यवतमाळ : जिल्हाधिकारी-डॉक्टर संघर्ष पेटला, शहरात लागले पोस्टर्स

जिल्हाधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यातच आज पोस्टर युद्ध सुरू झाल्यामुळे यावर सध्या लगेच तोडगा निघेल, असे दिसत नाही. या सर्व भानगडीत कोरोनाचा उद्रेक वाढत असताना आरोग्य सेवा मात्र कोलमडली आहे. यात काही कोरोनाबाधितांचे बळी गेल्यास जबाबदारी कुणाची?
Yavatmal Collector posters
Yavatmal Collector posters

यवतमाळ : जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांना मागणीचे निवेदन देण्यासाठी गेलो असता, त्यांनी उद्धट वागणूक देऊन अपमान केल्याचा आरोप करीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले. त्यांना तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी आदी संघटनांनी पाठिंबा जाहीर केला. काल दिवसभर या सर्व घडामोडी झाल्यानंतर आज शहरात जिल्हाधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ पोस्टर्स लागले आहेत. त्यामुळे हा संघर्ष मिटण्याऐवजी पेटण्याचीच चिन्हे अधिक दिसत आहेत. 

मॅग्मो संघटनेच्या ८९ डॉक्टरांनी परवा सोमवारी राजीनामे दिल्याचे सांगितले जात आहे. पण त्यांचे राजीनामे अद्याप मंजूर झाले नसल्याचेही सांगण्यात येते. ‘मॅग्मो’चे राज्याध्यक्ष डॉक्टर राजेश गायकवाड आज यवतमाळात येत आहेत. आझाद मैदानावर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना धरणे आंदोलन केले तेथेच डॉ. गायकवाड आपल्या सहकाऱ्यांना संबोधित करणार असून आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. काल संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी अमरावतीला जाऊन आयुक्तांशी चर्चा केली. पण त्यांची चर्चा फिस्कटली असल्याची माहिती आहे. 

एक तर जिल्हाधिकाऱ्यांची बदली करा, नाही तर आमचे राजीनामे मंजूर करून आम्हाला सिस्टीममधून बाहेर काढा. तुम्ही तुमचे काम कसंही करा, आम्हीही आमचं पोट भरू, पण अशा जिल्हाधिकाऱ्यांच्या हाताखाली आम्ही काम करू शकत नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी आणि सर्वांची हीच भूमिका आहे. प्रशासनाला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन काम करणारे १४६ डॉक्टर्स पाहिजेत की हा एक आडमुठा अधिकारी, असा आमचा प्रशासनाला सवाल असल्याचे संघटनेचे डॉ. विजय अकोलकर यांनी सांगितले. 

आरोग्य सेवा कोलमडली
जिल्हाधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यातच आज पोस्टर युद्ध सुरू झाल्यामुळे यावर सध्या लगेच तोडगा निघेल, असे दिसत नाही. या सर्व भानगडीत कोरोनाचा उद्रेक वाढत असताना आरोग्य सेवा मात्र कोलमडली आहे. यात काही कोरोनाबाधितांचे बळी गेल्यास जबाबदारी कुणाची हे कुणालाही कळत नाहीये. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून यावर तोडगा काढावा, अशी मागणी पुढे येत आहे.      (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com