शिक्षक मतदारसंघात अमरावती-अकोल्याचेच वर्चस्व ! - amravati - akola dominates yavatmal in teacher constituency | Politics Marathi News - Sarkarnama

शिक्षक मतदारसंघात अमरावती-अकोल्याचेच वर्चस्व !

चेतन देशमुख
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

वजनदार मंत्री जिल्ह्याचे नेतृत्व करतात. सर्वच क्षेत्रात प्रभावी नेतृत्व जिल्ह्याने दिले आहे. असे चित्र एकीकडे असताना शिक्षक मतदारसंघाला नेतृत्व मिळू नये, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. अनेक मतदारांच्या मनातील ही सल आहे.

यवतमाळ : राज्याच्या राजकारणात यवतमाळ जिल्ह्याची वेगळी छाप राहिली आहे. सरकार युतीचे असो की आघाडीचे जिल्ह्यात कायम लालदिवा असतो. राज्याच्या राजकारणात जिल्ह्याचा मान असताना शिक्षक मतदारसंघात मात्र वर्चस्व अकोला किंवा अमरावतीचेच राहिले आहे. जेव्हा कधी प्रश्‍न शिक्षक आमदाराचा येतो, त्यावेळी मात्र जिल्ह्यातील नेत्यांना समोर न करता अकोला किंवा अमरावतीच्या नेत्यांना प्राधान्य दिले जाते. आतातरी शिक्षक आमदार जिल्ह्याचाच असावा, असे मत जिल्ह्यातील शिक्षकांसह नागरिकांच्या अपेक्षा आहेत. 

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक १ डिसेंबरला होणार आहे. इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिक्षक मतदारसंघात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक महासंघ, शिक्षक आघाडी तसेच शिक्षण परिषद आदींसह अनेक संघटनांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. जिल्ह्यात शिक्षकांचे नेतृत्व करणाऱ्या अनेक पॉवरफुल संघटना आहेत. तसेच नेतेही आहेत. काही नेते तर राज्यस्तरावर नेतृत्व करतात. मात्र, शिक्षक मतदारसंघात या नेत्यांना आतापर्यंत संधी मिळाली नाही. माजी आमदार दिवाकर पांडे यांचा अपवाद वगळता बहुतांश अमरावती किंवा अकोला जिल्ह्यानेच बाजी मारली आहे. यंदाही तशीच स्थिती आहे. शिक्षक मतदारसंघात ज्या नावांची चर्चा सुरू आहे. त्यातील जवळपास सर्वच नावे अमरावती जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे यावेळीही अमरावतीचाच बोलबाला राहण्याची शक्‍यता आहे. 

शिक्षक मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील मतदार नोंदणी सर्वाधिक झाली आहे. असे असतानाही आपसी मतभेदांमुळे व जिल्हास्तरीय राजकारणाला शह काटशह देण्याच्या भानगडीत या मतदारसंघाला नेतृत्व मिळाले नाही. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघांची जिल्ह्यात चांगली पकड आहे. शिक्षक महासंघाचे कामही वाखाणण्याजोगे आहे. मात्र, या संघटनेतील नेत्यांवर मतदारांनी विश्‍वास दाखविलेला नाही. यवतमाळ जिल्हा राज्याच्या राजकारणातील सर्वांत महत्वाचा जिल्हा मानला जातो. वजनदार मंत्री जिल्ह्याचे नेतृत्व करतात. सर्वच क्षेत्रात प्रभावी नेतृत्व जिल्ह्याने दिले आहे. असे चित्र एकीकडे असताना शिक्षक मतदारसंघाला नेतृत्व मिळू नये, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. अनेक मतदारांच्या मनातील ही सल आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी यावेळी जिल्ह्यातून शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

२०१४ ची स्थिती 
नोंदणी : ४५ हजार 
व्हॅलिड मतदान : २६ हजार २६० 
विनिंग कोटा : १३ हजार १३१              (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख