नुकसान भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ करणार तहसीलवर मुक्काम ! - swabhimani to stay in tehsil for compensation | Politics Marathi News - Sarkarnama

नुकसान भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ करणार तहसीलवर मुक्काम !

संजय जाधव
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेला शेतकरी सरकारकडे अपेक्षेने बघतो आहे. पण सरकारचे लक्ष अद्याप जगाच्या पोशिंद्याकडे गेलेले नाही. त्यामुळे आजचे हे आंदोलन करावे लागले. या आंदोलनातून आमच्या मागण्या आम्ही सरकारकडे ठेवल्या आहेत. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी (मुख्यमंत्र्यांच्या भाषेत कर्जमुक्ती) मिळालेली नाही.

बुलडाणा : सततच्या पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ येथे स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत २१ ऑक्टोबरला तहसील कार्यालयावर मुक्काम मोर्चा काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. 

सोयाबीन, मका आणि ज्वारीसह खरिपातील इतर पिकांना १०० टक्के पीक विमा मंजूर करण्यासाठी सरकारने विमा कंपन्यांना तत्काळ निर्देश द्यावे. सततच्या पावसाने झालेल्या पिकाची नुकसान भरपाई म्हणून शेतक-यांना राज्य सरकारने हेक्टरी ४० हजार रुपये मोबदला द्यावा. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदी करुनही सरकारने खरेदी न केलेल्या मक्याला प्रति क्विंटल ७०० रुपये अनुदान द्यावे. सांगली कोल्हापूर पूर परिस्थितीच्या धरतीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या ऑक्टोंबर २०१९ मध्ये अतिवृष्टी झालेल्या तालुक्याला २०१९-२० ची कर्जमाफीची अंमलबजावणी करावी, यांसह इतर मागण्यांसाठी संग्रामपूर तहसील कार्यालयावर २१ ऑक्टोबरला मुक्काम मोर्चा काढण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा यावेळी प्रशांत डिक्कर यांनी दिला. 

पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेला शेतकरी सरकारकडे अपेक्षेने बघतो आहे. पण सरकारचे लक्ष अद्याप जगाच्या पोशिंद्याकडे गेलेले नाही. त्यामुळे आजचे हे आंदोलन करावे लागले. या आंदोलनातून आमच्या मागण्या आम्ही सरकारकडे ठेवल्या आहेत. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी (मुख्यमंत्र्यांच्या भाषेत कर्जमुक्ती) मिळालेली नाही. आमच्या मागण्या जर येत्या चार दिवसांत पूर्ण केल्या नाहीत, तर २१ ऑक्टोबरला जिल्ह्यातील शेतकरी हजारोंच्या संख्येने तहसील कार्यालयावर मुक्काम मोर्चा नेतील. तेथे शेतकऱ्यांच्या जेवण्याची आणि झोपण्याचीही व्यवस्था सरकारला करावी लागेल आणि त्यानंतर राज्यभर शेतकऱ्यांचा जो उद्रेक होईल, त्याच्या परीणामांनादेखील सरकारला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रशांत डिक्कर यांनी दिला आहे. 
(Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख