राठोड कुठे आहेत, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्‍न...  - where is rathore this is his personal issue | Politics Marathi News - Sarkarnama

राठोड कुठे आहेत, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्‍न... 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

पूजा चव्हाणच्या आत्महत्येमागील सत्य काय आहे, ते पोलिस लवकरच समोर आणतील. त्यानंतर शासन निर्णय घेईल. विरोधी पक्षाकडून जे आरोप केले जात आहेत, त्यामध्ये काही तथ्य नाही. मंत्री राठोड कुठे आहेत, हे मला माहिती असण्याचे काही कारण नाही. कुठे राहावे, कुठे जावे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्‍न आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले

नागपूर : पूजा राठोड या तरुणीने पुणे शहरातील वानवाडी येथे आत्महत्या केली. त्यानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे तिच्या आत्महत्येसाठी कारणीभूत आहेत, अशी चर्चा राज्यभर सुरू झाली. नंतर भाजपने थेट राठोड यांचे नाव घेत आरोप केले. या प्रकरणात पोलिसांवर दबाव आहे का आणि राठोड कुठे आहेत, असे प्रश्‍न राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज विचारले असता, ‘राठोड कुठे आहेत, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्‍न आहे’, असे ते म्हणाले. 

गृहमंत्री देशमुखांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून ते शहरातील एका खासगी इस्पितळात होते. १२ दिवस उपचार घेतल्यानंतर आज तेथून सुटी मिळाली. आता पुढील ८ दिवस ते गृह विलगीकरणात राहणार आहेत. इस्पितळातून आल्यावर त्यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पोलिसांवर कुणाचाही दबाव नाही. पोलिस आपले काम निष्पक्षपणे करीत आहेत. नियमांनुसार चौकशी होणारच आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येमागील सत्य काय आहे, ते पोलिस लवकरच समोर आणतील. त्यानंतर शासन निर्णय घेईल. विरोधी पक्षाकडून जे आरोप केले जात आहेत, त्यामध्ये काही तथ्य नाही. मंत्री राठोड कुठे आहेत, हे मला माहिती असण्याचे काही कारण नाही. कुठे राहावे, कुठे जावे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. 

सेलीब्रीटींच्या ट्विटबद्दल विचारले असता, सेलीब्रीटींच्या बाबत मी केलेल्या ट्विटचा विपर्यास केला गेला. सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. मी तसे काही म्हणालोच नव्हतो. भाजपच्या आयटी सेलची चौकशी करावी, असे माझे तेव्हा म्हणणे होते, असे देशमुख म्हणाले. दरम्यान, संजय राठोड यांना बदनाम करण्याचा भाजप प्रयत्न करीत आहे. पक्ष त्यांच्यासोबत उभा आहे, असे वक्तव्य शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले. त्यामुळे आता या प्रकरणात त्या मंत्र्यांची योग्य चौकशी होणार की नाही, अशी शंका घेतली जात आहे. विरोधी पक्षाने केलेल्या विविध आरोपांनंतर आता जनतेतूनही विविध प्रश्‍न विचारले जाऊ लागले आहेत. 

आता कुठे गेले शिवरायांचे विचार, कुठे गेली जिजाऊंची शिकवण, अशीही विचारणा होऊ लागली आहे. मंत्री संजय राठोड यांच्या समाजाचे लोक त्यांच्या सोबत असणे समजण्यासारखे आहे. कारण ते समाजाचे राष्ट्रीय नेते आहेत. पक्ष म्हणून संजय राऊत यांनीही आम्ही राठोडांच्या सोबत असल्याचे सांगितले आहे. पण शिवरायांच्या विचारांवर चालणाऱ्या पक्षाने आपल्या पक्षाच्या मंत्र्याच्या बाबतीत विचारधारा बदलविली की काय, असेही प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. 

कुठे आहे महिला आयोग ?
यवतमाळ जिल्ह्यात १२ बालकांना पोलिओ डोजऐवजी सॅनिटायजर पाजण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाचे तीव्र पडसाद देशभर उमटले राष्ट्रीय बालहक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. आता राज्य सरकारमधील एका मंत्र्यामुळे पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्याचा आरोप सतत केला जात आहे. पण राष्ट्रीय महिला आयोगाने अद्याप या प्रकरणाची दखल न घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. महिला आयोग या प्रकरणी काय भूमिका घेईल, याची प्रतीक्षा जनतेला आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख