खासगी डाॅक्टरांकडून कोरोनाबाधितांची लूट, पालिकेने लढवली ‘ही’ शक्कल

शासन निर्धारित दर आणि खासगी रुग्णालयाच्या दरात तफावत आढळली तर संबंधित डॉक्‍टरांवर कारवाई केली जाईल, असे महापौर राखी कंचर्लावार आणि आयुक्त राजेश मोहिते यांनी स्पष्ट केले.
Corona
Corona

चंद्रपूर : कोरोनाबाधित रुग्ण खासगी रुग्णालयात गेला, की तेथे त्याची लूट सुरू होते. नाना प्रकारची भिती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. शासकीय दरांनुसार ८० हजार रुपये बिल झाले असताना, पाच-सात लाख रुपये उकळल्याचे प्रकार नागपुरात उघडकीस आले होते. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा बडगा उगारत ती रक्कम रुग्णांच्या खात्यात जमा करण्यास रुग्णालय प्रशासनाला भाग पाडले होते. चंद्रपुरातही हा प्रकार सुरू झाल्याने पालिका प्रशासनाने कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या देयकांचे अंकेक्षण (ऑडिट) करण्याचा निर्णय घेतला आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू आहे. वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली. या पार्श्‍वभूमीवर चंद्रपूर शहरातील काही खासगी रुग्णालयांना कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मात्र शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेव्यतिरिक्त खासगी रुग्णालय अवाजवी दराने देयक आकारून रुग्णांना लुटत आहेत. रुग्णांना दाखल करतानाच आगाऊ रकमेची मागणी केली जात आहे. याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या. यावर आळा घालण्यासाठी महानगर पालिका प्रशासनाने विविध खासगी रुग्णालयांसाठी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक केली. ते खासगी रुग्णालयातील देयकांचे अंकेक्षण करतील. यापुढे कोरोना बाधित रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचारानंतर देयक मनपाने नेमून दिलेल्या अंकेक्षण अधिकाऱ्याने प्रमाणित केल्याशिवाय अंतिम होणार नाही. या आदेशाचे पालन करणे प्रत्येक खासगी रूग्णालयात बंधनकारक राहणार आहे. 

17 सदस्यांची चमू 
शासन निर्धारित दरानुसार संबंधित रुग्णालयांनी शुल्क आकारणी गरजेचे आहे. खासगी रुग्णालयांमध्ये निर्धारित दरानुसार आकारणीची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागातील दोन अधिकारी आणि 17 कर्मचाऱ्यांची चमू नियुक्त केली आहे. शासन निर्धारित दर आणि खासगी रुग्णालयाच्या दरात तफावत आढळली तर संबंधित डॉक्‍टरांवर कारवाई केली जाईल, असे महापौर राखी कंचर्लावार आणि आयुक्त राजेश मोहिते यांनी स्पष्ट केले.
(Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com