केंद्रानेच रोखली पंतप्रधान मोदींच्या स्वप्नपूर्तीची वाटचाल !

घरकुलाचा अर्ज मंजूर झाला. त्यानंतर घराचे बांधकाम सुरू केले. पहिल्या टप्प्यातील निधी प्राप्त झाला. मात्र, आता दुसऱ्या टप्प्यातील निधी अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी महापालिकेत येरझाऱ्या टाकणे सुरू केले आहे. मनपा प्रशासनानेही शासनाकडे निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला आहे. मात्र, शासनस्तरावरूनच मागील पाच महिन्यांपासून निधी प्राप्त झालेला नाही.
Gharkul01-Modi
Gharkul01-Modi

चंद्रपूर : देशातील प्रत्येकाजवळ स्वतःचे हक्काचे घर असावे, असे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आणि त्या स्वप्नपूर्तीकडे वाटचालही सुरू केली. पण चंद्रपुरात मोदींच्या स्वप्नपूर्तीची वाटचाल केंद्र सरकारनेच रोखली, असे म्हणावे लागेल. कारण गेल्या पाच महिन्यांपासून घरकुल योजनेला एक छदामही निधी दिला गेला नाही. त्यामुळे शहरातील ९४० घरकुलांचे बांधकाम रखडले आहे. कुणीही बेघर असू नये. या उदात्त हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. ही त्यांची महत्त्वाकांक्षी योजना होती.  

केंद्र सरकारने २०१५ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. या योजनेत केंद्र सरकार आणि राज्य शासन निधी उपलब्ध करून देणार आहे. दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपात घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. शहरातील दुर्बल घटकातील कुटुंबांनी योजनेचा लाभ मिळावा, म्हणून महानगरपालिका प्रशासनाकडे अर्ज सादर केले. त्यानंतर अर्जांची छाननी करण्यात आली. तीन टप्प्यांत मागविण्यात आलेल्या एकूण अर्जांपैकी तब्बल एक हजार ५९ अर्ज मंजूर करण्यात आले. त्यामुळे अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना आता हक्काचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार असे वाटत होते. 

महापालिकेकडे पहिल्या टप्प्याचा निधी उपलब्ध झाला. त्यानंतर लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात निधी वळता करण्यात आला. त्यामुळे ११९ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, ज्या लाभार्थ्यांनी पहिला टप्प्याचा निधी प्राप्त झाल्यानंतर घरकुलाचे बांधकाम सुरू केले. आता दुसऱ्या टप्प्यातील निधीची प्रतीक्षा लाभार्थ्यांना आहे. परंतु, केंद्र सरकारकडून अजूनही पहिल्याच टप्प्यातील निधी उपलब्ध झालेला नाही. तर राज्य शासनाचा दुसरा टप्पा उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. 

मनपा प्रशासनाने घरकुलासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. शासनाकडे निधी उपलब्ध होण्याचे पत्र धूळखात पडले आहे. त्यामुळे मागील पाच महिन्यांपासून निधी उपलब्ध झालेला नाही. त्याचा परिणाम ९४० घरकुलांचे बांधकाम रखडले आहे. शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देऊन घरकुलाचे स्वप्न साकारण्यास मदत करावी, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे. 

लाभार्थ्यांच्या येरझाऱ्या 
घरकुलाचा अर्ज मंजूर झाला. त्यानंतर घराचे बांधकाम सुरू केले. पहिल्या टप्प्यातील निधी प्राप्त झाला. मात्र, आता दुसऱ्या टप्प्यातील निधी अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी महापालिकेत येरझाऱ्या टाकणे सुरू केले आहे. मनपा प्रशासनानेही शासनाकडे निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला आहे. मात्र, शासनस्तरावरूनच मागील पाच महिन्यांपासून निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे संबंधित विभागात विचारणा केल्यानंतर निराश होऊन लाभार्थ्यांना परतावे लागत आहे. 

शासनाकडे पत्रव्यवहार सुरू 
प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी उपलब्ध व्हावा, म्हणून शासनाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र, मागील पाच महिन्यांपासून निधी प्राप्त झालेला नाही. 
- विजय बोरीकर 
उपअभियंता, मनपा, चंद्रपूर.

(Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com