हेडगेवार आणि सावरकरांच्या नावाने मते मागण्याची यांची हिंमत नाही : बाळू धानोरकर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार सन १९०७ ला काँग्रेसमध्ये आले. १९२५ ला त्यांनी संघाची स्थापना केली. गोळवलकर, सावरकर आणि हेडगेवार यांच्या नावाने मते मागण्याची यांची हिंमत नाही. आपल्याकडे असलेल्या महापुरूषांना आपणच विसरून गेलो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटनाही आता धोक्यात आहे.
Balu Dhanorkar
Balu Dhanorkar

नागपूर : केंद्रामध्ये असलेले भारतीय जनता पक्षाचे सरकार आता आपल्या पक्षाचे महापुरूषही चोरून नेत आहेत. सरदार वल्लभभाई पटेल आणि यांचा संबंध काय? सरदार पटेलांनी तर संघावर बंदी घातली होती. आपल्याच पक्षाच्या महापुरूषांच्या नावावर हे मते मागत आहेत. त्यांच्या हेडगेवार आणि सावरकरांच्या नावाने मते मागा ना, का नाही मागत. कारण मिळणारच नाहीत. म्हणून यांची हिंमत नाही त्यांच्या नावाने मते मागण्याची असा घणाघात कॉंग्रेसचे चंद्रपूर-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर यांनी केला. 

यवतमाळ येथे शनिवारी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. खासदार धानोरकर म्हणाले, इंदिरा गांधी देशाला वाचविण्यासाठी   शहीद झाल्या. त्यापूर्वी ‘माझ्या रक्ताचा शेवटचा थेंबही या देशची एकता आणि अखंडतेसाठी कामी येईल’, असे त्या बोललेया होत्या. देशासाठी रक्त सांडविणाऱ्या परिवारातील इंदिरा गांधी. देशासाठी बलिदान हाच काँग्रेसचा इतिहास आहे. जय जवान आणि जय किसान हा नारा पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री यांचा. त्यानंतर एका बिगर काँग्रेसी पंतप्रधानाने जय जवान - जय किसान आणि जय विज्ञानचा नारा दिला. त्यांचेच वारस आता हवेतून ऑक्सीजन वेगळा करण्याच्या आणि नालीतून गॅसवर चहा बनविण्याच्या गप्पा करीत आहेत. एवढी अधोगिती बिगरकाँग्रेस सरकारच्या काळात झाली आहे.

स्वातंत्र्यपूर्व भारत असो की स्वातंत्र्यानंतरचा. या देशाला नवी दिशा. देण्याचे काम कॉंग्रेसनेच केले आहे. २८ डिसेंबर १८८५ ए .ओ. हुम  यांनी काँग्रेसची स्थापना केली. कालांतराने काँग्रेसचे नेतृत्व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हातात आले. अहिंसा आणि सत्याग्रहाने मुजोर राजवट घालविता येते, याचा वास्तुपाठ त्यांनी जगासमोर ठेवला. गांधी नावाचा हाडामासाचा माणूस या पृथ्वीतलावर होवून गेला, याचे आश्चर्य जगभरात अजुनही आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी देशाची बांधणी केली. विज्ञानवादी दृष्टीकोन दिला. देशाला नवी दृष्टी दिली. त्याच जवाहरलाल नेहरूंचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारकडून सुरू आहे. सरदार पटेल आणि नेहरूचेंच पटत नव्हते, अशी थाप मारली जात आहे. अरे बाबांनो पटेलांनी संघावर बंदी घातली होती. तुमचा आणि पटेलांचा सबंध काय? हे आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी विचारले पाहिजे. 

या देशाला काँग्रेसने पंडित नेहरू, गुलजारीलाल नंदा, लालबहाद्दुर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.व्ही. नरसिहराव आणि मनमोहनसिंग, असे सात पंतप्रधान दिले. स्वातंत्र्यानंतर १६ सार्वत्रिक निवडणुका झाल्या. काँग्रेसला ६ वेळा पूर्ण बहुमत मिळाले. चार वेळा आघाडी सरकारचे नेतृत्व काँग्रेसने केले. सर्वाधिक वेळ सत्तेवर असणारे आपण आहोत. पहिल्या निवडणुकीत ३६४ जागा आपल्याला मिळाल्या. आताची परिस्थिती बिकट आहे. जग बदललं. तंत्रज्ञान बदललं. पण कदाचित आपण पक्ष आणि विचार म्हणून त्याचा वापर करायला उशीर केला. आदरणीय राजीव गांधींनीच या देशात कॉम्प्युटर आणल. भाजपवाल्यांनीच बैलबंडी मोर्चा काढून याला विरोध केला होता. आता तेच याचा वापर लोकांची डोकी सडविण्यासाठी करीत असल्याचा आरोप धानोरकर यांनी केला. 
 
आपण लोकापर्यंत आपली विचारधारा. केलेली कामे घेवून जाण्यात कमी पडलो. आता सावध व्हायची वेळ आहे. सर्वांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. पायात पाय घातला तर घालणारा आणि टाकणारा दोघेही पडतील. सत्ताधारी आपले महापुरूष सुद्धा चोरून नेत आहेत. राष्ट्रपिता गांधीना पळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पटेलांना पुतळ्यात बंदीस्त केले. आपल्या महापुरूषांच्या नावांचा वापर आपली विचारधारा लागू करण्यासाठी हे लोक करीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार सन १९०७ ला काँग्रेसमध्ये आले. १९२५ ला त्यांनी संघाची स्थापना केली. गोळवलकर, सावरकर आणि हेडगेवार यांच्या नावाने मते मागण्याची यांची हिंमत नाही. आपल्याकडे असलेल्या महापुरूषांना आपणच विसरून गेलो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटनाही आता धोक्यात आहे. तिलाही नख लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही खासदार धानोरकर यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com