आता एका महिलेच्या मागे अख्खं भाजप लागणार : यशोमती ठाकूर - now bjp will be behind a woman said yashomati thakur | Politics Marathi News - Sarkarnama

आता एका महिलेच्या मागे अख्खं भाजप लागणार : यशोमती ठाकूर

अतुल मेहेरे
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

माझी भाजपवाल्यांसोबत वैचारिक लढाई आहे. अशा लहानमोठ्या घटनांवरून त्यांनी आमच्या कामांत कितीही अडथळे आणले, कितीही आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला. तरीही विचारांची लढाई लढत राहणार. भाजपवाल्यांनी माझ्या राजीनाम्याची मागणी करण्यापेक्षा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कारनाम्यांविषयी बोलावे. जलयुक्त शिवार योजनेत त्यांनी काय दिवे लावले?

नागपूर : अमरावती न्यायालयाने काल जो निकाल दिला, त्यावर जास्त बोलणार नाही. पण त्या निर्णयावर आम्ही उच्च न्यायालयात अपील केले आहे. तेथे नक्कीच न्याय मिळेल, याचा विश्‍वास आहे. आठ वर्ष जुनं एक प्रकरण होतं. त्यावरून आता एका महिलेच्या मागे अख्खं भाजप लागणार, असे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.  

अमरावतीमध्ये अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे नावाच्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला थापड मारल्याच्या प्रकरणात अमरावती न्यायालयाने यशोमती ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना तीन महिने कारावास आणि १५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी मंत्री ठाकूर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. त्यावर आता एका महिलेच्या मागे अख्खं भाजप लागणार. जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरून मिडीया आणि लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी आता हे लोक अकांडतांडव करतील, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या. 

माझी भाजपवाल्यांसोबत वैचारिक लढाई आहे. अशा लहानमोठ्या घटनांवरून त्यांनी आमच्या कामांत कितीही अडथळे आणले, कितीही आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला. तरीही विचारांची लढाई लढत राहणार. भाजपवाल्यांनी माझ्या राजीनाम्याची मागणी करण्यापेक्षा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कारनाम्यांविषयी बोलावे. जलयुक्त शिवार योजनेत त्यांनी काय दिवे लावले, किती भ्रष्टाचार केला, याबाबत त्यांच्याच नेत्यांना ते प्रश्‍न का विचारत नाही, असा सवाल मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख