धक्कादायक : निराधार महिलेचे पासबुक फाडले, ‘या’ राजकीय पक्षाने केली तक्रार - shocking the passbook of a destitute woman was torn a complaint was lodged by a political party | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : निराधार महिलेचे पासबुक फाडले, ‘या’ राजकीय पक्षाने केली तक्रार

विनायक रेकलवार
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

बॅंक कर्मचाऱ्याच्या वागणुकीने अपमानित झालेल्या या महिलेने कचऱ्याच्या पेटीतून आपले फाडलेले पासबुक उचलून घरी नेले.

मूल (जि. चंद्रपूर) : केंद्र सरकारच्या जनधन योजनेमध्ये बॅंकेत उघडलेल्या खात्याला आधार कार्ड लिंक करण्यासाठी गेलेल्या निराधार महिलेचे पासबुक बॅंक कर्मचाऱ्याने तिच्यासमोरच फाडले. अचानक हे घडल्याने वृद्ध महिला चांगलीच घाबरली. या घटनेची वाच्यता झाल्यावर बॅंकेने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण आम आदमी पक्षाने तालुका प्रशासनाकडे तक्रार केली. 

सर्वसामान्य, गरीब नागरिकांना लहानसहान गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. आता तर कोरोनामुळे प्रत्येकाचे जीवनच बदलले असून, प्रत्येकाची जगण्यासाठी धडपड सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंग, कोरोनाच्या भीतीमुळे प्रत्येक कार्यालयात येणाऱ्यांना हीन वागणूक दिली जाते. शासकीय कार्यालये, बॅंक आदी ठिकाणी हेच चित्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय स्टेट बॅंकेच्या शाखेत असाच संतापजनक प्रकार उघडकीस आला. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या परिस्थितीत केंद्र शासनाने निराधार महिलांना अनुदान दिले. अनुदानाची रक्कम बॅंकेत जमा करण्यात आली. केंद्र शासनाच्या जनधन या योजनेत बऱ्याच महिलांनी बॅंकेत खाते उघडले. अशाच प्रकारचे खाते येथील भारतीय स्टेट बॅंकेच्या मूल शाखेत चिरोली येथील अरुणा मोहुर्ले या वृद्ध महिलेने उघडले होते. आज ती आधार लिंक करण्यासाठी बॅंकेत गेली असता येथील एका कर्मचाऱ्याने पासबुक जुने झाल्याचे कारण सांगितले. 

तिच्यासमोरच पासबुक फाडून कचऱ्याच्या पेटीत टाकले. बॅंक कर्मचाऱ्याच्या वागणुकीने अपमानित झालेल्या या महिलेने कचऱ्याच्या पेटीतून आपले फाडलेले पासबुक उचलून घरी नेले. प्रत्येक बॅंकेने ग्राहकांशी सौजन्याने वागावे, असे केंद्रशासनाचे निर्देश आहेत. तरीही वृद्ध महिलेला भारतीय स्टेट बॅंकेत फटका बसला. दरम्यान, याप्रकरणाची येथील आम आदमी पक्षाने दखल घेतली. बॅंकेच्या विरोधात मूल येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण गंभीर असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आपचे गौरव श्‍यामकुळे आणि तालुका अध्यक्ष अमित राऊत यांनी केली आहे.               (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख