shocking reality in the lockdown shown by the hungry thief | Sarkarnama

उपाशी चोराने दाखविले लॉकडाऊनमधील धक्कादायक वास्तव

प्रमोद काकडे 
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

कोरोनामुळे सर्वांचेच हाल झाले आहेत. कित्येक महिने हॉटेल व्यवसाय बंद होता. आता कुठे गाडी हळूहळू रुळावर येत आहे. पैशाचे बंडल हाती लागले असतानाही या उपाशी चोराने ते जसेच्या तसे ठेवले.

चंद्रपूर : कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने चार दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले होते. या लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांचे खायचेही कसे वांदे होतात, हे दर्शविणारी घटना शहरात घडली. एका उपाशी व्यक्तीने हॉटेलमध्ये चोरी केली, पण पैशांची नव्हे तर अन्नाची. हा उपाशी चोर हॉटेलमध्ये जेवला, सोबत नेता येण्याजोग्या वस्तू खिशात घेतल्या. गल्ल्यातील पैसेही मोजले. पण पैसे चोरले नाहीत. उपाशी चोराचा प्रामाणिकपणा पाहून हॉटेलमालकानेही मग तक्रार दिली नाही. 

नागपूर हायवेवरील सचिन हॉटेलमध्ये ही घटना घडली. जिल्ह्यात कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊनदरम्यानही गुन्ह्याची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. हा एक विचित्र चोरीचा प्रकार समोर आला आहे. या चोराने चोरी केली, पण हॉटेलच्या गल्ल्यातील पैसे घेतले नाहीत. चार दिवसांच्या जनता कर्फ्युत भुकेला चोर सीसीटीव्हीत कैद झाला आहे. चोराने हॉटेलमध्ये प्रवेश केला. पोटभर जेवला. खिशात पदार्थ भरुन नेले. त्याने हॉलेटमधील गल्ला उघडला आणि  रक्कम मोजून जागेवर ठेवली. असं कसं काय? चोराने चोरी का केली नाही? कारण तो चोर नव्हताच मुळी. चार दिवसांच्या लॉकडाऊनमुळे खायलाही न मिळाल्याने त्याने हा अखेरचा मार्ग पत्करला असावा, असा अंदाज लावला जात आहे. 

चोराचा प्रामाणिकपणा पाहून हॉटेलमालकाने पोलिसांत तक्रारही केली नाही. कोरोनामुळे सर्वांचेच हाल झाले आहेत. कित्येक महिने हॉटेल व्यवसाय बंद होता. आता कुठे गाडी हळूहळू रुळावर येत आहे. पैशाचे बंडल हाती लागले असतानाही या उपाशी चोराने ते जसेच्या तसे ठेवले आणि खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन निघून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि गरिबांच्या भुकेचा आणि प्रमाणिकतेचाही प्रत्यय आला. मुळात तो चोर नव्हताच, पोटात पडलेल्या आगीने त्याला हे कृत्य करायला भाग पाडले, येवढे मात्र खरे.          (Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख