपसोबत टोकाचे मतभेद निर्माण झाल्याने शिवसैनिकसुद्धा महाआघाडीच्या बाहेर जाऊन विचार करणार नाहीत, असे दिसते. भाजपचे अनिल सोले आमदार या नात्याने सातत्याने मतदारांच्या संपर्कात आहे. त्यांचे सतत दौरे सुरू आहेत. संघटनेची ताकद ही भाजपच्या उमेदवाराची जमेची बाजू आहे.    (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख